मारामारीचं निमित्त झालं आणि सातारच्या छत्रपती घराण्याची राजकारणात एन्ट्री झाली.
सातारच राजकारण छत्रपती घराण्याभोवती फिरत. इथे फाईट कोणाच्यात असली तर ती उदयन महाराज आणि शिवेंद्रराजे या दोघा भावांच्या कार्यकर्त्यांमध्येच असते. दोन्ही बाजू तुल्यबळ. मागच्या वर्षी दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पण उदयन महाराजांचा श्रीनिवास पाटलांनी लोकसभेला पराभव केला. खुद्द शरद पवार जिद्दीने प्रचाराला उतरले होते म्हणून हा चमत्कार घडला.
उदयनराजे भोसले साताऱ्यात पडतील अस कोणाला वाटलं देखील नव्हत. छत्रपती घराण्याचा दबदबाच तेवढा मोठा आहे.
पण छत्रपती घराण्याची राजकारणातली एन्ट्री एका मारामारीमुळे झाली होती.
सातारा हा कॉंग्रेसचा पूर्वापार चालत आलेला बालेकिल्ला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी सुद्धा सातारा कॉंग्रेसच्या पाठीशी उभा होता.
या जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारचा मोठा इतिहास होता. यशवंतराव चव्हाण सुद्धा या पत्रसरकारचे एक शिलेदार. ब्रिटीशांच्या विरुद्ध लढलेल्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यानंतरही साताऱ्याच्या राजकारणावर वरचष्मा गाजवला होता.
यशवंतराव चव्हाणांनी छत्रपतींच्या वंशजांना राजकारणापासून दूरच ठेवल होत.
नाही म्हणायला तेव्हाचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले हे सातारचे नगराध्यक्ष राहून गेले होते पण कॉंग्रेसकडून विधानसभा किंवा लोकसभेच तिकीट भोसले घराण्यातील कोणाला मिळाल नव्हत.
गोष्ट आहे १९७८ची. इंदिरा गांधीनी जाहीर केलेली आणीबाणी संपुष्टात आली होती. जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाच्या पंखाखाली भारतातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आला. यातवाजपेयींचा जनसंघ सुद्धा होता. मोरारजी देसाई पहिली बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान बनले.
देशातल वातावरण खळबळून निघाल. खुद्द इंदिरा गांधीचा पराभव झाला.
महाराष्ट्रात मात्र कॉंग्रेसला फार मोठा फटका बसला नाही. पण मते मात्र प्रचंड कमी झाली होती. खुद्द यशवंतराव चव्हाणांचे सातारामधून लीड कमी झाले होते.
यशवंतरावांची लीड कमी झाली म्हणजे प्रयत्न केलं तर साताऱ्यात कॉंग्रेसचा पराभव होऊ शकतो हा विश्वास विरोधी पक्षात निर्माण झाला. त्यातच कॉंग्रेसमध्ये फुट पडली होती. या पूर्वी फक्त औपचारिकता म्हणून शेकाप व जनसंघाचे नेते साताऱ्यात निवडणुकीला उभे राहात. यावेळी मात्र जनतापक्षाने तयारी निशी उतरायचं ठरवल.
उमेदवार निवडला अभयसिंह भोसले.
अभयसिंह भोसले म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे धाकटे बंधू. उदयनराजेंचे काका व शिवेंद्रसिंह राजे यांचे वडील. अभयसिंह राजे यांची ओळख स्वच्छ चारित्र्याचा साधा माणूस अशी होती.
अनेकदा पायजमा आणि फुल शर्ट या वेशभूषेतील अभयसिंहराजे लॅम्ब्रेटा स्कूटरवरून जाताना सातारकरांना दिसायचे. राजकारणाशी काडीमात्र ही संबंध नव्हता. पण म्हणूनच जनसंघाच्या आग्रहामुळे जनतापक्षाने त्यांना तिकीट दिले.
त्यांच्या विरोधात होते कॉंग्रेसचे बाबुराव घोरपडे मास्तर.
बाबुराव घोरपडे हे यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी. एकेकाळी स्वातंत्र्यलढा गाजवणारे मोठे असामी. यशवंतरावांनी या वर्षीची निवडणूक जड जाणार हे ओळखल्यावर बाबुराव घोरपडे यांना निवडणुकीला उतरवलं होतं. इंदिरा कॉंग्रेसला उमेदवार मिळाला नाही. यामुळे लढत दुरंगी होणार होती.
निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत देखील पारड बाबुराव घोरपडे यांच्या बाजूने होते. यशवंतरावांच्या सकट जिल्ह्यातील सर्व मोठे नेते पाठीशी असल्यामुळे बाबुराव मास्तरांना विजयाची शास्वती होती. अभयसिंहराजे यांचा एकांडा प्रचार सुरु होता. तरुण कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी होती पण विजय खूप लांब होता.
अशातच प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी अपशिंग्यात काँग्रेस आणि जनता पक्षाच्या प्रचारकात किरकोळ मारामारी झाली.
या मारामारीमध्ये जनता पक्षाचा कार्यकर्ता जखमी झाला. अपशिंग्यात वातावरण तणावपूर्ण बनले. जखमीला साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरायचं ठरवलं.
तेव्हा सातारा मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘महाराष्ट्र मित्र’ या साप्ताहिकाचे दत्ता भिडे नावाचे छायाचित्रकार होते. त्यांच्या मदतीने जखमी कार्यकर्त्याचे फाेटाे काढण्यात आले व राताेरात त्याचा ब्लाॅक बनवून भडक बातमी पेपरमध्ये छापूनही आणली.
पहाटे सातारामधील प्रत्येक घरात अंक हा अंक पाेहाेचला होता.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जखमी कार्यकर्त्याची बँडेज बांधून मिरवणूकही काढली. खुद्द अभयसिंह राजे यांना दगडफेकीत लागल होत. ते देखील बँडेज गुंडाळून मिरवणुकीत अग्रभागी होते.
एका रात्रीत वातावरण पलटल. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या या आततायी वागण्याला रागावून सातारच्या जनतेने या वेळी जनतादलाला मतदान करायचं ठरवलं. त्यात भोसले घराण्यातील अभयसिंह राजे समोर असल्यामुळे जनतादलाला मोठा सपोर्ट मिळाला.
तरीही निवडणूक चुरशीची झाली. तरुण अभयसिंहराजे भोसले यांनी बाबुराव घोरपडे यांचा फक्त ५ हजार मतांनी निसटता पराभव केला होता.
सातारामध्ये लोकशाहीच्या राजकारणातही भोसले घराण्याचे राज्य सुरु झाले. पुढे अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेसमध्ये आले. मंत्रीदेखील झाले. त्यांच्यानंतर उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी हा वारसा पुढे चालवला आहे.
हे ही वाच भिडू.
- उदयनराजे नगरसेवक झाले होते त्या पुर्वी आणि त्यानंतर काय घडलं..
- हा आहे सातारच्या राजघराण्याचा संपुर्ण इतिहास.
- प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.
- स्कॉलर विरुद्ध कॉलर;