RSS चे सरसंघचालक कसे निवडले जातात?

किस्सा आहे १९७२ सालचा.

मा.गो.वैद्य नावाचे संघाचे सक्रीय स्वयंसेवक होते. शिवाय तरुण भारतच्या संपादकपदाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे होती. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी तेव्हा कॅन्सरने आजारी होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. गेली तेहतीस वर्ष  सरसंघचालकपदाची धुरा सांभाळणाऱ्या  गुरुजींची खालावत चाललेली प्रकृती पाहून एका महिला पत्रकाराने वैद्य यांना विचारलं,

“Who after Golwalkar? गोळ्वलकर गुरुजींच्या नंतर सरसंघचालक कोण?”

 तेव्हा मा.गो.वैद्य त्यांना म्हणाले की,

“असे अर्धा डझन तरी लोक असतील”

तेव्हा त्या पत्रकाराने विचारल की कोण आहेत हे अर्धा डझन लोक? आम्हाला नावे माहित नाही. यावर वैद्य यांचं प्रत्युत्तर होतं,

“तुम्हाला माहीत असण्याचे कारण नाही. आम्हाला माहीत आहेत.’’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उर्फ आर.एस.एस.ची कार्यशैली ही अशीच बंदिस्त राहिली आहे. म्हणूनच संघाबाहेरच्या लोकांना त्यांच्याबद्दल बरेचसे गैरसमजच पसरलेले आहेत.

हिंदू समाजाच्या प्रगती साठी झटणारे राष्ट्रीय चारित्र्याचे कार्यकर्ते निर्माण करण्याच व्रत बाळगून ही संघटना कार्यरत आहे. नागपूरमध्ये त्याचं मुख्य कार्यालय आहे. तिथून सरसंघचालकांच्या आदेशावरून आरएसएस व तिच्या परिवारातील इतर संघटना कार्य करतात.

सर्वसामान्य लोकांच्या आरएसएसबद्दलच्या गैरसमजामध्ये सर्वात जास्त गैरसमज या सरसंघचालक पदाबद्दल आहेत. अनेकांना वाटत की संघ एकचालकानुवर्तित या विचारान चालत. तिथे हुकुमशाही चालते. तिथे निवडणुका होत नाही.

मग सरसंघचालकपदाची निवड होते तरी कशी? 

सरसंघचालक हे या संघटनेतील सर्वोच्च पद आहे. आता पर्यंत ६ सरसंघचालक होऊन गेलेत. यापैकी सर्वजण उच्चशिक्षित पदवीधर आहेत. तरीही त्यांनी ब्रम्हचर्याचे व्रत घेऊन संघाचे प्रचारक होण्याचा निर्णय घेतला.

यापदासाठी निवडणुका होत नाहीत हे बरोबरच आहे. परंतु संघ व्यवस्थापनाची विशिष्ट एक पद्धत आहे आणि कोअर ग्रुप पद्धतीने चालवली जाते. प्रत्येक निर्णय या कोअर कमिटीच्या विचारविनीमयानंतर केला जातो यात सरसंघचालकाची निवड देखील आहे.

संघाच्या स्वयंसेवकांच्या मते निवडणूक म्हटली की प्रचंड स्पर्धा आली, एकमेकांचा द्वेष आला, त्यातून होणारे गैरव्यवहार आले, पण जेष्ठांनी एकत्र बसून एकमताने निवड केली तर भांडणे टाळली येतात. निवडणुकीने पद जिंकता येते पण मित्र गमावला जातो, संघटना एका विचाराने एका ध्येयाने चालवायची झाली तर हे वाद टाळण्याकडे संघचालकांचा कटाक्ष असतो.

पहिले सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार यांनी स्वतःच १९२५ सालच्या विजयादशमीला  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. मात्र त्यांच्या सहकाऱ्यानी एकत्र येऊन चर्चा करून मगच त्यांची सरसंघचालक म्हणून निवड केली होती असं सांगितलं जातं. मध्यंतरी वनसत्याग्रहामुळे हेडगेवारांना अटक झाली त्याकाळात त्यांच्याजागी कार्यकारी सरसंघचालक म्हणून लक्ष्मण परांजपे यांनी काम पाहिलं होतं.

ब्रिटीश कारागृहातून सुटका झाल्यावर हेडगेवार यांनी संघाचे कार्य परत आपल्या हातात घेतले. देशाच्या कानाकोपऱ्यात संघाला पोचवण्यासाठी प्रचारक तयार केले.  

त्यांच्या नंतरचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे खरे तर बनारसच्या हिंदू विद्यापीठामध्ये एक प्राध्यापक होते. तिथे नव्यानेच संघशाखेची स्थापना झाली होती. त्यांच्या बैठकीला गोळवलकर गुरुजी जाऊ लागले होते. तेव्हा याच संघटनेचे काम करायचे आहे असे त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नव्हता.

मात्र एका कामासाठीच्या निमित्ताने त्यांची व डॉ. हेडगेवार यांची बनारसमध्ये भेट झाली. याभेटीमध्ये हेडगेवार यांना सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या या गुरुजींच्या विचारांनी भारावून टाकले. दोघानाही जाणवले की आपली कार्यपद्धती, आपले विचार एकच आहेत. पुढच्या वर्षी हेडगेवार यांनी गुरुजीना एका कार्यक्रमासाठी नागपूरला बोलावून घेतले. काही दिवसातच त्यांची संघ शिक्षण विभागाचा प्रमुख पदी निवड केली.

पुढे हेडगेवार याचं अखेरच आजारपण आलं तेव्हा त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली व त्यातून पुढचे सरसंघचालक म्हणून गोळवलकर गुरुजींची निवड केली. 

गुरुजी यांनी सुमारे तेहतीसवर्षे सरसंघचालक या पदावर कार्य केले. वयपरत्वे मृत्यूची चाहूल लागल्यावर आपल्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याने संघाच्या बौद्धिक व शारीरिक शिक्षण प्रमुख असणार्या बाळासाहेब देवरस यांची तिसरे सरसंघचालक पदी निवड केली. गोळवल कर गुरुजी म्हणायचे,

“ज्यांनी डॉ.हेडगेवार बघितले नाहीत, त्यांनी बाळासाहेब देवरस यांना पाहावे म्हणजे त्यांना डॉ.हेडगेवार कसे होते याची कल्पना येऊ शकेल.”

हीच परंपरा बाळासाहेब देवरस यांनीही चालवली. त्यांच्या वृद्धापकाळात आपल्या कोअरकमिटीच्या सल्ल्याने सह कार्यवाह पदी काम करणाऱ्या व संघ व्यवस्थापनात विविध अनुभव असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या राजेंद्रसिंह उर्फ रज्जूभैया यांची निवड केली. जेव्हा प्रा. राजेंद्रसिंहजी थकले तेव्हा त्यांनी दक्षिणेतले बौद्धिक आणि शारीरिक सहकार्यवाह के.सुदर्शन यांची निवड केली.

के.सुदर्शन यांनी नऊ वर्षे ही जबाबदारी संभाळली. जेव्हा आपण थकलोय हे जाणवलं तेव्हा त्यांनी वारसदाराचा शोध सुरु केला. याबद्दल म.गो.वैद्य सांगतात की सुदर्शन यांनी जवळपास वीसपंचवीस जणांचा सल्ला घेतला होता यात स्वतः वैद्य हे देखील होते. आणि आपल्या हयातीतच सहकार्यवाह असणाऱ्या डॉ.मोहन भागवत यांच्याकडे सरसंघचालकपदाची सूत्रे सोपवली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख हा कोणत्याही घराणेशाहीमुळे नाही तर संघ विचारांवरच्या निष्ठेमुळे, वर्षानुवर्षे प्रचारक म्हणून केल्यावर  केली जाते असं संघाचे स्वयंसेवक म्हणून सांगतात.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. nagesh says

    sarsanghchalak cha ka mahatal jaat?

Leave A Reply

Your email address will not be published.