दिल्लीला गेलेल्या नागपूर काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न पडला, आता घरी कसं परतायचं ?

२१ जुलै १९७४, काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन दिल्लीमध्ये भरणार होते. संपूर्ण देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते या अधिवेशनासाठी राजधानी कडे रवाना होत होते.

त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते डॉ.शंकर दयाळ शर्मा मात्र पक्षाची सगळी सूत्रे पंतप्रधान इंदिरा गांधींकडे होती. त्या तेव्हा आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यांचे सल्लागार तर उघडपणे इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया असं म्हणत होते. ७१ च्या युद्धात पाकिस्तानला हरवून बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधींना विरोधक देखील नवदुर्गा म्हणून कौतुक करत होते.

काँग्रेसच्या त्या अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण इंदिरा गांधी आणि नव्यानेच राजकारणात येत असलेले त्यांचे चिरंजीव संजय गांधी हे होते.

त्याकाळी काँग्रेस अधिवेशनाच राष्ट्रीय राजकारणात महत्व अबाधित होते. पक्षाच्या धोरणाची दिशा या अधिवेशनामधून ठरवली जायची, अनेक धोरणात्मक निर्णय तिथे घेतले जायचे. कार्यकर्त्यांना बोलायची संधी मिळायची. त्यांची मते विचारात घेतली जायची.

नागपूर मधून देखील अनेक कार्यकर्ते या अधिवेशनासाठी जाण्यास उत्सुक होते. काँग्रेसमध्ये त्याकाळी पद्धत होती कि अधिवेशनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा खर्च पक्ष करणार. नागपूर मधून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वेने पाठवायचं ठरलं. हि जबाबदारी देण्यात आली नागपूर युथ काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी.

सतीश चतुर्वेदी आपल्या हिशोबीपणासाठी आणि आपल्या करामतींसाठी त्याकाळी देखील फेमस होते.

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेल्या नाईकांनी म्हणे तेव्हा चतुर्वेदींना जबाबदारी सोपवण्यापूर्वी स्टॅम्प पेपर वर निधीची विल्हेवाट योग्य पध्द्तीने करेन असं लिहून घेतलं होतं. फक्त नागपूरचं नाही तर विदर्भाच्या ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं नाव नोंदवलं.

ठरल्याप्रमाणे मोठ्या जल्लोषात नागपूरवरून कार्यकर्ते दिल्लीला निघाले. त्यांच्यासाठी खास बोगी बुक केलेल्या होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याची चोख व्यवस्था सतीश चतुर्वेदींनी केलेली होती. नागपूर वरील काँग्रेसचे स्वयंसेवक उत्साहात दिल्लीला पोहचले. तिथल्या कार्यक्रमात भाग घेतला.   

काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.शंकर दयाळ शर्मा यांचं अभ्यासू भाषण ऐकलं. इंदिरा गांधींना बघण्याची त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातून पहिल्यांदाच दिल्लीला गेलेल्या या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला. राजधानी अनुभवणे त्यातही इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवनराम अशा मोठ्या नेत्यांना भेटणे ही त्यांच्यासाठी अपूर्वाईच होती.

कार्यक्रम संपला आणि परत जाण्याची वेळ आली. तेव्हा अचानक कोणाच्यातरी लक्षात आलं की सतीश चतुर्वेदी यांनी परतीचे तिकीट बुकिंगचं केलं नव्हतं.

काँग्रेस कार्यकर्त्यांचं धाबं दणाणलं. कित्येक जणांकडे राहण्या खाण्या इतके देखील पैसे नव्हते. त्यात दिल्लीची ओळख ठगांची दिल्ली अशी होती. कधी कोण येऊन लुटून जाईल कल्पना नाही. दिल्लीच्या स्टेशनवर हे सगळे कार्यकर्ते आपलं सामान गेहून निराधार उभे होते. कोणालाच काय करावे हे समजत नव्हतं. त्याकाळी मोबाईल फोनची वगैरे सोया नसल्यामुळे कोणालाही संपर्क करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती.

अशातच कोणी तरी सांगितलं कि यशवंतराव चव्हाणांना जाऊन भेटा. कशीबशी मंडळी यशवंतरावांकडे जाऊन पोहचली. यशवंतराव तेव्हा देशाचे गृहमंत्री होते. त्यांना हा वृत्तांत समजल्यावर धक्काच बसला. त्यांनी व इतर काही महाराष्ट्राच्या नेत्यांनी पैशांची जुळवाजुळव करत या विदर्भाच्या कार्यकर्त्यांची नागपूरला रवानगी केली.

सतीश चतुर्वेदींनी नागपूर काँग्रेसला चांगलंच तोंडघशी पाडलं होतं. खास वैदभीर्य स्टाइलचा ‘चक्कलस’ नेता म्हणून तेव्हापासून ते प्रसिद्ध झाले.

कधी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर शाई फेकण्याचे प्रकरण असो किंवा माणिकराव ठाकरेंच्या सोबत पक्ष निधीची चर्चा पत्रकारपरिषदेत माईक सुरु असताना करणे असो सतीश चतुर्वेदींच्या मागे वाद कधी संपलेच नाहीत. निवडणूक त्यांनी भरपूर जिंकल्या मात्र पक्षात वजन असूनही त्यांचे हिशोब चुकतच गेले. आता हे हिशोब खरंच चुकले कि त्यामागे काही राजकीय हिशोब होते हे मात्र कळायला काही मार्ग नाही.

संदर्भ – ‘चतुर’वेदींमुळेच माणिकराव तोंडघशी महाराष्ट्र टाइम्स 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.