कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल ‘बोल भिडू’ या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगतापांनी त्यांना बोलतं केलं. त्यावेळी शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडेही उपस्थित होत्या.

मराठयांच्या कुलाचा सातशे वर्षांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. यासाठी ते मागच्या सात पिढ्यांचा धांडोळा घेतात. त्या अनुषंगाने तो त्या त्या काळातील समाजजीवन आणि जातीव्यवस्था यांचा सातशे वर्षांचा इतिहास होतो.

ऑफिसातून निघायला उशीर झाल्यामुळे मी कार्यक्रमाला उशिरा पोचलो तेंव्हा पठारे सर बुद्ध, गांधी आणि शाकाहाराबद्दल बोलत होते. मनुष्य हा शाकाहारी प्राणी आहे, आर्थिक स्थैर्य असलेले लोक महाग असलेल्या भाजीपाल्यातून प्रथिनं मिळवू शकतात पण रोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या लोकांना मांसाहारातून प्रथिनं मिळवावी लागतात त्यामुळे त्यांना काही बोलून काही उपयोग नाही. पण हळू हळू हे चित्र बदलायला हवं आणि ते बदलेल असं ते म्हणत होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या बाबतीत ते म्हणाले की मराठी भाषेला समृद्ध इतिहास आहे. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रापासून ते तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव ई.साहित्यिक संतांनी मराठीत मोठं काम करून ठेवलंय. महात्मा फुलेंच्या ‘तृतीय रत्न’ बद्दल बोलताना ते म्हणतात की बरटॉल्ट ब्रेख्तच्या ‘एपिक थिएटर’ च्या आधीच फार पूर्वी महात्मा फुलेंनी ती संकल्पना आपल्याकडे मांडली होती. पण आपण त्यांच्या व्याकरणातील चुका काढत बसलो.

मराठी माणूस व्यवसाय का करू शकत नाही याबद्दल बोलताना ते महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीकडे बोट दाखवतात. महाराष्ट्रातील जमीन खडकाळ आहे. आपल्याकडे शेतीतून सहकाराचा प्रयोग विखे पाटलांनी केला पण त्या अगोदर फार पूर्वीपासून सधनता नसल्यामुळे आपल्याकडे सीमोल्लंघन करून लोक लूटमार करायला बाहेर पडायचे. पंधराव्या वर्षीच मुलांना भालाफेक, तलवारबाजी, दांडपट्टा शिकवलं जायचं आणि वडीलच मुलांना युद्धावर पाठवायचे. युद्धातून लूट मिळते आणि पोटापाण्याची सोय होते.

यासाठी उदाहरण देताना ते म्हणतात की रामदेवरायाच्या देवगिरी किल्ल्यावर अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली तेंव्हा त्याच्यात स्थानिकही सामील होते. मुळात अल्लाउद्दीन खिलजी आणि रामदेवरायाच्या युद्धाला हिंदू मुस्लीम युद्ध असं धार्मिक रूप दिलं जातं ते चुकीचे आहे.

त्यावेळी युद्धात लूट मिळवणे एवढाच उद्देश असायचा. पण लोकांनी त्याला धार्मिक स्वरूप दिलं. राजकीय स्वार्थासाठी कायम जाती आणि धर्माचा उपयोग केला गेलाय, अजूनही होत असतो असं ते म्हणतात.

अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बोलताना ते म्हणतात की तो फार शूर आणि महत्वाकांक्षी होता. रशियातील तर्तार या अतिशय हिंस्र आणि रानटी जमातीचं आक्रमण त्याने परतवून लावलं होतं. तो देवगिरीवर धावून आला तेंव्हा त्याला स्थानिकांनी मदत केली तो केवळ पोट भरण्यासाठी काढलेला मार्ग होता. अशा रीतीने महाराष्ट्रातील लोक कायम निसर्गाशी तोंड देत, युद्ध करत जगत आलेत. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी स्थैर्य मिळालंच नाही. हेच पिढ्यानपिढ्या झिरपत आलं.
त्याच वेळी गुजराती, मारवाडी, सिंधी आणि पंजाबी लोक व्यवसायातून उत्कर्ष करत गेले. तेच त्यांच्या पिढ्यातही झिरपत गेलं.

लेखक होऊ पाहणाऱ्या तरुणाईला काय सल्ला द्याल असं विचारल्यास. वेड्यासारखं वाचन केलं पाहिजे. मातृभाषेतील लेखन तर वाचलंच पाहिजे पण जागतिक लेखकांचंही लेखन वाचायला हवं. कथा, कादंबरी याच्याही पुढे असलेलं लिखाण वाचायला हवं असं ते म्हणाले. इतरांचं वाचूनच आपल्याला लिहिण्याची प्रेरणा मिळते. पण लिहिताना स्वतःचा आवाज शोधायला हवा. आपलं लेखन नाव न लिहितासुद्धा वाचकाच्या लक्षात यायला हवं. आपण जे लिहितोय त्यातील पात्रे, त्यांच्या भाषेतील लहेजा कुठलाही असला तरी निवेदन प्रमाण भाषेतच करायला हवं. जेणेकरून वाचकाला वाचनात ‘रसविघ्न’ येणार नाही.

वाचणं आणि लिहिणं हे फक्त भाषा विषय असलेल्यांचं काम नाही. प्रत्येकाने आपापला भवताल आपल्या लिहिण्यातून व्यक्त केला पाहिजे असं ते म्हणाले. याचं उदाहरण देताना ते त्यांचा पॅरिस मधील अनुभव सांगतात. तेथील एका महिला पत्रकाराने त्यांचा भौतिकशास्त्र हा विषय असूनही लेखनाकडे कसे वळले असं विचारल्यास भाषा आणि शास्त्र एकमेकांचे शत्रू नसून ते एकमेकांना पूरक आहेत असं ते म्हणतात. क्वांटम फिजिक्स तसं समजायला किचकट आहे पण तेच मातृभाषेतुन शिकल्यास सोपं जातं असं म्हणाले.

संकुचित मनोवृत्ती आणि सांस्कृतिक कुपोषणाच्या काळात लोकांनी कसं व्यक्त व्हायचं या गिरीश कुलकर्णींच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की प्रत्येकाने आपलं व्यक्त व्हायचं माध्यम शोधायला हवं. जसं तुम्ही शोधलंय. सगळ्यांनी आजूबाजूचा भवताल आपल्या माध्यमातून व्यक्त करायला हवा.

यासाठी रशियन कवी आणि लेखक पास्तरनाकचं उदाहरण ते देतात. त्या काळात झार जनतेवर अनन्वित अत्याचार करत असताना काही लोक त्याच्याविरुद्ध आंदोलनात उतरले होते. तो आंदोलनात का उतरत नाही हे त्याला काही जणांनी विचारलं तेंव्हा तो म्हणाला की प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यायला हवं. जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मैदानात उतरून सक्रिय लढा द्यावा. चित्रकारांनी चित्रांतून व्यक्त व्हायला हवं. कवींनी आपल्या कवितांमधून व्यक्त झालं पाहिजे. कवी जेंव्हा आपल्या कवितांनी हादरून टाकतो तेंव्हा त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो.

एकीकडे अंबानी सारख्या श्रीमंत लोकांची मुलं काय करतात हे कुठंही दिसत नाही, त्यांचा कसलाही गाजावाजा होत नाही. आपल्या तरुणांचे मात्र वाढदिवस असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो चौकाचौकात मोठे फ्लेक्स लागतात. सध्याची पिढी कुठे चालली आहे आणि त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या रामदास फुटाणे सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना पठारे सर म्हणतात की आताची पिढी राजकारण आणि धर्मकारणात फार गुंतली आहे. समाजकारण क्वचित होतं आणि जे काही आहे त्याचं प्रदर्शन खूप होतं. तरुणांनी यातून बाहेर पडायला हवं. स्वतःचा मार्ग शोधायला हवा. वाचन वाढवावं. काही उद्योग करता येईल का ते बघावं. राजकारण आणि समाजकारणच करायचं असेल तर ते स्वतः ला वाहून घेऊन करावं. नुसता टाईमपास किंवा बॅनरबाजीत वेळ वाया घालवू नये.

नंदुरबारच्या एका मुलीने तिच्या बोलीभाषेतील उच्चारण आणि प्रमाण भाषेतील उच्चारण याबाबतीत होणारा गोंधळ आणि यातून नेमकं कुठलं योग्य आणि कशाला महत्व द्यायचं असा प्रश्न विचारल्यास व्यावहारिक भाषेत बोलताना प्रमाण भाषेचा प्रयोग करायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या बोलीभाषेबद्दल कसलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही असं सांगितलं. मायेची ऊब म्हणून बोली भाषा आपल्या सोबत येतच असते. जगात कुठलेही लोक असोत, त्यांच्या बोलण्यात बोलीभाषेचा हेल असतोच असं त्यांनी सांगितलं. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना मराठी लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशनपूर्व कार्यक्रम फार कमी होतात आणि इथून पुढे महत्वाच्या लेखकांचे असे कार्यक्रम व्हायला हवेत जेणेकरून वाचकांना पुस्तकाची पार्श्वभूमी जाणून घेता येईल आणि लेखकालाही वाचकांशी संवाद साधता येईल आणि त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धीही होईल असा विचार समोर आला. यावर बोलताना हा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा होता आणि जेंव्हा पुस्तकाचं प्रकाशन होईल तेंव्हा ते लग्न असेल असं रामदास फुटाणे सर त्यांच्या शैलीत मिश्कीलपणे म्हणाले तेंव्हा एकच हशा पिकला.

लेखकाला प्रत्यक्ष बोलताना ऐकणं हा एक सुंदर अनुभव असतो. खूप नवीन गोष्टी कानावर पडतात. शिकायला मिळतं. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप या उत्सवमूर्ती लोकांनी कार्यक्रमात रंगत आणली. गिरीश कुलकर्णी आणि रामदास फुटाणे सरांच्या उपस्थितीने कार्यक्रम जिवंत केला. सभागृह हाऊसफुल्ल झालं होतं. चांगला प्रतिसाद मिळाला. असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही महत्त्वाची कादंबरी एकवीस सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे. त्याची पूर्वनोंदणी सुरू आहे.

  • नारायण शिवाजी अंधारे (लेखक कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांनी यापूर्वी बोल भिडूसाठी लेखही लिहिले आहेत.)

 

2 Comments
  1. PRASAD PATIL says

    मी कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो.
    अशाप्रकारचे कार्यक्रम ही काळाची गरज आहे. कालच्या कार्यक्रमात विविध विषयांना घातलेला हात आणि त्यावरील चर्चा तरूण वर्गाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. तरूणाई मध्ये वाचनाची आवड देखील निर्माण होईल. असेच अनेक कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा. बोल भिडूचे धन्यवाद.

  2. Pandurang Jayatpal says

    अतिशय सुरेख लेखन, प्रमाणबद्ध भाषा,खूप छान

Leave A Reply

Your email address will not be published.