चौधरींनी वाघीण पाळली पण त्याचा शेवट इतका दर्दी झाला की जगभर चर्चा झाली..

शेर पाला है, खर्चा तो होगा ही ह्या सेगमेंटखाली आपण लोकांचे बरेच आरोप प्रत्यारोप, टिंगल टवाळी ऐकली असेल. तसं पाहिलं तर कुठलही जनावर आपण जर पाळल तर त्याची सगळी ठेप आपल्याला ठेवावी लागते.

कुत्रा, मांजर, पोपट असे बोटावर मोजण्याइतके पाळीव प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राण्याचा विचार आपल्या डोक्यात येत नाही. त्यातल्या त्यात वाघ पाळण्याचा विचार करणं म्हणजे गल्लीतले कुत्रे आणि बेवडे गायब होतील.

पण एका दिग्गज माणसाने एक वाघीण पाळली होती आणि ती सगळ्या जगात फेमस झाली होती.

माणसाची आणि जनावरांची केमिस्ट्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची प्राणी प्रेमाची गोष्ट. ही स्टोरी आहे भारताचे दिग्गज वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सरोज राय चौधरी आणि त्यांची मुलगी अर्थात खैरी वाघीण यांची. तर थेट स्टोरीवर येऊया. 

तारीख होती 5 ऑक्टोबर 1974. सरोज राय चौधरी यांच्या घरी एक वाघाचा बछडा आणण्यात आला. ती वाघीण होती. सरोज राय चौधरी हे सिमिलिपाल टायगर रिझर्व्ह, उडीसाचे एक प्रमुख वाईल्ड लाईफ पार्टनर म्हणून प्रसिद्ध होते.

उडिसामध्ये पहिल्यांदा वाईल्ड लाईफ कन्सर्ववेटिव्ह आणि त्यातल्या त्यात वाघ वाचवण्याची त्यांची ओळख होती.

ही वाघीण कशी सापडली तर याचीही एक गोष्ट आहे.

खैरी या आदिवासी जमातीतील लोकांना नदी किनारी जेव्हां ते मध गोळा करायला गेले होते तेव्हा तिथं वाघिणीचे तीन छोटे बछडे दिसले. वाघीण पाणी प्यायला त्या बछाड्यांसोबत आली होती. वाघिणीला त्या आदिवासी लोकांनी त्यांच्या पारंपारिक वाद्यांच्या आवाजाने पळवून लावलं. ती वाघीण दोन बछड्यांना घेऊन पळाली पण एक पिल्लू तिथेच राहून गेलं. ते या आदिवासी लोकांनी सरोज राय चौधरी यांच्या ताब्यात दिलं.

चौधरींनी काय केलं तर ते पिल्लू दत्तक घेतलं आणि खैरी आदिवासींनी तिला आणलं म्हणून तिचं नाव खैरी ठेवलं. 

माणूस आणि वाघीण यांचा इतका उत्तम सोहळा याआधी कधी पाहण्यात आला नव्हता. याकडे मीडियाच लक्ष गेलं नाही तर नवलच. मग चौधरी आणि खैरी वाघीण यांच्यावर बऱ्याच स्टोरी, डॉक्युमेंट्री तयार झाल्या. कॉमन माणसांना तेव्हा वाईल्ड लाईफ बद्दल इतकं आकर्षण नव्हतं, उलट माणूस या प्राण्यांना घाबरायचा, अजूनही घाबरतो पण तेव्हा सरोज राय यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं.

नंतर खैरी सरोज राय चौधरी यांच्या घरची एक सदस्य झाली. चौधरींना काय मूलबाळ नव्हतं त्यामुळे ते खैरीलाच मुलाप्रमाणे वागवू लागले.

आता चौधरी यांच्या घरी काय फक्त वाघीणचं नव्हती तर मुंगूस, मगर असे बरेच प्राणी होते. जसे सध्या आमटे घराण्याकडे आहेत. खैरीला चौधरी यांची पत्नी नलिनीचा जास्त लळा लागला होता. त्या दोघींची केमिस्ट्री भन्नाट होती. अंघोळ, खाणंपिणं, खेळणं, झोपणं असा सगळा त्यांचा दिनक्रम असायचा.

दिवस जात होते आणि खैरी मोठी होत होती. ती कोणालाही त्रास देत नव्हती. संपूर्ण देशभरात आणि जगभरात चौधरी आणि त्यांची मुलगी खैरी यांचीच चर्चा होती. खरंतर चौधरी कुटुंबाला वाघीण पाळताना फार त्रास झाला पण तिला त्यांनी मुलीप्रमाणे वाढवलं होतं. 

जशी खैरी मोठी झाली तस चौधरींना वाटू लागलं की आता ती जंगलात राहू शकेल म्हणून ते दोनदा तीला जंगलात सोडून आले पण ती परत घरी आली. मग चौधरींनी स्वतलाच समजावलं की ती आता जंगलात राहू शकत नाही.

जशी खैरी अडल्ट फेजमध्ये आली तशी ती शरीराची गरज भागवण्यासाठी आणि पार्टनर शोधण्यासाठी जंगलात जाऊ लागली. पण पुन्हा ती घरी यायची किंवा चौधरी तिला हुडकून काढायचे. खैरी काय प्रेग्नंट झाली नाही. तिचा दिनक्रम मात्र तोच असायचा.

एक दिवस मात्र चौधरी कामानिमित्त दिल्लीला गेले.

त्या दिवशी जे झालं ते डेंजर होतं. एक भटका कुत्रा चौधरी यांच्या बंगल्यात घुसला आणि झटापटीत त्याने खैरीचा चावा घेतला. खैरिला रेबीज झाला. चौधरी परत यायला फारच उशीर झाला होता. उपचार प्रभावी ठरले नाही आणि खैरीचं दुर्दैवी निधन झालं. चौधरी यांची पायाखालची जमीनच सरकली, आतून बाहेरून ते हादरून गेले. खैरीला लावलेली माय, तिचे केलेले लाड तिच्या आठवणी सगळं काही संपलं होतं. 

1981 साली खैरी गेली आणि लगेचच त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1982 साली हार्ट अटॅक येऊन सरोज राय चौधरी यांचंही निधन झालं.

बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं की खैरीच्या मृत्यूच्या धक्क्यातून चौधरीजी सावरू शकले नाही त्यामुळे त्यांना अकाली मरण आलं.

दोघानाही जगभरातून श्रध्दांजली वाहण्यात आली होती कारण इतकं उच्च दर्जाचं प्राणी प्रेम लोकांना नव्यानेच पाहायला मिळालं होतं. प्राण्यांप्रती असलेलं प्रेम पाहून आणि योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने 1983 साली मरणोत्तर पद्मश्री सरोज राय चौधरी यांना देऊ केला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.