पारले ब्रिटानिया पेक्षाही एकेकाळी पुण्याच्या साठे बिस्किटाची जास्त हवा होती.

आजचा जमाना ओरिओ, हाईड अँड सिक, बॉरबॉन आणि असल्या हाय फाय नावाच्या कुकीज आहे. सध्याच्या पिढीला पारले-जी, मारी, मोनॅको, क्रॅक जॅक वगैरे बिस्कीट सुद्धा दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात पुण्याच्या साठे नावाचं बिस्कीट होतं हेच खूपजणांना नवीन असेल.

होय पुण्याच्या साठेंच बिस्कीट होतं आणि ते अख्ख्या भारतात राज्य देखील करायचं.

गोष्ट आहे ऐंशी वर्षांपूर्वीची.

स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ. त्याकाळात भारतात बिस्किटे फक्त ब्रिटिशांच्या कारखान्यात बनणारी मिळायची. हि बिस्किटे कशापासून बनली आहेत यावर कोणाची खात्री नसायची. अनेक अफवा पसरायच्या. म्हणूनच कित्येक भारतीय या बिस्किटामुळे आपला धर्म बाटेल या भीतीने त्याच्यापासून दूर असायचे.

अशातच स्वातंत्र्यलढा सुरु होता. आपले नेते कानीकपाळी ओरडून स्वदेशी वापर  करा म्हणून आग्रह करायचे. यातून प्रेरणा घेऊन अनेक अस्सल भारतीय उद्योग उभे राहु लागले होते. यातीलच एक कारखाना म्हणजे साठे बिस्कीट.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती.यातूनच पुण्याच्या गणेश रामचंद्र साठे यांनी बिस्किटाचा कारखाना सुरु करायचं ठरवलं. सुरवातीला त्यांची आईच घरात बिस्कीट बनवायची आणि साठे स्वतः सायकलवरून फिरून हे बिस्कीट विकायचे.

आपल्या ओळखीतल्या साठे नावाचा माणूस घरात बिस्कीट बनवतोय म्हणजे चोखंदळ पुणेकरांनी त्याची क्वालिटी बद्दल शंका घेण्याचं काही कारणच नव्हतं. साठेंच्या आईच्या हाताला चव देखील चांगलीच होती. या माऊलीने कष्टाने मन लावून बनवलेली बिस्किटे इंग्रजी कुकीज पेक्षाही कितीतरी पटीने भारी होती.

थोड्याच दिवसात साठे बिस्कीट फेमस झालं. त्यांनी भवानी पेठेत गाळा घेऊन तिथे बिस्कीट बनवण्याचा कारखाना थाटला. १९४९ साली आपली कंपनीदेखील रजिस्टर केली. कोणतंही फॅन्सी इंग्रजी नाव घेण्यापेक्षा साठे बिस्कीट हेच नाव कायम ठेवलं.    

पन्नासच्या दशकात त्यांनी प्रचंड प्रगती केली. गणेश साठेंनी विश्रांतवाडी येथे मोठा कारखाना सुरु केला. फक्त बिस्कीटच नाहीत तर मिल्क चॉकलेट, ड्रिंकिंग चॉकलेट बनू लागलं. खास बनवलेल्या पत्र्याच्या गोल डब्ब्यात हि बिस्किटे मिळायची. त्याच्यावर एका छोट्या मुलीचं चित्र असायचं.

आळंदीला शाळांच्या सहली निघाल्या कि त्या हमखास धानोरीला साठे बिस्किटच्या कारखान्याजवळ थांबायच्या. मुलांना बिस्किटाचा कारक्षण फिरून दाखवला जायचा. जाताना त्यांच्या बस मध्ये विद्यार्थ्यांना खायला बिस्किटाचे टिन दिले जायचे. आजही पुण्यात वाढलेल्या प्रत्येकाला या सहली आठवत असतील.

आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून देण्याकडे साठेंचा कल असायचा. अगदी गिर्यारोहण करणाऱ्या तरुणांना देखील ते बिस्कीट आणि ड्रिंकिंग चॉकलेटचे टिन पाठवून द्यायचे.

 

आधी पुणे मग मुंबई करता करता महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या शहरात साठे बिस्किटाची दुकाने उभे राहिली. या बिस्किटाची डिलरशिप घेतलेल्या दुकानाबाहेर साठे बिस्कीट हा बोर्डच असायचा. त्या त्या गावात हे दुकान साठे बिस्कीट म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

त्यांच्या जाहिरातीदेखील फार कल्पकपणे होत्या. गिरगाव चौपाटी समुद्रात बोटीवर साठे बिस्किटं नावाचा निऑन साईनची अक्षर असलेली बोट रात्रीच्या वेळी समुद्रात फिरत असत

त्याकाळच्या मासिकात लहान मुले खेळत बागडत आहेत आणि साठे चॉकलेट खाणारी मुले अशीच आनंदी व खेळकर असतात असं संदेश लिहलेला असायचा. या चॉकलेटला साठे कॅडबरी म्हणून देखील ओळखलं जायचं. खऱ्या ब्रिटिश कॅडबरीला त्यांच्या चवीच्या तुलनेत कुठेच टिकत नव्हती.

त्यांचे गोल बिस्कीट, ग्लुकोज बिस्कीट, खारे बिस्कीट प्रत्येक पदार्थाने दर्जा जपला होता. ऐनभरात असताना साठे बिस्कीटबरोबर स्पर्धा करणे पारले ब्रिटानियाला जमले नव्हते. कित्येक जण तर पारले हे साठे बिस्किटला कॉपी करायचे अशी आठवण सांगतात.

विश्रांतवाडी धानोरी भागात गेलं कि साठे बिस्किटाचा खरपूस वास आसमंतात भरून राहायचा.

पुढे मात्र घरगुती करणे, कोर्टकचेऱ्या यात साठे बिस्कीट अडकून पडले. मालकी हक्क वरून वाद झाले. नव्वदीच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणानंतर बदललेल्या जगाकडे लक्ष द्यायला साठे बिस्कीट सक्षम राहिले नाही. भारतातील नम्बर एकचे बिस्कीट तग धरण्यासाठी धडपडू लागले. पण ते जमलेच नाही.

याच काळात साठे बिस्किटाचा पुण्याचा कारखाना बंद पडला. त्या जागी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. पण तिथला बस स्टॉप साठे बिस्कीट म्हणूनच ओळखला जातो.

आजही पुणेकरांना तो साठे बिस्किटाचा टिनचा डब्बा, विश्रांतवाडीत गेल्यावर येणारा बिस्किटाचा वास, ती चॉकलेटची खास रेंगाळणारी चव आठवत राहते. हि पिढी गेली तर येणाऱ्या पिढयांना मराठी माणसाच्या नावाचं बिस्कीट होत आणि ते एकेकाळी देशाच्या जिभेवर राज्य करत होतं हि एखादी ठेवणीतील दन्तकथा म्हणूनच उरेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.