राज्यात कडक निर्बंध आणि बंटी पाटील गोकुळच्या प्रचारात व्यस्त…!

तुमचं ठरलय पण कोरोनाचं उरलय…

कधी कुणाचा नेम देता येत नाही. आजवर बंटी पाटील म्हणजे राज्यातले समंजस नेतृत्त्व म्हणून गणलं जायचं. पण कसय निवडणूका लागल्या की भलेभले गंडतात. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटी गंडलेत.

झालं अस की त्यांनी फेसबुकवर फोटो टाकले, हे फोटो आहे गोकुळच्या इलेक्शन प्रचाराचे. 

पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक हिशोबाची गणितं ज्यांना माहित नाहीत त्यांना सांगायला गोकुळ इस्कटून सांगायला पाहीजे. 

गोकुळ हा दुध उत्पादक संघ. नुसता दुध संघ नाही तर महाराष्ट्रातला सर्वात टॉपचा दुध संघ आहे. हिशोबात सांगायचं तर एकट्या मुंबईत रोजची दुधाची विक्री ५ लाख लिटरच्या घरात आहे.  २००० च्या दरम्यानची कर्मचारी संख्या असणारा या संघाचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे २३८२ कोटी इतका आहे. 

उडल्या न फ्युजा…!

साहजिक इतकी मोठ्ठी मलईदार पार्टी असल्यामुळं सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष्य गोकुळच्या इलेक्शनवर लागून असतय. इथल्या इलेक्शन म्हणजे गावची आमदार खासदारांना पण लोळवणारी. 

असो तर  कालपासून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्याचा हा फोटो खाली देत आहोत. 

Screenshot 2021 04 23 at 4.13.13 PM

सहज म्हणून माणसं मोजली तर ती ३५ च्या वर पोहचली. आत्ता फोटोत ज्यांचे फक्त मुंडकीच दिसत्यात. फक्त पायचं दिसत्यात त्यांना मोजलं नाही तरी ३५ च्या दरम्यानच गाडी जात्या. दूसरं म्हणजे सभा म्हणल्यावर लोकं गोळा होणारच ती झालेली देखील. 

आत्ता इथे असणाऱ्या उपस्थितांची नावे पहा, 

ना. राजेंद्र पाटील यड्रावकर (खुद्द आरोग्य राज्यमंत्री) ,खा. संजय मंडलिक, माजी खा. निवेदिता माने वाहिनी, आ. राजेश पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके, माजी आ. उल्हास पाटील, दत्त साखरचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील, गोकुळ माजी संचालक दिलीप पाटील, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह  पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सर्जेराव शिंदे, वैभव उगळे, प्रकाश पाटील-टाकवडेकर, विलास गाताडे, भीमगोंडा बोरगावे,  शिरोळ पंचायत समिती सभापती कविता चौगुले, जिल्हा बँक संचालक  बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, भवानीसिंह घोरपडे, विद्याधर कुलकर्णी, भोला कागले, तातोबा पाटील सोबत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे सर्व उमेदवार.

आत्ता प्रकरण क्रमांक दोन मध्ये पंढरपुर मंगळवेढ्याची लागलेली वाट पाहूया. 

याबाबतची बातमी ABP माझाने प्रकाशित केली होती. यात सांगण्यात आलं होतं की पंढरपुर मंगळवेढ्यात घरटी रुग्णांची संख्या वाढली आहे. तपासणी नसल्याने मर्यादित प्रमाणात ही संख्या समोर येत आहे. या निवडणूकीत सहभागी असणारे संजयमामा शिंदे, अमोल मिटकरी, बाळा भेगडे असे अनेक नेते देखील कोरोना पॉजिटिव्ह झाले आहेत. 

९ एप्रिलला मंगळवेढ्यात ४२ तर पंढरपुरात १५१ करोना रुग्ण आढळले. आत्तापर्यन्त पंढरपुर तालुक्याचा स्कोअर ११,३०० आहे तर २६४ जण दगावले आहेत. निवडणूकीनंतर पंढरपुराचा दिवसाचा स्कोअर ६० वरून २४६ च्या घरात पोहचला आहे.

अशी ही बातमी. 

अशा वेळी पालकमंत्री म्हणून बंटी पाटलांची, आरोग्य राज्यमंत्री म्हणून यड्रावकरांची जबाबदारी महत्वाची आहे. बघा एखादी निवडणूक बिना प्रचाराची पार पाडता येत्या का?

आत्ता या गोष्टीवर ते काय करतात हे काय करतात अशी चर्चा होईल. पण काहीही बोललं आणि असच वागत राहिलं तर कोरोना मात्र वाढत राहिलं. गोकुळ तर आहेच पण त्याअगोदर करोना आहे. तुमचं कितीही ठरलं असलं तरी कोरोनाचं अजून उरलय. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.