ज्याची एवढी चर्चा होतीये तो सेरेब्रल पाल्सी आजार नेमका काय आहे?

जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट. या मायक्रोसॉफ्टचा सध्याचा बॉस म्हणजे सत्या नाडेला. ते भारतीय आहेत. पण दुःखाची बातमी अशी की, त्यांचा २६ वर्षाचा मुलगा झैन नाडेलाचं निधन झालं आहे. असं सांगण्यात येत आहे की, झैन नाडेला यांना जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता. 

झैनने त्याचा बहुतांश वेळ अमेरिकेतील सिएटल येथील चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये घालवला.

मिळालेल्या माहितीनुसार, झैनचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. कंपनीने ही दुःखद बातमी आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे पाठवली. २०१४ मध्ये Microsoft चे CEO झाल्यापासून, सत्या नडेला यांनी त्यांच्या  अपंग युजर्सला चांगली सेवा देता यावी यासाठी आपल्या अनेक उत्पादनांच्या रचनेत बदल केले. याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. या कामात त्यांनी झैनची सेवा करताना आलेले अनुभवही सांगितले होते…

गेल्याच वर्षी सत्या नाडेला यांनी मेंदूच्या आजारांवर संशोधन करण्यासाठी झैन नाडेला न्यूरो सायन्सेस सेंटरची स्थापना केली आहे. हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्प्रिंग यांनी आपल्या संदेशात झैनच्या आठवणी शेअर करत सांगितलं की, झैनला म्युझिकची खूप आवड होती.

सत्या नाडेला २०१४ पासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. नडेला यांच्या कारकिर्दीत मुलाचे योगदान असल्याचं ते कायम सांगतात. ते एकदा म्हणाले होते की, ‘झैनचा जन्म झाल्यानंतर माझ्यासाठी अनेक गोष्टी बदलल्या. त्याच्या जन्माचा माझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला.

 मी कसा विचार करतो, मी कसे नेतृत्व करतो आणि मी लोकांशी कसे बोलतो या सगळ्या गोष्टींवर झैन च्या अस्तित्वाचा सकारात्मक परिणाम होता. झैनच्या आगमनाने माझ्या आयुष्यात अनेक बदल घडला असल्याचं ते सांगतात. सत्या नडेला यांच्या पत्नी अनु नडेला या देखील सांगत असत की, झैन ला इतकं मोठं आयुष्य मिळू शकलं ते फक्त टेक्नॉलॉजीमुळेच. त्याचमुळे आमच्या कुटुंबात दोन्ही मुली आणि सत्या हे टेक्नॉलॉजीवरच बोलत असतात. 

पण झैन नाडेलाच्या निधनाच्या बातमीनंतर त्याला असलेल्या आजाराची चर्चा होतेय की, त्याला असलेल्या सेरेब्रल पाल्सी हा आजार नेमका काय आहे ? तो इतका जीवघेणा आहे का ?

थोडक्यात सेरेब्रल सेरेब्रल पाल्सी म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर.  हा एक प्रकारचा शारीरिक आणि मानसिक अपंगत्व आहे. यामध्ये शरीराचे मुख्य भाग जसे की स्नायू, हाडे, सांधे आणि मानसिक स्थिती जसे की संवाद साधणे, योग्य निर्णय घेणे, एकमेकांशी संपर्क साधणे, एखाद्या गोष्टीवर रिऍक्ट करणं यावर परिणाम होतो.  यामुळे हा आजार असलेला व्यक्ती स्नायूंवर कंट्रोल ठेवू शकत नाही. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांना मानसिक आजार असतात, शिकण्याची क्षमता नसते, पाहण्यात, ऐकण्यात आणि बोलण्यात समस्या येत असतात. भारतात दर वर्षी हा आजार कितीतरी मुलांचा बळी घेतो. 

खरं तर मानवी मेंदूचा विकास गर्भावस्थेतच सुरू होतो. गर्भधारणेदरम्यान कोणत्याही प्रकारचे संक्रमण, योग्य पोषणाचा अभाव किंवा आघात यामुळे सेरेब्रल पाल्सी होऊ शकते. डिलीव्हरी दरम्यान कोणत्याही प्रकारचा आघात, दुखापत किंवा मेंदूला ऑक्सिजनची कमतरता हे देखील कारण असू शकते. जन्मापासून ते वयाच्या दोन वर्षांपर्यंत मेंदूचा विकास फार लवकर होत असतो, त्या वेळीही कोणत्याही प्रकारची दुखापत, किंवा मेंदूपर्यंत पोहोचणारा कोणताही संसर्ग सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो.

सेरेब्रल पाल्सीचे चार मुख्य प्रकार आहेत: स्पॅस्टिक सेरेब्रल पाल्सी, डायस्टोनिक सेरेब्रल पाल्सी, अॅटॅक्सिक सेरेब्रल पाल्सी, हायपोटोनिक सेरेब्रल पाल्सी.

पण सेरेब्रल पाल्सीची लक्षणे काय आहेत?

– स्पास्टिक सेरेब्रल पाल्सीमध्ये हात पाय खूप घट्ट होतात, त्यामुळे चालणे, उठणे, बसणे अशा क्रिया करताना खूप त्रास होतो.

– डीस्टोनिक सेरेब्रल पाल्सीमध्ये, दोन्ही हात आणि पाय घट्टही राहू शकतात किंव्हा सैल देखील राहू शकतात, हातांचा घट्टपणा कमी जास्त होतो, त्यात हालचाल करणे कठीण होते.

हायपॉटोनिक सेरेब्रल पाल्सी हा स्पास्टिक सेरेब्रल पाल्सीच्या अगदी विरुद्ध आहे, ज्यामध्ये हात आणि पाय खूप सैल होतात, मांसपेशींमध्ये फारशी ताकद नसते.

– ९० टक्के केसेसमध्ये असं आढळून येतं की, शारीरिक इन्वॉल्वमेंटशिवाय, मेंटल इन्वॉल्वमेंट आढळून येते. त्यामुळे नॉर्मली समोरच्यासोबत संवाद साधण्यात, इतरांशी संवाद साधणे कठीण होते. सेरेब्रल पाल्सीमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्यांसोबतच दिसण्यात आणि ऐकण्यातही त्रास होतो.

सेरेब्रल पाल्सी जर जन्मताच होत असेल तर तो कसा शोधला जातो?

यावर अशी माहिती मिळते की, अल्ट्रासाऊंड, एमआरआय, सीटी स्कॅनच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी जन्माला येण्यापूर्वीच ओळखता येतो.  याबाबतीत बालरोगतज्ञ, चिकित्सक,  फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट या आजारावर निदान करतात. तसेच आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या काळात एमआरआय आणि सीटी स्कॅनद्वारे मेंदूचा विकास पाहता येतो. 

जन्मानंतर एक वर्षाच्या आत, सेरेब्रल पाल्सीची लक्षणे दिसू लागतात, जसे की बाळाचे हात आणि पाय खूप घट्ट होतील, ते इतर सामान्य बाळांप्रमाणे विकसित होणार नाही. पण अनेक वेळा या मुलांना मानसिक त्रास वाढतो, त्यावेळी मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञाचीही गरज लागते.

 पण यावर उपचार काय आहेत का ?

दुर्दैव हे की, सेरेब्रल पाल्सी आयुष्यभाराचा आजार असतो, तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. परंतु त्या पीडित मुलाचे आयुष्य काही प्रमाणात सुधारण्यासाठी तज्ज्ञांची मदत होऊ शकते. जसं की वर आपण बोललॊ यासाठी बालरोगतज्ञ, चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ सेरेब्रल पाल्सीच्या आजारावर उपचार करतात. 

थोडक्यात सेरेब्रल पाल्सीचे पेशंट्स इतरांवर अवलंबून न राहता त्यांची दैनंदिन कामं करू शकतील इथपर्यंतचे तरी प्रयत्न या उपचारात केले जातात. जसं की, खाणे, पिणे, चालणे, उठणे, बसणे.  फारच अवस्था खराब असेल त्या पेशंट्ससाठी चालण्यास मदत करण्यासाठी व्हीलचेअर, वॉकर, क्रॅचचा वापर केला जातो. 

सेरेब्रल पाल्सीमध्ये थेरपीची भूमिका खूप महत्त्वाची असते, ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट एकत्र काम करतात. थेरपीची उद्दिष्टच असं असतं की, पेशंट आत्मनिर्भर बनावा.  थेरपीमध्ये व्यायामाच्या माध्यमातून पेशन्ट्सच्या स्नायूंची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

आपण देखील आपल्या परीने याबाबत काही प्रयत्न करू शकतो ते म्हणजे लहान मुलांच्या विकासाकडे लक्ष दिलं जावं. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना कौशल्ये शिकवणं महत्वाचं आहे जेणेकरून ते त्यांची रोजची कामे अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. 

सेरेब्रल पाल्सी रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, मेंदूचा विकास एमआरआय, सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंडद्वारे शोधला जाऊ शकतो. गरोदरपणात आईला काही संसर्ग झाला असेल किंवा तिला योग्य पोषण मिळत नसेल तर तिची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीच्या वेळी बाळाला आणि आईवर ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच बाळाच्या जन्मानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हि काळजी घेतली तर सेरेब्रल पाल्सी सारखे आजार नियंत्रित करू जाऊ शकतात.आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारचं संक्रमण झालं तर हल्ल्यात घेऊ नका. कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेत चला. जेणेकरून सेरेब्रल पाल्सीचा उपचार जितक्या लवकर सुरू होईल तितक्या लवकर मूल स्वावलंबी बनू शकण्याची चान्सेस वाढतात.

सेरेब्रल पाल्सी नियंत्रित करण्यासाठी अनेक उपचारपद्धती खूप उपयुक्त ठरल्या आहेत. म्हणूनच तुम्ही योग्य डॉक्टरांकडून आणि योग्य ठिकाणी उपचार घेणे महत्त्वाचे आहे. 

हे हि वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.