जिवंत महिलांना पूरून त्यावर झाडं लावणाऱ्या सातारच्या पोळ डॉक्टरचं प्रकरण काय होतं… 

सातारचा एक डॉक्टर आणि सहा खून. प्रत्येक खूनाचं साक्षीदार असणारं एक नारळाचा झाड. २०१६ साली घटना उघडकीस आली आणि माणसं आपल्या शेजारच्याला पण भ्यायला लागली. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, काहीचं कळना झालं. 

सध्या झी वर याच कथानकाच्या धर्तीवर देवमाणूस ही सिरियल चालू आहे. यापूर्वी क्राईम पेट्रोलमध्ये देखील ही घटना दाखवण्यात आली होती.

२०१६ पासून आजही सातारा जिल्हा आणि धोम परिसरात दबक्या आवाजात का होईना कधीतरी पोळ डॉक्टरचा विषय निघतोच. का केलं कशासाठी केलं याची वेगवेगळी कारणं जो तो आपआपल्या मताने पुढे सारतो. कोण म्हणतो डॉक्टर हे सगळं पैशासाठी करायचा, तो बायकांना मारून सोनंनाणं लुटायचा. कोण म्हणतो डॉक्टर किडन्या विकायचा. 

नेमक काय होतं देवमाणसांच हे प्रकरण… 

धोम परिसरात राहणारा डॉ. पोळ हा शांत वाटणारा पण तितकाच चलाख माणूस. तो पंचक्रोशीत डॉक्टर म्हणून काम करायचा. तो ग्रामपंचायच सदस्य देखील होता. त्याच सोबत बनावट नोटा विकणाऱ्यांच्या टोळीचा सुगावा त्याने पोलीसांना दिला होता. पोलीसांना योग्य माहिती देण्याचं देखील काम करायचा. सोबत ॲन्टी करप्शनला माहिती देणाऱ्यांमधला तो एक होता. त्यामुळे शासकिय अधिकारी देखील त्याच्यापासून दोन हात लांब असायचे.

वरवर पहाता कोणाला संशय येणार नाही असा हा देवमाणूस. नाही म्हणायला तो सुरवातीच्या काळात एका गावात काम करत असताना लोकांनी स्रीयांशी लगट करतो म्हणून त्याला मारहाण केली होती अस सांगण्यात येत. त्यानंतर तो दूसऱ्या पंचक्रोशीत काम करु लागलेला. इथं मात्र सगळं सुरळीत चालू होतं.

एका चांगल्या दवाखान्यात ICU विभागाचा प्रमुख म्हणून तो काम पहात असे. साधारण रात्रपाळीतच तो काम करायचा. शिवाय भुलतज्ञ अस स्वत:ला बिरूद देखील त्यानं लावून घेतलेलं. 

थोडक्यात काय डॉक्टरांच सगळं चांगल चाललेलं होतं. 

दूसरीकडे वाई परिसरातून सुरेखा नावाची एक महिला २००३ साली गायब झाली होती. पोलीसांना आपल्या परीने या गोष्टींचा माग काढण्यास सुरवात केली होती पण त्यात यश आलं नाही. सुरेखा यांच्या गायब होण्याची फाईल तशीच धुळ खात राहिली.

त्यानंतर २००६ साली वनिता गायकवाड यांची देखील गायब होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपास सुरू झाला पण हाती काहीच लागलं नाही. चार वर्ष होवून गेली. फाईलवर धुळ साचली. 

२०१० साली पून्हा एकदा सेम केस समोर आली. जगाबाई नावाच्या महिला गायब झाल्या. एकाएकी गायब होणाऱ्या या तीन महिला. २००३-२००६-२०१३ या वर्षा परिसरातून या महिला एकाएकी गायब झाल्या. त्या कुठे गेल्या हे एक रहस्यचं झालं होतं. पण अंतर जास्त असल्याने या तिन्ही केसचा एकमेकांशी संबंध कोणीही लावला नव्हता.  

दोन वर्ष झाली आणि २०१२ साली परिसरातला एक सोनार गायब झाला. गायब होणारा हा पहिला पुरूष. नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली पण हाती शून्य. पुन्हा फाईल धुळ खात पडली. 

पुलाखालून बरचं पाणी गेलं, साल उगवलं २०१६ चं. १७ जानेवारी २०१६ साली सलमा नावाची नर्स गायब झाल्याची तक्रार आली. पोलीस तपास करु लागले. पण यातही विशेष अस काही सापडू शकलं नाही. 

मात्र या वर्षीचं जून महिन्यात दूसरं प्रकरण समोर आलं, 

१५ जून २०१६ साली परिसरातील अंगणवाडी सेविका मंगला जेधे गायब झाल्या. 

ही घटनाचं डॉक्टरचा पर्दाफाश करणारी ठरली. कारण मंगला जेधे या अगंणवाडी सेविका असल्या तरी त्या राज्याच्या अंगणावाडी सेविकांच्या प्रमुख होत्या. राजकीय नेत्यांचे त्यांचे संबंध चांगले होते. शिवाय इतर संस्था संघटनांमध्ये त्यांची उठबस होती. त्या गायब झाल्या आणि प्रकरण तापू लागलं. मोर्चे निघू लागले. राजकिय नेत्यांचा दबाव वाढू लागला. मिडीयातून बातम्या चर्चेला आल्या आणि प्रकरणाने वेग घेतला. 

प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासात जेधे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. तेव्हा या कॉल रेकॉर्डमध्ये ज्योती मांढरेचा नंबर आढळला. संशय म्हणून तिला ताब्यात घेण्यात आलं. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी ज्योती मांढरे पोलीसांचा खाक्या दाखवताच पोपटासारखी बोलू लागली.

तिनेच सांगितलं की, 

मी मंगला जेधेंना डॉक्टरांच्या फार्महाऊसवर घेवून गेली होती. 

डॉक्टर पोळ यांच एक फार्म हाऊस होतं. अडीच तीन एकरावर असणारा हा फॉर्म हाऊस. अस म्हणतात की डॉक्टरने ही शासनाची जागा फेरफार करुन लाटली होती. इथे तो पोल्ट्री फॉर्म उभारणार होता. तो लोकांना तसं सांगायचा देखील पण इथे एकही कोंबडी नव्हती. इथे त्याचं फार्म हाऊस आणि दारात नारळाची झाडं आणि त्यासाठी खणलेले खड्डे होते. 

ज्योती मांढरेला ताब्यात घेताच पोळ डॉक्टर पसार झाला. त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं. कबुलीजबाबानंतर त्याला त्याच्या फॉर्महाऊसवर घेवून जाण्यात आलं तेव्हा एकामागून एक असे सहा खून केल्याची कबूली त्याने दिली. नारळाची झाडे तोडण्यात आली. जमीन उकरण्यात आली तेव्हा तिथे सहा हाडांचे सापळे मिळाले. 

आणि एकामागून एक डॉक्टर पोळचे कारनामे बाहेर येऊ लागले. अत्यंत शांत डोक्याने तो ही कामे करायचा. दोन तीन महिन्यांपूर्वीचं सावज हेरून ठेवायचा. त्यासाठी JCB बोलावून घेवून खड्डे खोदायचा. जेव्हा पोलीस फॉर्म हाऊसवर आले तेव्हा तिथे एक खड्डा पूर्वीच खोदलेला दिसला. पोलीस चौकशीत हा खड्डा त्याने साथीदार ज्योती मांढरेसाठी खोदला असल्याचं निष्पन झालं होतं. 

डॉक्टर पोळ पंचक्रोशीत फेमस होता. लोकांशी चांगल बोलून सलगी करायचा. विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना तो आपल्या फार्महाऊसवर बोलवायचा, तिथे भूलीचं इजेंक्शन द्यायचा. भूल दिल्यानंतर डॉक्टर आपल्यासोबत काय करतोय हे त्यांना दिसायचं. पण शरीर कोणतीच हालचाल करु शकायचं नाही.

जिवंतपणी त्यांना आपण खड्यात गाडले जातोय हे दिसायचं, पण भूलीचा माणूस करणार तरी काय? 

मंगला जेधे पुण्याला कामानिमित्त चालल्या होत्या तेव्हा ज्योती मांढरे त्यांना घेवून डॉक्टरच्या फार्महाऊसवर आल्या. डॉक्टरने प्रवासात अंगदुखी होईल अस सांगत मोठ्या शिताफीने त्यांना इंजेक्शन दिलं होतं. याचवर्षी झालेल्या नर्सच्या प्रकरणात डॉक्टर व त्या नर्सची भांडणे झाली होती. डॉक्टर ज्या दवाखान्यात ICU विभागात भूलतज्ञ म्हणून काम करायचं तिथेच ही नर्स होती. त्याच्याबरोब वाद झाल्यानंतरच नर्स गायब झाल्या होत्या.

पूर्वीच्या प्रत्येक प्रकरणात डॉक्टरचं नाव आलं होतं, पण संशय आला नव्हता. अनेकांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला होता पण तो शिताफीने यातून बाहेर पडायचा. सोनाराच्या हत्येमध्ये डॉक्टरने त्यांच्याकडून उधारीवर सोने घेतले होते. जेव्हा सोनार पैसे मागू लागला तेव्हा शिताफीने त्यांना फार्महाऊसवर बोलावून संपवण्यात आलं. 

डॉक्टर सायको होता का? त्याने हे सगळं कशासाठी केलं? 

सायको तर नाहीच, अत्यंत शांत डोक्याने तो हे सगळं करायचा. भूलीचं इजेक्शन द्यायचा. अंगावरचं सोननाणं काढून घ्यायचा. आपल्याच दारापूढे खड्डे खोदून त्यांना पूरायचा व वरती नारळाचं झाड लावायचा. असा हा विकृत माणूस.

काहीजण म्हणतात तो शरिराचे अवयव देखील चोरायचा पण या सर्व गोष्टी पोलीस तपासाच्या. अजूनही बऱ्याच गोष्टींवर शिकामोर्तब होवू शकलेलं नाही हेच खरं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.