३ इडियट्स बघून राजीनामा लिहीला आणि पठ्ठ्यानं सातपुड्याच्या पर्यटनाला जगासमोर आणलं.
मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्हा मुख्यालयापासून ७८ किलोमीटरवर असलेली प्रचंड उंचीची विशालकाय सातपुड्यांची पर्वतरांग. आणि याच पर्वतरांगेतील पाताळकोटचं दरीमधलं जंगल. जवळपास ९० चौरस किलोमीटर अश्या या दरीमध्ये खोल जमिनीखाली दुर्गम भागात वसलेली तब्बल १२ गाव. सगळीच्या सगळी अगदी निसर्गसंपन्न.
इथं सूर्य किरणं पण उशिरा आणि अगदी थोडावेळासाठी प्रकाशतात. पावसाळ्यात तर हि दरी पूर्ण ढगांनी व्यापलेली असते. अगदी नेत्रसुखद दिसणार ते दृश्य असतं.
पौराणिक कथेनुसार रावणपुत्र मेघनाद यानं इथचं शिव उपासना केली आणि याच मार्गानं तो पाताळ लोकात गेला. त्यामुळे पण या जागेला पाताळात जाण्याचा दरवाजा म्हंटलं जात असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
पण आज ही बाहेरच्या जगापासून कोसो लांब असलेलं हे दुर्गम ठिकाण म्हणजे प्रामुख्यानं भारिया आणि गोंड समुदायातील आदिवासी लोकांचं घर आहे. या भागातील अनेक गावात जाणं आजही अतिशय अवघड मानलं जातं. त्यामुळे सुधारणेचं वारं फारसं अजून इथं पर्यंत पोहचलेलं नाही. शाळा देखील २००७ मध्ये सुरु झाल्या.
मात्र इथला एक युवक आता बाहेच्या जगाला या भागासोबत जोडण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून धडपडत आहे. त्याच्यामुळेच इथलं सगळं पर्यटन आणि तिथली अर्थव्यवस्था आता जगासमोर यायला सुरुवात झाली आहे.
पवन श्रीवास्तव असं त्याचं नाव.
पवनच घर इथल्या तामिया भागात आहेत. लहानपण सगळं पाताळकोटच्या या जंगलांमध्येच फिरण्यात गेलं. पुढे शिक्षणासाठी शहर, आणि त्यानंतर बरीच वर्ष कॉर्पोरटमध्ये चांगली नोकरी करत होता. तर तिकडे त्यांची आई अंगणवाडीमध्ये शिक्षक म्हणून काम करत होती.
पवन शहरात फक्त शरीरानं उपस्थित असायचा. पण मन मात्र त्याच पाताळकोटच्या जंगलात फिरत असायचं. जंगलाशी मैत्री झाल्यामुळे दुनियादारीशी त्याचं पटत नव्हतं. अशातच २००९ च्या शेवटाला अमीर खानचा ३ इडियट्स बघितला. दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा लिहिला, आणि घरी परतला.
पुढचं काहीच माहित नव्हतं, कसं चालणार, काय होणार. जवळ ब्लु प्रिंट नव्हती, पण इथल्या जंगलासाठी आणि आदिवासींसाठी काही तरी करायचं हे पक्क ठरवलं होतं. जंगल आपल्याला उपाशी ठेवणार नाही याची पक्की खात्री होती.
२००९ मध्येच त्यानं भारत सरकारच्या विशेष मागास जाती आणि जमातीच्या संरक्षणासाठी चालवल्या जात असलेल्या योजनेशी स्वतःला जोडून घेतलं. या योजनेच्या मूल्यांकनासाठी गठीत समितीचा सहायक म्हणून काम करू लागला. त्या दरम्यान त्यानं या भागातील कोपरा न कोपरा पालथा घातला. पाताळकोटचा न बघितलेला भाग बघून घेतला. त्यातले बारकावे समजून घेतले.
त्यासोबतच इतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि एनजीओनां पवननं मदत केली. त्या पाठीमागे उद्देश स्पष्ट होता की पातळकोटला समजून घेणं आणि त्यासाठी काम करणं. त्यामुळे त्यासाठी आलेल्या एकही संधीला त्यानं सोडलं नाही.
अशी जवळपास ५ ते ६ वर्ष गेल्यानंतर पवनला आजूबाजूच्या भागातं पाताळकोटचा एनसाइक्लोपीडिया म्हंटलं जावू लागलं. त्यातुन त्याला इथली पर्यटन क्षेत्र खुणावू लागली. पवननं त्या दृष्टीनं काम सुरु केलं. इथं येणाऱ्या पर्यटकांना सर्व माहिती मिळेल याची काळजी घेतली.
अखेरीस २०१६ साली कोणत्याही सरकारी मदतीशिवाय पवननं आपल्या टूरिस्ट इनफॉर्मेशन सेंटरची सुरुवात केली. या अंतर्गत त्यानं समुदायाच्या विकासासाठी अनेक गोष्टींच नियोजन केलं. जवळपास १५० जणांना ट्रेनिंग देवून तयार केलं. पर्यटकांना आपल्या सेंटरची माहिती द्यायला सुरुवात केली तसा ओघ वाढला.
पवननं पर्यटकांसाठी इथं अनेक प्रकारच्या ॲड्व्हेंचर्स ॲक्टिविटी जशा की ट्रेकिंग, कँपिंग, रिवर वॉल्किंग, स्टार गेजिंग, बाइकिंग अशा गोष्टी सुरु केल्या. सोबतचं आधी २ ते ३ ट्रेकचं पर्यटकांना माहित होते. मात्र पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे गरजं वाढली. त्यातुन पवननं पाताळकोट आणि तामिया भागात स्वतः १२ ट्रेक रुट शोधून काढले.
केवळ ट्रेकचं नाही तर मागच्या १० वर्षात २० पेक्षा अधिक भेटी स्थानकांचा शोध आणि ओळखं पवननं जगाला करुन दिली आहे. इथं देखील १ पासून ४ लेव्हल पर्यंतच्या ट्रेक ॲक्टिव्हीटी चालवल्या जातात.
अशी चालते पाताळकोटची अर्थव्यवस्था…..
वर सांगितल्या प्रमाणं पवनने इथल्या समुदायासाठी नियोजन बनवलं होतं. यात ‘पाताळकोट रसोई’नावाची संकल्पना त्यानं सुरु केली. यात बेसिक आयडिया काय होती, तर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकाला इथल्या चवीची ओळख करुनं देणं. पाताळकोट आणि सातपुड्यामधील खाद्य संस्कृती समजावून सांगणं.
त्यातुन स्थानिक महिलांना रोजगार मिळवून देणे हा पवनचा मुख्य उद्देश होता. यात पवननं मक्याची रोटी, देशी टॉमॅटोची चटणी. चन्याची भाजी, देशी बरबटीटी डाळ, मोहाची पूरी, जलेबी असे ३७ पदार्थ करुन वाढले.
यासोबतचं पाताळकोट रसोईच्या बॅनरखाली आदिवासी महिलांद्वारे तयार केलेले पापड, मका, तांदुळ, गहू, उडीद, आवळे, आंबे, कच्ची हळद, लिंबू, जंगलातील नैसर्गिक मध, जामुन शॉट आणि इतर वनातील पदार्थांची शहरात विक्री सुरु केली. सोबतचं वेगवेगळ्या फूड फेस्टीवलमध्ये जावून तो लोकांपर्यंत इथला स्वाद पोहचवत आहे.
सोबतचं, पवननं इथल्या जंगतलातील जडीबुटींवर अभ्यास सुरु केला. त्याच्या मते इथ एकुण २२० प्रकारची औषधं वनस्पती मिळतात. आजही ही इथली वन हीच पवन यांची संपत्ती आहे आणि हेच त्यांच भांडवलं.
हे हि वाच भिडू.
- महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले ते या छत्रपतींमुळे
- रात्री पाकिस्तानात झोपले सकाळी उठे पर्यंत गाव भारतात आलं होतं..
- एक छोटासा अपघात झाला आणि जगातील सर्वात रहस्यमयी कबरीचं दार उघडलं गेलं..