पाच वर्षांपूर्वी अशाच आरोपांमुळे एका मुलाचं आयुष्य बरबाद झालं होतं..
फूड डिलिव्हरी साठी फेमस असलेलं झोमॅटो ऍप सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. झालं असं की काही दिवसांपूर्वी ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळुरुमधील एका मॉडेल व कंटेन्ट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने केला.
त्याने केलेल्या मारहाणीत नाकातून रक्त येत असलेला व्हिडीओ तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. देशभरातून अनेक जण तिच्या सपोर्टमध्ये उभे राहिले. झोमॅटोने देखील झाल्या प्रकाराबद्दल माफी मागत तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली.
पण जेव्हा त्या डिलिव्हरी बॉय कामराजला अटक झाली तेव्हा त्याने आपल्यावरील आरोप नाकारले. उलट हितेशानेच फूड डिलिव्हरीवेळी पैसे दिले नाहीत व माझ्यावर हल्ला केला असं सांगितलं. कामराजचे स्टेटमेंट समोर आल्यापासून संपूर्ण घटनेला वेगळंच वळण लागलं आहे.
सध्या देश दोन भागात विभागला गेला असून दोन्ही बाजू तावातावाने भांडताना दिसत आहेत. पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय, गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी फक्त सोशल मीडिया वरून एखाद्याला दोषी घोषित करून त्याची मीडिया ट्रायल घेणे कितपत योग्य आहे याची शहानिशा देखील केलीच पाहिजे.
कारण अशा सोशल मीडिया ट्रायल मध्ये अनेकांचं करियर बरबाद झालं आहे, कित्येकजण आयुष्यातून उठले आहेत.
जवळपास ५ वर्षांपूर्वीची घटना.
२३ ऑगस्ट २०१५.
राजधानी दिल्लीतील एका तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाचा फोटो पोस्ट केला होता. या तरुणाने ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
ट्रॅफिक सिग्नल सारख्या स्थळावर असं काही होत असताना आणि तिथे बरेच लोक असताना देखील कुणीच आपल्याला मदत केली नाही. कुणीही आपल्या बाजूने उभं राहिलं नाही. त्यामुळे आपण स्वतःचं स्वतःसाठी लढायचं असं ठरवलं आणि त्या तरुणाविरोधात टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शिवाय फेसबुकवरील सर्वांना त्या तरुणाचा फोटो आणि गाडीचा नंबर व्हायरल करण्याचं आवाहन देखील तिने केलं.
“तरुणाने आपल्याला जी शिवीगाळ केली, ते ही मी इथे लिहू शकले असते. परंतु फेसबुकने आपली पोस्ट डिलीट करू नये, यासाठी ते टाळतेय” असंही तिने आपल्या पोस्टच्या शेवटी म्हंटलं होतं.
पोलीस तक्रार करून झाल्यानंतर ती सोशल मिडीयाच्या ‘न्याय दरबारा’त स्वतःसाठी न्याय मागत होती. जसलीन कौर असं त्या तरुणीचं नाव आणि तिने ज्याच्या विरोधात दुर्व्यवहाराचे आरोप केले होते तो तरुण म्हणजे सर्वजित सिंग.
जसलीनने फेसबुक पोस्ट टाकली आणि सर्वांनी तिच्या धैर्याची दाद द्यायला सुरुवात केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील तिने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करणारं ट्वीट केलं.
Congratulate @jasleenkaur89 for her bravery. Girls of Delhi should follow her & speak up against such unacceptable acts
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 24, 2015
त्यानंतर मात्र व्हायरलचा रोग लागलेल्या अनेकांनी गोष्टीची कुठलीही खातरजमा न करता ती पोस्ट शेअर करायला सुरुवात केली. अवघ्या काही तासात तिची पोस्ट व्हायरल झाली आणि सर्वजित सिंगवर ‘विकृत’ असल्याचा ठप्पा लागला.
दरम्यानच्या काळात सर्वजितने देखील एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. “महिलांविरोधात छेडछाडीचे अनेक प्रकार होत असतात हे जरी खरं असलं तरी आपण मात्र जसलीनशी कुठलंही गैरवर्तन केलं नाही. उलट जसलीनने ‘आता मी काय करते बघ’ असं म्हणत पोलीस कारवाईसाठी तयार राहण्याची धमकी दिली.
मी जर तिच्याशी काही गैरवर्तन केलं असेल तर कुणीतरी साक्षीदार असेन ना..? मी एक सामान्य माणूस काही कुणी गुंडा नाही की ज्यामुळे लोक मला घाबरून या प्रकाराविरोधात बोलणार नाहीत” असं त्याने लिहिलं. पण तिकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता.
जसलीनने दिलेली तक्रार आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या तिच्या पोस्टमुळे पोलिसांनी सर्वजितला अटक केलं. प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात केस उभी राहिली आणि आजपर्यंत गेल्या ३ वर्षात या केसची १३ वेळा सुनावणी झाली पण एकाही सुनावणीसाठी जसलीन न्यायालयात हजर राहिली नाही.
सर्वजित विरोधात पोलीस केस दाखल झाल्याने त्याचं करिअर मात्र जवळपास संपलं. तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीने या प्रकरणानंतर त्याला कामावरून काढून टाकलं. आपल्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांवर या प्रकरणाचा वाईट परिणाम होतोय, असं त्याला सांगण्यात आलं.
त्यानंतर त्याने एका ‘मॅरीज ब्युरो’सोबत काम करायला सुरुवात केली. तिथे त्याला काम तर मिळालं, पण पहिल्या कंपनीतल्या पगारापेक्षा जवळपास अर्ध्या पगारावर. पण काही काळातच या नोकरीवरूनही त्याला काढून टाकण्यात आलं.
नवी नोकरी शोधणं आणि कोर्टाच्या खेट्या मारणं यात गेल्या ३ वर्षांच्या काळात सर्वजितला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आणि जो मानसिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
कोर्टाच्या आतापर्यंत झालेल्या १३ सुनावणीपैकी फक्त २ वेळा जसलीनच्या बाजूने तिचे वडील कोर्टासमोर हजर राहिले. आपली मुलगी नोकरीच्या निमित्ताने कॅनडामध्ये असल्याने ती सुनावणीस हजर राहू शकत नाही, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
जसलीनच्या वडिलांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सर्वजितने ‘द प्रिंट’शी बोलताना आपली बाजू मांडली. सर्वजित म्हणतो,
“प्रत्येकवेळी जेव्हा जसलीन कोर्टात अनुपस्थित असते, त्यावेळी तिच्या नोकरीचं कारण तिच्या वडिलांकडून दिलं जातं. म्हणजे तिला तिचं करिअर बनवण्याचा अधिकार आहे आणि मला नाही का..?”
जसलीनला पुन्हा पुन्हा समन्स पाठवून देखील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात वॉरंट पाठवलं. जसलीनने आपल्याविरोधात अशाप्रकारचं वॉरंट निघाल्याचं मान्य करण्यास नकार दिला होता परंतु तिच्या वकिलांनी मात्र वॉरंट निघाल्याचं मान्य केलं आहे.
दरम्यान “मी एका खास उद्देशाने ही लढाई सुरु केली असून ती शेवटपर्यंत लढण्यास मी प्रतिबद्ध आहे. मी कोर्टासमोर येईल आणि माझी साक्ष नोंदवेल. या प्रकरणाला एवढं महत्व देण्याची गरज नाही” अशी प्रतिक्रिया जसलीनने ‘दि प्रिंट’शी बोलताना दिली.
मात्र याप्रकरणी फक्त पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजितची ‘विकृत तरुण’ अशी प्रतिमा निर्माण करून जसलीनला न्याय मिळाला का..? पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कायद्याच्या माध्यमातून सुरु केलेली लढाई लवकरात लवकर निर्णयापर्यंत घेऊन जाण्यास न्यायव्यवस्थेस मदत करण्याची जसलीनची जबाबदारी नाही का..? असे प्रश्न जसलीन बाबत उभे राहिले.
दरम्यान कोर्टातील केस चालत राहिली. घडलेल्या घटनेपासून चार वर्षांनी दिल्ली कोर्टाने निकाल दिला की
तक्रारदाराची साक्ष विश्वासार्ह नाही आणि फिर्यादीच्या हेतू बाबतीत शंका निर्माण करते.
न्यायाधीश सोनम गुप्ता यांनी सर्वजीतसिंग याला निर्दोष घोषित केले. इतक्या वर्षांच्या लढाईत त्याला विकृत तरुण, दिल्ली का दरिंदा अशी लेबल लावून त्याच्या सामाजिक प्रतिमेचं आणि करियरच प्रचंड नुकसान झालं होतं.
आणि हे सगळं सुरु असताना जसलीन कौर कॅनडाला आपल्या उच्च शिक्षणाची डिग्री घेण्यासाठी निघून गेली होती. निकालाच्या दिवशी देखील कोर्टात हजर राहण्याचं सौजन्य तिने दाखवलं नाही.
या उदाहरणावरूनच सध्याच्या सोशल मीडियावर टीका केली जातीय की झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा आणि आत्ता तरी त्यांनी शहाणं व्हावं आणि हितेशा चंद्राणीचा निकाल जो लागेल तो लागेल पण तोपर्यंत मीडिया ट्रायल चालवणं बंद करावं इतकंच.
हे ही वाच भिडू
- #metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय ?
- सिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली ?
- स्त्री मुक्तींच रंगबेरंगी शस्त्र म्हणून TVS स्कुटीचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल.
- मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो.