साताऱ्यात हाताबाहेर जाणारा कोरोना आता पत्रकारांनी आटोक्यात आणण्याचा चंग बांधला आहे..
राजधानी सातारा… अर्थात मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण. देशातील एकेकाळचं सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून त्याला ओळखलं जातं होतं. होतं. पण आज राज्यात मात्र याच साताऱ्याला कोरोनामुळे सर्वात असुरक्षित ठिकाण अशी ओळख मिळाली आहे.
इथली सध्याची अवस्था आकडेवारीत सांगायची अवघ्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये इथला पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा ९४ हजारांच्या घरात गेला आहे.
एकीकडे पुणे-मुंबई ही शहर आटोक्यात येत असताना, इथली परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला यश येत असल्याचं चित्र आहे. इथली रोजची संख्या चारशे-पाचशेच्या घरात आली आहे. साताऱ्यात मात्र हाच आकडा २ हजार ५०० च्या घरात गेला आहे. त्यामुळे इथला रोजचा पॉजिटीव्ह रुग्णांचा रेट पुणे मुंबई या दोन शहरांच्या तुलनेत, +११८ टक्के इतका आहे. तोच पुण्याचा – ४४.४४ टक्के आहे तर, मुंबईचा – १८.५ टक्के.
मृत्यूदराच्या बाबतीत देखील मागच्या काही दिवसात सातारा राज्यात सातत्यानं आघाडीवर आहे. इथं दररोज सरासरी ४० मृत्यू तर फिक्स आहेत.
या तीन आकडेवाऱ्या इथलं प्रशासन कसं गंडत गेलं आणि हि परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे दाखवून देण्यासाठी पुरेश्या आहेत.
त्यामुळे अशा काळात इथल्या शासन आणि प्रशासनाकडून दोन गोष्टी होणं गरजेच्या होत्या. यातील एक तर म्हणजे स्वतः प्रशासनान आक्रमक होऊन परिस्थिती पूर्वपदावर कशी येईल याबाबत पावलं उचलायला हवी होती. किंवा लोक प्रतिनिधींनी प्रशानाकडून आक्रमकपणे योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज होती. पण या गोष्टी झालेल्या दिसून आल्या नाहीत.
त्यामुळे साताऱ्यातील हि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा चंग शासन, प्रशासन यांच्या ऐवजी इथल्या पत्रकारांनी बांधला आहे. काल रात्री अजित पवारांच्या बैठकीत याच उदाहरणच पाहायला मिळालं.
अगदी पहिल्या पासून गोष्ट सांगायची तर त्याच झालंय असं कि, इथले पत्रकार मागच्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतं आहे. यात जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील रोजच्या बातम्या, त्यातून प्रशासनावर टिका, जनतेला सत्य परिस्थिती सांगणं या गोष्टी तर होत आहेतच, पण यात हि काही गोष्टी प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे.
१. पत्रकारांनी पुढाकार घेऊन कंपन्यांना कोव्हिड हॉस्पिटल उभं करायला लावलं :
याबाबत सातारा पुढारीचे संपादक हरीष पाटणे ‘बोल भिडू’ शी बोलताना म्हणतात,
खंडाळा MIDC मध्ये कोट्यवधींचे टर्नओव्हर असलेल्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी स्वतःच्या सीएसआर फंडामधून हॉस्पिटल उभं करणं गरजेचं होतं.
पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही हे काम करण्याचं ठरवलं. त्यासाठी या कंपन्यांची आधी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात लोकप्रतिनिधी देखील होते. या कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून कोरोना हॉस्पिटल बांधण्यासाठी मान्यता मिळवून दिली आणि आता हे हॉस्पिटल उभं राहत आहे.
२. लोकांच्या वतीने थेट उपमुख्यमंत्र्यांना साताऱ्यात येण्यासाठी विनंती :
सातारामधील एका नामांकित दैनिकाचे पत्रकार ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,
सातारची परिस्थिती आटोक्यात आणण्यात इथलं प्रशासन पूर्ण पणे कमी पडलं, प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम न करता केवळ पेपरवर्क करण्याची भूमिका घेतली होती. अशातच हाताखालच्या अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नाही, खाजगी हॉस्पिटल अफाट बिल लावतात, लॅबवाले रिपोर्ट आणि बिलात घोळ घालत होते. जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये वादग्रस्त निर्णय घेतले गेले.
त्यामुळे कुठेतरी हि परिस्थिती बदलण्यासाठी अजित पवार यांनी साताऱ्यामध्ये येणं गरजेचं होतं. म्हणूनच आम्ही पत्रकारांनी मिळून त्यांना मेसेज, फोन करून इथली परिस्थिती कानावर घालत होतो. साताऱ्यात येणं किती गरजेचं बनलं आहे हे सांगत होतो.
अखेरीस २८ तारखेला अजित पवार यांनी साताऱ्यामध्ये येणं मान्य केलं, आणि सोबत आरोग्य मंत्र्यांना देखील घेऊन आले.
३. प्रत्यक्ष बैठकीत पत्रकार अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर व्यासपीठावर ४ मंत्री उपस्थिती होते. जिल्हातील सगळे आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र या सगळ्यांच्या समोरच पत्रकार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
बैठकीत पत्रकारांनी थेट लोकांच्या वतीनं प्रश्न विचारला कि, साताऱ्यात एक तरी निलेश लंके होईल का? कारण पण तसंच होतं. पत्रकारांच्या मते साताऱ्यात १ ते २ लोकप्रतिनिधी सोडले तर एकानेही वेगळ्या बेडची किंवा ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय केली नाही.
यावर अजित पवारांनी बाजू सावरून घेत, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, बाळासाहेब पाटील यांची नाव घेत यांनी व्यवस्था केली असल्याचं सांगितलं. मात्र निलेश लंके यांच्यासारखं काम करणारा एक ही लोकप्रतिनिधी साताऱ्यात नसल्याचं पत्रकारांनी सांगितलं.
https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/521292098871641/
यानंतर गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि पत्रकारांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शंभूराजे म्हणाले, प्रत्येकाचा काम करण्याचा पॅटर्न हा वेगळा असतो. आम्ही आणि इतर आमदारांनी देखील लोकांच्या उपचाराची व्यवस्था केली आहे. आमच्या मतदारसंघात जाऊन बघा असं उत्तर मिळालं.
यानंतर दुसरा मुद्दा आला तो, पुणे आणि मुंबईच्या तुलनेचा. सातारा आणि पुणे हे शेजारचे जिल्हे. पण सातारा आणि पुण्याच्या पॉजिव्हिटी रेटमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. असं का? पुण्यात ५०० आणि साताऱ्यात २ हजार ५०० का? यावर एकही लोकप्रतिनिधी उत्तर दिलं नाही.
त्यामुळे एकूणच सगळ्या पत्रकारांनी मिळून सातारासाठी शासन आणि प्रशासनाला धारेवर धरल्याचं दिसून आलं, आणि हि लढाई आता आम्ही हातात घेतली असून कोरोना आटोक्यात आणणारच हे दाखवून दिलं.
अजित पवार यांनी बैठकीनंतर प्रशासनाला दिलेल्या सूचना
यानंतर अजित पवार यांनी देखील आक्रमक होतं प्रशासनाला दम भरला. ते म्हणाले, मी मजा करायला आलो नाही, मला रिझल्ट हवा आहे. यंत्रणा हलवा, नाही तर कारवाई होणारच. यावेळी त्यांनी काही सूचना देखील दिल्या. यात जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या गावात तीस खाटांचे कोरोना केअर सेंटर, विलीगीकरण कक्ष सुरु करावेत.
गृह विलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध लावून त्यांची पहिल्यांदा करोना चाचणी करा. कडक निर्बंध असतानाही काही नागरीक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी.
शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडीट करा. हे ऑडीट सातत्याने करावे अशा सूचना पवार यांनी केल्या. खोटे रिपोर्ट देणाऱ्यांवर कारवाई करा अशा देखील सूचना दिल्या.
मात्र आता या सूचनांनंतर देखील प्रशासन काम करणारं कि हातावर हात ठेवून सातारची परिस्थिती राम भरोसे ठेवणार हे पाहावे लागणार आहे, मात्र पत्रकार हा प्रश्न धसास लावतील यात शंका नाही.
हे हि वाच भिडू.
- या ठिकाणावरून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा पैसा मोजण्यास सुरवात केली जाते
- कोरोना आटोक्यात आणता न येणं हे पंतप्रधान मोदींचे २ वर्षातील सर्वात मोठे अपयश : सर्वेचे मत
- २१ वर्षाच्या सरपंचाने कोरोनामुक्तीचं गावात उभं केलेलं मॉडेल राज्यात राबवायला हवं…