भिकू म्हात्रेच्या गळ्याला वस्तरा लाऊन त्याला जिंकणारा ‘सत्या’ परत येतोय…

तुरुंगातला सीन, डॉन असणारा भिकू म्हात्रे एका दिसायला शांत पण डोक्यानं डेंजर असणाऱ्या कैद्याशी राडा करतो, त्याला बुकलतो आणि त्याच्या गळ्याला वस्तरा लावतो… आपल्याला वाटतं भिकूनं तुकडा पाडलाच, तेवढ्यात भिकू फक्त धस्ती देऊन मागं फिरतो आणि पुढच्याच क्षणी हा कैदी तोच वस्तरा घेऊन भिकूच्या गळ्याला लावतो, आणि म्हणतो…

“मौका सभी को मिलता है.”

त्याच्या नजरेतली धार हातातल्या वस्तऱ्यापेक्षा डेंजर होती आणि डेरिंगचा तर नाद नव्हता. पुढं हाच कैदी भिकूचा खास बनतो आणि पिक्चर खऱ्या अर्थानं सुरू होतो…

सत्या

एका संबंध पिढीचा सगळ्यात आवडता पिक्चर. मुंबईच्या पावसाच्या थीमवर रामू आपल्याला गुन्हेगारी दाखवतो, प्रेम दाखवतो, दोस्ती दाखवतो आणि दुष्मनीही.

सत्या बघितल्यावर लायटरच्या उजेडात दिसणारी उर्मिला लक्षात राहते, सौरभ शुक्लाचा कल्लू मामा लक्षात राहतो, मुंबई का किंग भिकू म्हात्रे लक्षात राहतो… पण खरी हवा करतो तो शांत, संयमी आणि खरा ‘गुंड’ सत्या.

तगड्या स्टारकास्ट समोर जे. डी. चक्रवर्तीनं केलेलं सत्याचं काम हा त्याच्या आयुष्यातला माईलस्टोन होता. सत्या हिट झाल्यावर त्याची जेडी चक्रवर्ती ही ओळखच पुसली गेली, कारण तो आता मुंबईच्या रस्त्यांपासून टॉवरपर्यंत प्रत्येकाचा लाडका ‘सत्या’ झाला होता.

सत्यामध्ये वकीलचा एक डायलॉग आहे, “कौन है ये सत्या, कहाँसे आया है?”

आजही जेडी चक्रवर्तीला पाहिलं की, हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. नुकतंच जेडी एका ट्रेलरमध्ये दिसला आणि समजलं की तो परत येतोय… हा आला कुठून? इतके वर्ष होता कुठे? या प्रश्नांची उत्तर आपल्याला अजून मिळाली नाहीत हेही लगेच आठवलं.

मग उत्तरं शोधली, कारण सत्यानंच सांगितलंय ‘पूछने के लिए जिंदा रेहना जरुरी होता है..’

जेडी चक्रवर्ती म्हणजेच नगुलापति श्रीनिवास चक्रवर्ती. गडी मूळचा हैदराबादचा. त्याची आई प्रोफेसर होती आणि गायक पण, त्यामुळं अभ्यास आणि कला या दोन्ही गोष्टी जेडीमध्ये पहिल्यापासून असाव्यात. कारण भावानं आधी इंजिनीअरिंग केलं आणि त्यानंतर अभिनयाचा नाद केला.

या नादानं जेडीला सुपरस्टार बनवलं…

त्यानं १९८९ मध्ये ‘शिवा’ नावाच्या तेलुगू पिक्चरमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. खरंतर हा पहिलाच पिक्चर असूनही त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला, इथं त्याला दोन गोष्टी मिळाल्या राम गोपाल वर्मा सारखा मेंटॉर आणि डायरेक्टर (ती रामूचीही पहिलीच तेलुगू फिल्म होती.) आणि जेडी हे कॅरॅक्टरचं नाव त्याला चिकटलं ते कायमचंच. याच पिक्चरच्या हिंदी रिमेकमध्येही तो दिसला.

इथून मग जेडी सुटला, त्यानं तेलुगू सोबतच तमिळ, मल्याळम आणि हिंदी पिक्चरमध्ये काम करायला सुरुवात केली. पण जवळपास चार वर्ष त्याला सपोर्टींग रोलचीच कामं मिळत होती. शेवटी १९९३ मध्ये त्याला मेन लीड म्हणून ब्रेक मिळाला, पिक्चर होता ‘मनी.’ याच पिक्चरच्या ‘मनी मनी’ या सिक्वेलमध्येही जेडीनं काम केलं.

त्याच्या नावापुढं पिक्चर लागत होते, चांगलं काम मिळत होतं, पण मोठा धमाका अजून बाकी होता. जो झाला, १९९८ मध्ये.

राम गोपाल वर्माचा ‘सत्या.’ ज्यात जेडी हिरो होता.

खरा गँगस्टर आपल्या शेजारी बसलेला असेल, तरी आपल्याला ओळखू येणार नाही हे सत्यानं दाखवून दिलं. एखाद्याला टाकताना पुढचा मागचा विचार न करणारा, भिकूसाठी जीव ओवाळून टाकणारा आणि विद्यावर जीवापाड प्रेम करणारा सत्या म्हणजे शेवट होता.

त्या पिक्चरमध्ये जेडीनं इतकं भारी काम केलं की, त्याला अवॉर्डही मिळालं. पण त्याही पलीकडे त्या एका रोलनं त्याला लोकांच्या मनात जगा दिली.

कित्येकांना वाटतं की, सत्या हा जेडीचा शेवटचा बॉलिवूड पिक्चर होता, पण तसा विषय नाहीये…

सत्यानंतर त्यानं, दुर्गा, वास्तूशास्त्र, डरना जरुरी है, दरवाजा बंद रखो, आग, भूत रिटर्न्स अशा काही पिक्चरमध्येही काम केलं. दरवाजा बंद रखो हा जेडीचा डायरेक्टर म्हणून पहिला पिक्चर होता. डरना जरुरी है मध्ये त्यानं दिग्दर्शित केलेली कथा, न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फिल्म अभ्यासक्रमात शिकायला आहे.

अध्येमध्ये बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर जेडी गायब झाला, इथं दिसत नसला तरी तो साऊथ इंडस्ट्रीमध्ये मोजकी पण भारी कामं करत असतो. आयुषमान खुरानाच्या ‘अनेक’ या पिक्चरमधून तो पुन्हा बॉलिवूडमध्ये येतोय. त्यानंतर मोहित सूरीच्या एक व्हिलन रिटर्न्समध्येही जेडी असेल…

यात तो वेगळं काम करेल, व्हिलन असेल किंवा हिरो असेल… पण एक मात्र खरंय.. जेडीला पाहिलं कि आपल्याला सत्याच आठवेल. त्याचे मागे फिरवलेले केस, काहीसा ढगळ शर्ट, पावसाचा आवाज आणि थंड नजरेनं, घोगऱ्या आवाजात आलेला डायलॉग…

“अगर मारना है, तो बोलने की क्या जरुरत है..?”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.