पुढच्या जन्मात देखील मला सरोज खान बनायला आवडेल !

तिचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमधल्या पंजाब मधून तिची फॅमिली मुंबईला आली. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी पण सगळं पाकिस्तानात सोडून यावं लागलं.

मुंबईत त्यांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांदे होते.

म्हणूनच की काय त्यांनी आपल्या दोन-तीन वर्षांच्या मुलीला सिनेमात बालकलाकार म्हणून काम करायला लावलं.

अगदी चालायला लागल्यापासून ठेक्यात नाचणारी ही मुलगी नजराणा सिनेमात चंद्रावर बसून गाणे गाताना दिसली.

त्याकाळी सिनेमात काम करणे म्हणजे अगदी निषिद्ध मानलं जायचं. पण कोणाला आपली मुलगी सिनेमात काम करते हे कळू नये म्हणून किशनसिंग सिंग यांनी निर्मलाच नाव बदललं.

मोठ्या पडद्यासाठी ती बेबी सरोज झाली.

सुरवातीला बालकलाकाराच काम करता करता ती बॅकग्राउंड डान्सरच काम करू लागली. अगदी हावडा ब्रिज या सिनेमात आईये मेहरबान या गाण्यात मधुबालाच्या मागे नाचणारी दहा वर्षांची सरोज खान दिसेल.

चाळीत राहणाऱ्या नागपाल कुटुंबाचा दोन टाईमच्या जेवणाचा भार छोट्या सरोजने उचलला होता.

पुढे हेलनने सिनेमासृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं त्या दिशेने सरोजचा प्रवास सुरु होता.

सरोजचं नाचण्यातील कौशल्य बघून तेव्हाचे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बी.सोहनलाल यांनी तिला आपलं असिस्टंट बनवलं. त्यांनीच सरोजला नृत्यातली बाराखडी शिकवली. कथ्थक, भरतनाट्यम वगैरे नृत्य शिकवलं.

एकीकडे शाळा, होमवर्क सुरू असतानाच सोहनलाल यांच्या सोबत त्यांची असिस्टंट म्हणून सरोज चांगले पैसे कमवू लागली. सोहनलाल हे तिचे गुरू होते, त्यांचं नृत्य तिला भारावून टाकत होतं. त्यांच्याजवळ दुसरी कोणी नृत्यांगना आली तर चरफड होत होती.

शाळकरी सरोज ४१ वर्षाच्या सोहनलालच्या प्रेमात पडली होती.

त्यांचं यापूर्वी लग्न झालं होतं, दोन मुले होती तरी त्यांनी या १३ वर्षाच्या सरोजशी लग्न केलं पण तिला त्यांच्या आधीच्या लग्नाबद्दल कल्पना नव्हती.

तिला स्वतःला लग्न म्हणजे नेमकं काय हे कळण्याची समज नव्हती.

पुढच्याच वर्षी तिने आपल्या पहिल्या मुलाला म्हणजेच राजू ला जन्म दिला. वयाच्या १५ वर्षी ती परत गरोदर राहिली पण यावेळी तिचं बाळ वाचलं नाही.

हे सगळं इतक्या वेगाने घडत होतं आणि सरोजच हे पचवण्याचं वय नव्हतं. मग सोहनलाल यांच्याशी वाद सुरू झाले.

पण आयुष्यात किती काहीही जरी टेन्शन असले तरी ती जेव्हा हिरॉईनच्या डान्स शिकवण्यासाठी सेटवर उतरायची तेव्हा बेभान होऊन नाचायची. तिचा विजेसारखा वेग, तिची अदा पाहून स्पॉटबॉय पासून सिनेमाची हिरॉईन दंग होऊन जायचे.

पुढे दोनतीन वर्षातच सरोजने सोहनलाल यांच्या पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी तिच्या मुलांना आपलं नाव देण्यास इन्कार केला होता.

सरोज पुन्हा उघड्यावर आली.

कशीबशी कामे मिळवून घर चालवायचा तिने प्रयत्न चालू ठेवला. अखेर सोहनलाल यांनीच तिला परत एकदा असिस्टंट म्हणून नोकरी दिली, त्यांनाही तिची गरज होतीच. यातूनच त्यांच्या दुसऱ्या मुलीचा म्हणजे कुकु चा जन्म झाला.

पण १९६९ साली सोहनलाल यांनी हिंदी फिल्मइंडस्ट्रीला रामराम ठोकला व मद्रासला निघून गेले. त्यांनी परत कधीच सरोजशी संपर्क केला नाही.

सरोजने मात्र खंबीरपणे आपल्या मुलांना मोठं करायचं ठरवलं.

दिवसरात्र मेहनत करू लागली. त्याकाळच्या सुपरस्टार हिरॉईन साधना, वैजयंतीमाला, हेलन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्या सोबत तिने काम केलं. त्यांना तिचे कष्ट माहीत होते. तिच्या बद्दल त्याना आपुलकी वाटायची.

या आपुलकी मधूनच एक दिवस साधनाने दिग्दर्शक आरके नय्यर यांच्याकडे सरोजची शिफारस केली. त्यांनी या नव्या मुलीला चान्स देताना थोडीशी का कु केल्यावर साधनाने

जर सरोज नृत्य दिग्दर्शन करणार नसेल तर मी सिनेमात काम करणार नाही अशी धमकी दिली.

यातूनच सरोजला गीता मेरा नाम हा चित्रपट मिळाला.

ते साल होत १९७४. नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोजची कारकीर्द सुरू झाली. याच काळात तिची ओळख एका पठाण व्यापाऱ्याशी झाली. सरदार रोशन खान. त्याचंही लग्न झालेलं पण तो सरोजच्या मुलांना आपलं नाव देण्यास तयार होता.

सरोज त्याच्याशी लग्न करून सरोज खान बनली. तिच्या मुलांना राजू आणि कुकु यांना देखील खान हे आडनाव मिळालं. सरोज म्हणते,

“ते माझ्या आयुष्यात देवदूताप्रमाने आले.
त्यांची मुलं, त्यांची पहिली पत्नी यांच्याशी माझं सख्खेपणाच नातं आहे.”

एकीकडे तीच प्रोफेशनल करियर बहरत होतं.

सुभाष घईच्या हिरो सिनेमाच्या यशामुळे तिला पहिल्यांदा मोठं सक्सेस अनुभवता आलं, श्रीदेवीच्या नागीण सिनेमातील मै ‘तेरी दुष्मन या गाण्यामुळे इंडस्ट्रीमध्ये नाव झालं.

पण १९८९ साली आलेल्या तेजाब सिनेमातल्या एक दोन तीन या गाण्याच्या नभूतो न भविष्यती अशा सुपरहिट यशामुळे माधुरी दिक्षित तर नंबर वन अभिनेत्री बनलीच पण सरोज खान हे नाव सुद्धा घराघरात पोहचल.

एक दोन तीन मुळे फक्त तीच आणि माधुरीच आयुष्य बदलून टाकलं अस नाही तर सिनेमातील कोरियोग्राफरच महत्व सुद्धा वाढलं, त्यांना मानसन्मान मिळू लागला.

त्याच वर्षी फिल्मफेअरने बेस्ट कोरिओग्राफी हा नवीन अवॉर्ड देण्यास सुरुवात केली,

सरोज खानने सलग तीन वर्षे हा अवॉर्ड जिंकला.

कोणतेही शास्त्रशुद्ध नाच न शिकलेल्या सरोज खानने भारतीय फिल्मइंडस्ट्रीमध्ये डान्स युग आणलं. पुढे फराह खान, रेमो, शामक दावर, अहमद खान, वैभवी मर्चंट यांनी जे सक्सेस आणि ग्लॅमर अनुभवलं याआज सरोज खानने केलेले कष्ट कारणीभूत आहेत.

त्यांनी त्याकाळच्या सगळ्या अभिनेत्रींशी काम केलं मात्र माधुरीशी त्यांचं विशेष सूर जुळले. धक धक करने लगा सारखी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली.

अगदी देवदास च्या डोला रे डोलामध्ये देखील दोघींची जादू अनुभवायला मिळाली. त्यासाठी सरोज खान याना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

जवळपास साठ वर्ष त्या भारतीय सिनेमाचा चालता बोलता इतिहास होत्या.

वेगाने बदलणाऱ्या सिनेमासृष्टीत अजूनही सरोज खान यांनी आपली ओळख टिकवून ठेवली. अगदी गेल्या वर्षी आलेल्या कलंक या सिनेमात त्यांनी माधुरीच्या गाण्याची कोरियोग्राफी केली होती. त्यांचा मुलगा राजू खान हा देखील नृत्यदिग्दर्शक आहे. तो गंमतीने त्यांना रिटायर होऊन आम्हाला चान्स दे अस सांगायचं पण सरोज खान म्हणायच्या,

त्या पेक्षा मला हरवून तू स्वतः साठी संधी तयार कर.

याच फायटींग स्पिरिटच्या जीवावर त्यांनी आयुष्यात आलेले अनेक चढउतार पचवले. दुसरा कोणी असता तर तेव्हाच उन्मळून पडला असता. या खडतर प्रवासाबद्दल त्यांना कोणी विचारलं तर त्या म्हणायच्या,

” जे झालं त्या बद्दल माझ्या मनात खंत नाही उलट हे आयुष्य अनुभवायला मिळाला याचा मला अभिमान आहे. उलट जर मला पुढच्या जन्मात पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा सरोज खान व्हायलाच आवडेल!”

गेल्या काही दिवसांपासून त्या श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती मात्र आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.