ऐन वेळी सत्यजीत तांबेंचा अर्ज…नाशिक पदवीधर मतदार संघात कुणी कुणाचा गेम केलाय?

सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर आमदारकीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. त्यातलीच एक जागा म्हणजे नाशिक पदवीधर मतदार संघ. नाशिकचा पदवीधर मतदार संघ आताच्या घडीला राज्यातल्या ५ जागांपैकी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मतदार संघ आहे.

त्याचं कारण म्हणजे, काँग्रेसकडून घोषित केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच भरलेला नाही. याचवेळी सुधीर तांबे यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.

आता यामागचं राजकारण नेमकं काय आहे हे काँग्रेस पक्ष आणि पक्षातल्या नेत्यांनाच ठाऊक. पण, डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केल्यापासूनच सत्यजीत तांबे हे पक्षावर नाराज आहेत आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या.

सध्या, सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी कार्यरत आहेत. तर, मागच्या काही दिवसांपासुन त्यांचा सक्रीय राजकारणातला वावर बघता ते मेनस्ट्रीम राजकारणात येण्यासाठी  उत्सूक असल्याच्या चर्चाही होत्या.

त्यामुळे आजचा उमेदवारी अर्ज हा सत्यजीत तांबेंनी पक्षाच्या निर्णयाविरोधात घेतलेला निर्णय आहे कि पक्षानेच केलेलं राजकारण आहे हा विषय राज्याच्या राजकारणात रंगतोय.

आज नेमकं काय झालं?

सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. पण, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही त्यांनी अर्ज भरलाच नाही.

अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि सुधीर तांबे यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सर्वांचा समज असा होता कि, सत्यजित यांनी  काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरला असेल पण यावर स्वत: सत्यजीत तांबे यांनी हे स्पष्ट केलं. ते म्हणाले,

“काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.”

या घटनेमुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

तर सुधीर तांबे यांनी पक्षाचा आदेश डावललाय असं बोललं जातंय.

एक शक्यता अशी वर्तवली जातेय की, सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाहीये. त्यामुळे, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते. मात्र, सुधीर तांबे यांच्या म्हणण्याप्रमाणे, सत्यजीत तांबे यांनी भरलेला अर्ज हा महाविकास आघाडीच्या इच्छेप्रमाणे आहे.

यात वडिलांना डावलून तिकीट देणं शक्य नसल्याने काँग्रेसनं राजकारण केल्याच्या चर्चाही केल्या जात आहेत.

सत्यजीत तांबे यांची वाढती लोकप्रियता बघता लवकरच त्यांना मेनस्ट्रीम राजकारणात आणणं काँग्रेससाठी गरजेचं होतं. कारण तसं केलं नाही तर, सत्यजीत यांच्यासाठी इतरही बरेच पर्याय डोळ्यांसमोर होते. पण, वडिलांचं तिकीट जाहीर केलं असताना त्यांच्या ऐवजी मुलाला तिकीट कसं द्यायचं म्हणून काँग्रेसनेच हे अपक्ष उमेदवारीचं राजकारण केल्याच्या चर्चा सुरू आहेत.

आता काँग्रेस असं का करेल तर त्यामागचं कारण आहे ते, सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षातच थांबवणं. 

खरंतर, सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याआधीच भाजपकडून सत्यजीत यांना अप्रत्यक्षपणे ऑफर देण्यात आली होती. बरं ही ऑफर बंद दाराआड नाही तर, खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एका जाहीर कार्यक्रमात हि ऑफर दिली होती.  त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे हे एकाच मंचावर होते. त्यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,

“बाळासाहेब माझी एक तक्रार आहे. तुम्ही हे असं नेतृत्त्व किती दिवस बाहेर ठेवणार आहात? फार दिवस असं करू नका नाहीतर माझी त्याच्यावर नजर आहे.”

आता खुद्द फडणवीसांनी ऑफर दिली म्हटल्यावर भाजपमध्ये सत्यजीत यांचं स्वागत केलं जाईल हे नक्की होतं.

त्यात काँग्रेसने त्यांना तिकीट जाहीर न केल्यानं त्यांच्या नाराजीच्याही चर्चा होत्या त्यामुळे, महाराष्ट्र युवक काँग्रेसमधील सर्वात जास्त परिचीत चेहऱ्यांपैकी एक चेहरा गमवण्याची काँग्रेसला परवडणारं नसावं त्यामुळे काँग्रेसनेच अश्याप्रकारे सत्यजीत यांची नाराजी दूर केल्याचीही चर्चा आहे.

बऱ्याच काळापासून सत्यजीत तांबे यांची आमदारकीची महत्वाकांक्षा दिसून आली. परंतू, पक्ष त्यांना पाठिंबा देत नाही अश्या चर्चा होत्या. आता नाशिक पदवीधर मतदार संघातून अर्ज सत्यजित तांबेंनी एकप्रकारे बंडच केलं असल्याचं राजकीय वर्तुळात म्हंटलं जातंय. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.