लोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे “सत्या”नं सांगितलं.
साल होत १९९७. रंगीला आणि दौड बनवल्यावर राम गोपाल वर्माचं हिंदीतसुद्धा चांगल नाव झाल होत. आता रामूनं ठरवलं की हीच वेळ आहे बॉलीवूडला अस्सल क्राईम सिनेमा म्हणजे नेमकं काय हे दाखवून द्यायची. मुंबईच्या अंडरवर्ल्डचं त्याला भलतच आकर्षण होत. त्यावर काही करता येईल का याच विचारचक्र सारखं त्याच्या डोक्यात चालू असायचं.
एक दिवस तो प्रोड्युसर झामू सुगंध यांच्या ऑफिस मध्ये बसला होता. झामू सुगंध हा मुंबईचा मोठा डिस्ट्रीब्यूटर होता. दोघांच्यात सिनेमाच्या स्टोरीच्या चर्चा सुरु होत्या. अचानक झामूजीला एक फोन आला. फोनवरची बातमी ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलत गेले. रामूला काही कळेना नेमकं काय झालं? फोन ठेवताच थरथरत्या आवाजात झामू म्हणाला,
“गुलशनजी का खून हो गया.”
तोवर बातमी सगळीकडे पसरली होती. ऑफिसमधले बाकीचे लोकसुद्धा काय झालं उत्सुक्तेन झामुच्या केबिन मध्ये आले. झामू काय काय घडलं ते रामूला सांगत होता.
टि-सिरीजचे कॅसेटकिंग गुलशन कुमारनी झामूला आजच सकाळी उठल्या उठल्या सकाळी ७ वाजता फोन केला होता. फोनवर त्यांनी त्याला एका सिंगरला भेटायला जाणार आहे आणि त्यानंतर मंदिरात देवदर्शन घेऊन झामुला भेटायला येणार असे सांगितले.
झामू त्यांचीच वाट बघत होता. पण त्याच्या आधीच ते रोज ज्या जीतेश्वर मंदिरात जात होते तिथे त्यांच्या छातीत १६ गोळ्या घालून खून करण्यात आला. या खंडणीसाठी अंडरवर्ल्डने त्यांचा खून करवला होता अशी बातमी होती.
राम गोपाल वर्मा झामू सूगंध सांगत असलेली बातमी ऐकत होता मात्र नेहमी प्रमाणे त्याच्या डोक्यात काही तरी वेगळाच विचार आला.
सगळ जग गुलशन कुमार किती वाजता उठले, कुठल्या कारने निघाले कोणाकोणाशी बोलले याचा शोध घेत असणार पण त्यांचा खून ज्याने केला तो खुनी किती वाजता उठला असेल? त्याचा सकाळपासूनचा दिनक्रम कसा असेल? तो घरी काय सांगून निघाला असेल? १६ गोळ्या मारताना त्याच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल हे प्रश्न कधीच कोणाच्या डोक्यात आले नसतील पण रामू तोच विचार करत होता.
त्याच दिवशी रामूच्या डोक्यात सत्याची कथा फायनल झाली. गँगस्टर एक तर गोळ्या घालून मारतात अथवा कोणाच्या तरी गोळीचा शिकार होतात पण याच्या दरम्यान त्यांचीही काही तरी स्टोरी असेल. हीच सत्याची स्टोरी.
सर्वात आधी त्याने स्टारकास्ट फायनल केली. रामूच्या आधीच्या सिनेमामध्ये दौडमध्ये एका छोटा रोल मध्ये असलेला मनोज वाजपेयी त्याला खूप आवडला होता. त्याने मनोजला या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका दिली. साउथ सिनेमामध्ये त्याच्याबरोबर यापूर्वी काम केलेल्या थंड डोळ्याच्या चक्रवर्तीला मुख्य भूमिकेत घेतले.
रामूला या सिनेमामध्ये कोणीही मोठा स्टार नको होता. फक्त या नियमाला एकच अपवाद केला, त्याची लाडकी उर्मिला मार्तोंडकर. ती या सिनेमामध्ये पहिल्यांदाच नॉन ग्लॅमरस अवतारात दिसणार होती.
रामूला या सिनेमाचं स्क्रिप्ट विजय तेंडूलकर यांनी लिहाव अशी इच्छा होती. त्याचा सगळ्यात आवडता हिंदी सिनेमा होता अर्धसत्य. त्याच स्क्रिप्ट तेंडुलकरांनी लिहिलेलं होत. पण तेंडुलकरांना काही कारणाने राम गोपाल वर्माबरोबर काम करायला जमलं नाही. पण सिनेमाचं नाव मात्र अर्धसत्य वरूनच ठेवलं,
“सत्या.”
स्क्रिप्ट लिहिण्यासाठी रामूने मनोज वाजपेयीच्या शिफारसीनुसार नवख्या अनुराग कश्यपला घेतलं. पण त्याचा अनुरागवर पूर्ण विश्वास नव्हता म्हणून त्याच्या मदतीला जुन्याजाणत्या सौरभ शुक्लाला घेतलं. सौरभ या सिनेमामध्ये कल्लू मामाचा रोल सुद्धा करणार होता. संगीताची जबाबदारी विशाल भारद्वाजला देण्यात आली.
शुटींग सुरु झालं. पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सीन मध्ये सुशांतसिंहचं कॅरेक्टर सत्याकडे खंडणी मागायला जाते आणि सत्या त्याच्या चेहऱ्यावर चाकू मारतो हे दृश्य होत. सुशांतसिंह त्या सीनमध्ये जोरात कळवळून ओरडला. त्याला खरोखरच लागलं की काय असं वाटून त्याच्या शेजारी उभा असलेला मनोज पहावा पाणी आणा असे किंचाळला. रामूने तो सीन कट केला नाही.
त्याला लक्षात आलं की अॅक्टरना संवाद लिहून देण्यापेक्षा त्याचं त्यांना बोलण्याची मुभा देऊ. कधी गरज पडेल तेव्हा अनुराग त्यांना सेटवर डायलॉग सांगेल. यामुळे सिनेमामध्ये जिवंतपणा येईल. अख्ख्या सिनेमाच्या शुटींगची दिशाच त्याने बदलून टाकली.
३ जुलै १९९८ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. दोन कोटी बजेटमध्ये बनलेला सत्या तुफान गाजला. अख्खी मुंबई पे राज करणारा भिकू म्हात्रे, कल्लूमामा हे कॅरेक्टर सुद्धा गाजले.
भला मोठा तगडा क्रूर दिसणारा व्हिलन म्हणजे डॉन वगैरे संकल्पना सत्याने मोडून काढल्या.
तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल दिसणारे हे गँगस्टर कसे थंड डोक्याने खून करतात, त्यांचीही बायको असते, प्रेमिका असते. त्यांचे सुद्धा आपापसात दोस्ती प्रेम मत्सर असे हेवेदावे असतात. मुंबई ज्याला घाबरते असा डॉन घराचं दार बंद झाल्यावर बायकोचा मार खात असतो, तिला मनवत असतो. मुंबईमध्ये लोकल मध्ये आपल्या शेजारी बसलेला माणूस नुकतच खून करून आलाय हे चेहऱ्यावरून कोणी सांगू शकत नाही, आणि हेच वास्तव रामू ,अनुराग कश्यप, सौरभ शुक्ला यांनी पडद्यावर साकरल होत.
सत्याने भारतीय सिनेमाची दिशाच बदलून टाकली होती.
हे ही वाच भिडू.
- नव्वदच्या कॅसेट युगावर राज्य करणारे ड्यूप्लीकेट सिक्के !
- छोटा शकील की मोटी गर्लफ्रेंड
- तिने दाऊदला फ्रेन्डझोनमध्ये टाकलं होतं.
- लग्न झालेलं नसूनसुद्धा माधुरीला नो प्रेग्नंसी क्लॉजवर सही करावी लागली होती.