पुण्यात साधं मेडिकल होतं, आज जग गाजवणारा औषध उद्योगांचा सम्राट बनलाय..
आजवर आपण अनेक यशस्वी लोकं पाहिलेत. कठीण काळात आलेल्या संकटाला तोंड देऊन ,अडी अडचणींवर मत करून या लोकांनी आपलं ध्येय गाठलं. कुठल्याही कामाला कमी समजलं नाही. मिळेल ते काम केलं , अर्धपोटी राहून दिवसरात्र मेहनत घेतली आणि यश संपादन केलं. शून्यापासून सुरवात करून जगभरात नाव करणारी अनेक उदाहरणं आपल्यात आहेत.
आजचा किस्सा म्हणा किंवा संघर्षगाथा अशीच प्रेरणादायी आहे. पुण्यापासून सुरु झालेला प्रवास जगभरात नाव कमावून देणारा ठरला. साध्या मेडिकल दुकानाचा मालक पुढे जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत झळकतो हि काय छोटी गोष्ट नाही. संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर जगात सर्वदूर नाव पोहचू शकतं याबद्दलची हि यशोगाथा.
श्री. सतीश रामलाल मेहता यांनी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरवात केली. सुरवातीच्या काळात सतीश मेहता यांचे वडील एका गोळ्या औषधं तयार करणाऱ्या दुकानात वितरकी म्हणून काम करत होते. या कामात जास्त फायदा होत नसला तरी कुटुंबासाठी करावं लागत होतं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पैशांची हयगय केली नाही.
सतीश मेहता हे शाळेत आणि महाविद्यालयीन काळात अभ्यासात हुशार होते. पुणे विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेत आणि रसायनशास्त्रात [ केमिस्ट्री ] मध्ये पदवी मिळवली. पुढे काहीतरी वेगळं करायचा त्यांचा उद्देश होता. शिक्षणात हुशार असल्याने आणि शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी मॅनेजमेंटच्या इंडियन इन्स्टिट्यूटमधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा विषयात पदवी प्राप्त केली.
महाविद्यालयीन काळात त्यांचा जास्त कल हा रसायनशास्त्रात असल्याने त्यांनी फार्मास्युटिकल शाखेत आपलं लक्ष वळवलं. या क्षेत्रात त्यांनी बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर भर देत ते शिक्षण आत्मसात केलं. वडील ज्या फार्मा कंपनीत गोळ्या औषधं वितरित करत होते तिथला अभ्यासही त्यांनी केला.
सतीश मेहता याना फार्मास्युटिकल उद्योगाचा मोठा आणि दांडगा अनुभव होता. या मार्केटमध्ये आपलं स्थान टिकून राहावं यासाठी त्यांनी पुण्यामध्ये एक आपलं छोटंसं मेडिकल सुरु केलं. खासगी असलेलं हे मेडिकल त्यावेळी जास्त प्रमाणात कमाई करून देणारं नसलं तरी व्यावसायिक क्षेत्रात त्यांचं हे पहिलं पाऊल होतं.
या क्षेत्रातल्या मोठमोठ्या व्यावसायिकांशी आणि उद्योगपतींशी ते सतत चर्चा करत असायचे. मेडिकल सोडून अजून नवीन काय करता येईल , फार्मास्युटिकल क्षेत्र जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आहे तर आपण या टंकाई नवीन भर घालू शकतो यावर ते अभ्यास करत राहिले.
हळूहळू वाढत्या मागणीनुसार त्यांनी गोळ्या औषध तयार करणारी आणि विक्री करणारी कंपनी काढायचं ठरवलं. स्वतःच्या जीवावर आणि हिमतीवर सतीश मेहता यांनी १९८३ साली एम्क्युअर नावाची कंपनी पुण्यात उभी केली. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता.
पुण्यात एका साध्या मेडिकल दुकानापासून सुरु झालेला प्रवास आज एका भव्य दिव्य कंपनीत रूपांतरित झाला होता. या फार्मास्युटिकल क्षेत्रात आज घडीला सतीश मेहता हे सर्वात महत्वाचे वितर्क मानले जातात. १९८३ पासून ते संचालक आणि कार्यकारी अधिकारी म्हणून एम्क्युअर कंपनी यशस्वीपणे सांभाळत आहेत.
कंपनीची यशस्वी घोडदौड सतीश मेहता यांनी केवळ देशभरासाठी सीमित न ठेवता जागतिक स्तरावर बहुराष्ट्रीय कंत्राट निर्माता म्हणून सुरु केली. या कंपनीत स्वतःच्या ब्रँडेड जेनेरिकची त्यांनी विक्री करायला सुरवात केली. टॅब्लेट्स, कॅप्सूल आणि काही इंजेक्शन या प्रकारचं प्रॉडक्टची निर्मिती हि कंपनी तयार करते.
जागतिक स्तरावर सतीश मेहता यांनी आपली एम्क्युअर कंपनी चांगलीच पुढे नेली. मोठ्या प्रमाणात ते गोळ्या औषधांची विक्री करू लागले. यातून त्यांच्या कंपनीची कोटीच्या कोटी उड्डाणाने पुढे जाऊ लागली. कोट्याधीश लोकांच्या यादीत त्यांचा क्रमांक फार वरचा होता.
इतक्यावरच त्यांचा प्रवास थांबला नाही तर, २०१८ च्या फोर्ब्सच्या यादीत जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांना स्थान मिळालं. २०१६ साली भारतातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत देखील त्यांचं नाव होतं.
या एम्क्युअर कंपनीचं मुख्यालय हे पुण्याच्या हिंजवडी मध्ये आहे. ११००० हुन अधिक लोकांच्या हाताला रोजगार या कंपनीने मिळवून दिला आहे. सध्या या कंपनीचे सीईओ सतीश मेहता असून, प्रेसिडंट हे समित मेहता आहेत.
केवळ एका छोट्याश्या मेडिकल दुकानापासून झालेली सुरवात जगातल्या सर्वात जास्त कमावणाऱ्या कंपनींपैकी एक कंपनी एम्क्युअर आहे. संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या कंपनीने कमावलेलं यश कौतुकास्पद आहे.
हे हि वाच भिडू :
- कोरोना काळात फायद्यात असलेला माणूस, २५ हजार कोटींची कंपनी विकत घेतलीय…
- लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने संपूर्ण जगाला दाढी करायला शिकवलं….
- क्युबा देशात टॅक्सी ड्रायव्हर दिवसाला जेवढं कमवतो तेवढं कमवायला डॉक्टरला महिना लागतो
- तपासणी, इंजेक्शन आणि गोळ्यांची फी फक्त दहा रुपये, हे आहेत स्वस्तातले डॉक्टर..