खणांच्या साड्यांचा घरातून बिझनेस उभारला, एका वर्षात ८० लाखांचा टर्नओव्हर झाला…

खणाची साडी आणि त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी या लुक मध्ये तुमच्याही एखाद्या मैत्रिणीने फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामला पोस्ट केलाच असणारे….

हो ना..

आता तुम्ही म्हणाल आजकाल फॅशन मध्ये ‘जुनंच नव्याने’ महिलांच्या पसंतीस का पडत असावं? 

‘आपण करू ती फॅशन’  म्हणत अनेक ट्रेंड सध्या फॅशन इंडस्ट्रीत येत आहेत आणि ते तितकेच सक्सेसफुलही झाले आहेत.

त्यातलाच एक सक्सेसफुल ट्रेंड म्हणजे, खण !

नवीन काही तरी ट्राय करावं तेही पारंपरिकतेला अनुसरून, म्हणून खण हा प्रकार सध्या हीट आहे. गेल्या वर्षभरापासून तर खणाची मागणी वरचेवर वाढत आहे. या साडीचा लूक, एलेगन्स इतका जबरदस्त आहे की लग्न, कार्यक्रम, पार्टी कुठेही नेसून जाता येण्यासारखी असलेली ही खणाची एक तरी साडी आपल्याकडे असावीच, म्हणून याबद्दल सर्चिंग आणि मागणी दोन्ही वाढले आहे.

थोडक्यात खणाचा इतिहास पाहायचा झाला तर हा खण साधारण चारशे वर्ष जुना आहे.

अस्सल महाराष्ट्रीयन म्हणून बोलले जाते परंतु खरं तर हा मूळचा कर्नाटकी !

हा कर्नाटकातला पारंपरिक कपडा जो कि मुळात अनेक वर्षं देवीला वाहीला जायचा. नंतर त्याच्या चोळ्या बनवल्या जाऊ लागल्या आणि नंतर ब्लाउज बनवायला वापरला जाऊ लागला. हळूहळू महाराष्ट्रातही विदर्भात आणि मराठवाड्यात खण वापरायला लागल्याचा इतिहास आहे.

मध्यंतरी विसरला गेलेला खण पुन्हा नव्याने फॅशन इंडस्ट्रीत इन झाला आहे. या क्षेत्रात ‘डोकं’ लावणाऱ्या फॅशन डिझायनर लोकांनाही मानलं पाहिजे. 

त्यातलीच एक धडपडी डिझायनर म्हणजे सोनाली डाळवाले.

टिपिकल ठराविक खणाच्या साडीला आणि त्याच्या जुनाट रंगाला बाजूला करत या युवतीने फ्रेश, आकर्षक अशा रंगाच्या आणि दर्जेदार खणाच्या साड्या डीझाईन करणारा ‘मीरा द लूम अफेअर’ हा ब्रँड मार्केटमध्ये टॅापला आहे.

आणि कौतुकाची बाब म्हणजे गेल्या एका वर्षाच्या काळात सोनाली च्या साड्या महिलावर्गाला इतक्या आवडल्या की, लॅाकडाऊनच्या वर्षात तिच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 82 लाखांच्या पार गेला आहे.  

सोनाली ही मूळची पुण्याची. अगदी लहान वयापासून काहीतरी छोटे मोठे व्यसाय करत आलीये. घरात सगळेच व्यवसाय प्रती रस घेणारी असल्यामुळे गौरी-गणपतीच्या सीझनमध्ये पुण्यात सीजनल फुड्स, कपड्यांचे स्टॉल लावणे, इत्यादी उपक्रम लहानपणापासूनच चालायचे. याच धडपड्या स्वभावामुळे ती एक कन्सलटन्सी रन करत सक्सेसफुल आंथ्रप्रेन्यूअर झाली.

पण फॅशन मधला इंटरेस्ट काही डोक्यातून जात नव्हता. याचा परिणाम Side Hustle म्हणून “मीरा द लूम अफेअर” हा ब्रॅंड establish करण्यामध्ये झाला. तिने सुरवातीला स्पेशल पैठणीचे कॉटन दुपट्टे डिझाईन केले. त्याला आलेला रिस्पॉन्स खूपच चांगला होता.

तीच्या consultancy च्या कामानिमित्त मागील काही वर्षात संपूर्ण भारतभर फिरली.

कुठल्याही राज्यात गेले असता तेथील खास पदार्थ आणि कपडे या गोष्टींचं निरीक्षण करायची. कर्नाटकात फिरतानाही तिने साड्याच्या फॅब्रिक ची माहिती घेतली, तेथील साड्यांचे प्रकार इत्यादी गोष्टी पाहिल्या. त्याचाच फायदा खणाच्या ट्रेंड मध्ये झाला.

सोनालीचा ‘मीरा द लूम अफेअर’ ब्रॅण्ड

सोनालीला  पूर्वीपासून ‘फॅब इंडिया’चं फार वेड होतं, परंतु त्या ब्रँडचे कपडे कमालीचे महाग असायचे. तेव्हा तिला असंच वाटत असे की, माझाही स्वतःचा असा एक मोठा ब्रँड बनवणार परंतु सर्वांना परवडेल अशाच किंमतीत. आपल्याला आवडलेले कपडे इतके महाग का असावे असा साधा प्रश्न तिला नेहमी पडायचा त्यामुळे जिद्दी स्वभावाच्या सोनालीने तिचा स्वतःचा दर्जेदार ब्रॅण्ड रिझनेबल किंमतीत आपल्याला उपलब्ध करून दिला आहे.

तिच्या या ब्रॅण्ड ला चार वर्ष झालीत. सुरुवातीला सोनाली या ब्रॅंडकड side hustle म्हणून पाहायची. भविष्यात त्याला एका मोठा ब्रँडमध्ये समोर आणायचाच असा प्लॅन होताच आणि त्यासाठी ती त्या प्रयत्नात सोनाली होतीच.

पण इतर कामात व्यस्त असल्याने ते जमत नव्हतं. मागच्या वर्षात लागलेला लॉकडाऊन तिच्या पथ्यावर पडला आणि घरीच असल्यामुळे सोनालीने संपूर्ण वेळ या ब्रॅण्डला दिला .

सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार इत्यादींमुळे हा ब्रँड लोकांपर्यंत पोहचवणे शक्य झाले.

त्यात कर्नाटकात घेतलेली फॅब्रिकची माहिती, तिथे जमलेले  कॉन्टॅक्टस आणि लॉकडाऊनमुळे सोनालीला मिळालेला वेळ असं सगळं जुळून आलं. सुरुवातीला हळूहळू सुरुवात झाली आणि मागणी जसजशी वाढत गेली तसतसा ब्रँडचा व्यापही वाढत गेला.

ती तिच्या ब्रॅण्डसाठी कर्नाटकातील गुलेड, धारवाड, बेळगाव या तीन गावांतून फॅब्रिक बनवून घेते. कारागीर, ठोक विक्रेते यांच्याशी थेट कॉन्टॅक्ट असल्यामुळे तिला बराच फायदा झाला. 

सोनाली सांगते की,

“नेमकं तेव्हा खण ट्रेंड मध्ये होता. पण खणाबद्दल जास्त कोणाला माहितीच नव्हती कि, वेगवेगळ्या नक्षीने विकलेले खणाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. काही वर्षांपासून मार्केट मध्ये पैठणी खूप लोकप्रिय झाली होती म्हणून त्यात डुप्लिकेट पैठण्या देखील आल्या होत्या, खणाच्या बाबतीतही तेच झाले, वाढती मागणी लक्षात घेऊन खणाच्या नावाने चीप आणि डुप्लिकेट माल महिलांच्या माथी मारला जातो”

सोनालीनं खणाबद्द्ल माहीती देणारे काही व्हिडीओ केले होते. ते बरेच व्हायरल झाले. ती खण साडी विक्री संदर्भात एक निरीक्षण असं सांगते की, संपूर्ण महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई- पुणे येथे खण साड्यांची मागणी खूप आहे. परंतु त्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांची खण साडीची मागणी अतिशय कमी आहे.

अगोदरच्या काळात भटक्या, विमुक्त जमातीच्या बायका देवीला वाहिलेल्या खण चोळी म्हणून वापरत, कदाचित याच कारणामुळे काही स्त्रियांना खण हा प्रकार आम्ही का घालू? अशा मानसिकतेमुळे कदाचित या भागांमध्ये खणाची मागणी कमी असू शकते.

01 scaled

सुरुवातीला मदतनीस म्हणून एकच मुलगी होती आता ती टीम टोटल पाच जणींची झाली आहे. त्यातल्या दोन कस्टमर केअर इन्स्टाग्राम वरून आणि व्हाट्सअप वरून येणाऱ्या ऑर्डर्स हँडल करतात, तर दुसऱ्या दोन मुली ऑर्डर रिलेटेड प्रोसिजर पाहतात आणि या सर्वांचे मॅनेजमेंट पाहणारी एक मॅनेजर अशी सोनालीची ची एकंदरीत टीम आहे.

सोनाली सांगते की,

मीरा ब्रँडला अपेक्षित कस्टमर हा इंस्टाग्राम वरूनच मिळतो. इंस्टाग्राम वरूनच सर्वाधिक सेल झाला आहे मात्र फेसबूक यामध्ये खूपच मागे असल्याचे ती सांगते.

मीरा ब्रँडच्या सर्वा साड्या व त्यांचे रंग निवडण्यास, ठरविण्यास सोनालीचे विशेष प्रयत्न दिसतात. बाजारात इतरही खणाच्या, आकर्षक रंगाच्या साड्या मिळतात परंतु ग्राहकांना खूप वेगळं आणि क्वालिटी प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न सोनाली करते.

जोपर्यंत एखाद्या प्रॉडक्ट मलाच आवडत नाही तोपर्यंत मी तो विक्रीस ठेवत नाही, जर एखादा पीस विकल्या जात नसेल तर तो वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करते आणि तो पीस शेवटी विकला जातो असं ती सांगते.

इंटरनेट आणि सोशल मीडिया या दोन्हीमुळे गेल्या  वर्षांत पारंपरिक साड्या नेसण्याला आणि एकूणच पारंपरिक पेहराव करायला खूप उत्तेजन मिळतं आहे. त्यामुळे सोनाली सारख्या काही धडपड्या युवती आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून उत्तमउत्तम साड्या, ब्लॉउज चे प्रकार आपल्यासमोर आणत आहे. आणि खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.