बिनविरोध निवडणूकीमुळं बंटी पाटील आत्ता राज्याचे नेते झालेत…

कोल्हापूरच्या राजकारणात लय राडा सुरू असतोय. उभ्याने राडे होणाऱ्या या जिल्ह्याचा एक प्रोब्लेम हमखास राहिलाय. तो प्रोब्लेम म्हणजे इथे नेता तयार होत नाही. म्हणजे कसय बघा शेजारच्या सांगली जिल्ह्याला ४ वेळा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळालाय. साताऱ्याला दोन वेळा हा मान मिळालाय पण कोल्हापूराकडं मुख्यमंत्रीपद फिरकल सुद्धा नाही… 

थोडक्यात काय तर कोल्हापूरच्या राजकारणात टिकून राज्याचा नेता होणं ही लय अवघड गोष्टय. पण बंटी पाटलांच्या रुपात आत्ता कोल्हापूर राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घाललं अस वाटायला लागलय..

कारण म्हणजे आजची झालेली त्यांची बिनविरोध निवडणूक…

या निवडणूकीमुळं बंटी पाटील आत्ता स्थिरावल्यात जमा आहेत. दूसरीकडे एकेकाळच्या सांगलीबद्दल सांगायचं तर इथून एकेकाळी आर.आर.आबा, पतंगराव कदम आणि जयंत पाटील असे तीन तीन कॅबिनेट असायचे. साताऱ्याकडे तर पृथ्वीराज बाबांच्या रुपात मुख्यमंत्रीपद होतं. पण काळ सरला… आत्ता पवारांच बारामती सोडलं तर संबंध खालच्या पट्ट्यात राज्यपातळीवर जाईल असे फक्त जयंत पाटील अन् बंटी पाटील हे दोनचं नेते सक्रीय राहिलेत…

साहजिक बंटी पाटीलांसाठी ही बिनविरोध निवडणूक राज्याचा नेता करणारी आहे… 

पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्याची राजधानी म्हणून कोल्हापूरला ओळखल जाऊ शकतं. छत्रपती घराण्याच्या गादीचा मान असलेली करवीर नगरी राजकारणाचं देखील प्रमुख केंद्र होती. राजर्षी शाहू महाराजांच्या रूपाने सामाजिक राजकीय चळवळ कोल्हापुरात सुरु झाल्या आणि त्याला संपूर्ण देशाने फॉलो केलं.

पण पुढे स्वातंत्र्यानंतर मात्र कोल्हापूरचं राज्याच्या राजकारणात म्हणावं तसं इम्प्रेशन पडलं नाही. तस बघायला गेलं तर कोल्हापुरात रत्नाप्पा कुंभार यांच्या सारखं नेतृत्व उभं राहिलं पण त्यांना स्थानिक राजकारणात इतकं अडकून पाडण्यात आलं की मुख्यमंत्रीपदाची क्षमता असूनही तिथं पर्यंत मजल मारता आली नाही.

कोल्हापूरचं राजकारण नेहमी श्रेष्ठी गट विरुद्ध कुंभार गट, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ, माने विरुद्ध आवाडे, बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक असंच एकमेकांच्या कुरघोडीचं राहिलं. नाही म्हणायला इथं राजू शेट्टींच्या सारखं ऊस शेतकऱ्यांच्या संघर्षातुन नेतृत्व उभं राहिलं, देशभरात त्यांच्या नावाचा बोलबाला देखील झाला होता. पण आंदोलनातून उभ्या राहिलेले राजू शेट्टी हे ठरवून देखील सत्तेच्या राजकारणात सामील होऊ शकत नाहीत.

म्हणूनच गेली कित्येक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याला नेता नव्हता.

पश्चिम महाराष्ट्र आणि इथला ऊस पट्टा राज्याच्या राजकारणावर पकड ठेवतो असं आजवर बोललं जात आलंय. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजच्या शरद पवार अजित पवार यांच्या पर्यंत हे खरं देखील आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही सातारा, सांगली, पुणे, काही प्रमाणात सोलापूर हे जिल्हे अग्रेसर राहिले. एकट्या कराडने दोन मुख्यमंत्री दिले. सांगली जिल्हयात तर वसंतदादा पाटलांच्या रूपात मोठा नेता मिळाला. त्यांच्या मुळे पुढच्या अनेक पिढ्या तयार झाल्या. सांगली जिल्ह्यातही नेतृत्वामध्ये संघर्ष होता पण तरी राजारामबापू यांच्यासारखा सर्वव्यापी नेता घडला.

मध्यंतरी तर राज्याच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी आर.आर.पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम असे मातब्बर नेते गृह, अर्थ, उद्योग असे ताकदवान मंत्रालये सांभाळत होते. तर प्रतीक पाटील थेट केंद्रीय कॅबिनेटमध्ये आपली जागा राखून होते.

हे सगळं घडत होतं तेव्हा कोल्हापूर मात्र आपल्या साखर कारखान्याच्या लढाया, गोकुळचे निवडणूक यातच व्यस्त राहिलं.

२०१४ ची मोदी लाट मात्र संपूर्ण देशाचं राजकारण बदलवणारी ठरली. महाराष्ट्रातील देखील कित्येक साखर सम्राट धुळीस मिळाले. मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच भाजपचे देवेंद्र फडणवीस आले. त्यांनी सहकारात असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना हादरा दिला. कित्येकजण पराभूत झाले, कित्येक जण भाजपमध्ये गेले.

सांगली जिल्ह्यातील आर.आर.पाटील, पतंगराव कदम यांसारख्या नेत्यांचं निधन झालं. प्रतीक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला. सातारा जिल्ह्याच देखील पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्री पद गेल्यापासून वर्चस्व कमी झालं. उदयन महाराज शिवेंद्र राजे यांच्यातील वाद संपलेले नाहीत. तिकडे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय गृहमंत्रीपद मिळून सुद्धा आपला हक्काचा मतदारसंघ टिकवणे जमलं नाही.

२०१४ साली कोल्हापुरात देखील सतेज पाटलांचा पराभव झाला होता.

सुप्रसिद्ध शिक्षण महर्षी डी.वाय पाटील यांचे चिरंजीव असणारे सतेज पाटील कॉलेजच्या जीवनापासून राजकारणात सक्रिय होते. एनएसयुआयच्या माध्यमातून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलची पहिल्यांदा निवडणूक जिंकली.

पुढे सतेज पाटील सक्रिय राजकारणात आले,  २००४ साली आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांना पराभूत केलं. एक जायंट किलर म्हणूनच राजकीय कारकीर्द सुरु केली. लवकरच मंत्रिमंडळात देखील गेले.

विलासराव देशमुख असोत कि पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते म्हणून ओळखलं जाऊ लागले.

२०१४ साली भाजपच्या तंबूत गेलेल्या महाडिकांनी सतेज पाटलांना हरवलं. लोक म्हणाले सतेज पाटील संपले. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद. जोडीला दोन आमदारकी आणि एक खासदारकी घेवून महाडिक घराणे कोल्हापूरच्या राजकारणात प्रस्थापित झाले.

पण या पराभवापासून सतेज पाटलांनी ठरवलं, आता फक्त जिंकायचं.

मांजराला जितकं कोपऱ्यात दाबलं जातं तितकं ते उसळी घेवून वर येत हा साधा नियम महाडिक गटाला समजला नाही.

सतेज पाटलांनी पुढच्या पाच वर्षात काय केलं हे सांगायचं झालं तर कागलच्या विक्रमसिंग घाटगेच्या शब्दात  सांगायला लागतं. ते म्हणाले होते,

“हा माणूस सकाळी एका अंत्ययात्रेत दिसतो. दूपारी लग्नात असतो.सायंकाळी बारश्याच्या कार्यक्रमात असतो तर रात्री कुणाच्यातरी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी असतो.”

पाटलांनी घराघरात संपर्क साधला. गल्ल्यान् गल्ल्या पिंजून काढून आपला स्वत:चा असा गट उभा केला. बावड्याच्या आसपासचा कोल्हापूर शेजारच्या खेडापाड्यातला तरुण एकत्रित बांधायला बंटी पाटलांनी सुरवात केली. इथे बंटी पाटलांच राजकारण पक्क बांधलं गेलं.

त्यांनी पहिला घाव घातला तो थेट अप्पा महाडिकांवर.

सलग १८ वर्षेकोल्हापूरच्या  विधानपरिषदेच्या जागेवर निर्विवादपणे वर्चस्व ठेवणारे महादेवराव महाडिक सतेज पाटलांकडून पराभूत झाले. महानगरपालिका असो  २०१९ ची लोकसभा,विधानसभा असो किंवा या वर्षी झालेलं गोकुळ. सतेज पाटलांनी एकहाती वर्चस्व निर्माण केलं.

लोकसभेवेळी त्यांनी पक्षीय आघाडी बाजूला ठेवली आणि ठरवून संजय मंडलिकांना निवडून आणलं. विधानसभेत आपला पुतण्या ऋतुराज पाटीलच नाही तर आजूबाजूचे चार आमदार निवडून आणले. संपूर्ण राज्यात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात मात्र मोठा विजय मिळाला.

आज बघायचं झालं तर पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत आपापल्या भागात निर्विवाद वर्चस्व असणारे काही मोजके नेते शिल्लक आहेत. यात पवार कुटुंबीयांशिवाय सांगलीत जयंत पाटील आणि कोल्हापुरात सतेज पाटील हे दोनच मोठे नेते दिसतात.

तस बघायला गेलं तर कागलमध्ये हसन मुश्रिफांनी देखील आपला डंका वाजवलाय. 

पण मुश्रीफांच्या तुलनेत सतेज पाटलांच्या बाजूने वय आहे. ते तरुण आहेत. सर्व बाजुंनी खंबीर आहेत. थेट महाडिकांना टक्कर देत त्यांनी गोकुळ पासून पदवीधर शिक्षक विधानपरिषदे पर्यंत सर्व ठिकाणी विजय मिळवलाय.

या वेळी देखील प्रचार सुरू असताना कोल्हापुरात एकच चर्चा होती. महाडिकांना निवडून दिल तर कोल्हापूरला एक आमदार मिळेल पण जर सतेज पाटलांना निवडून दिलं तर राज्यात नेतृत्व करणारा मोठा नेता मिळेल. आजच्या बिनविरोध निकालाने सतेज पाटलांनी ते सिद्ध केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.