सत्यजित तांबेंनी ज्यांना जबाबदार धरलं ते कर्नाटकचे एच. के. पाटील कोण आहेत ?

गेल्या कित्येक दिवसांपासून सत्यजित तांबे बातम्यांचा मथळा बनत आहेत. आज देखील त्यांच्या भूमिकेवर सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. त्यांनी आज त्यांची भूमिका जाहीर केली.

त्यांनी अपक्ष फॉर्म का भरला ? त्यांनी बंडखोरी का केली ? याला जबाबदार कोण ? या सगळ्यांचा लेखाजोखा आज त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म दिले, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात राजकारण रंगवण्यात आलं असं म्हणत सत्यजीत तांबेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. आमदारकीसाठी आपण वारंवार पक्षाकडे मागणी केली असता त्यांनी माझ्या वडिलांच्या आमदारकीचा संदर्भ दिल्याचं त्यांनी सांगितलं. 

मात्र याच वेळेस त्यांच्याकडून आणखी एक नाव सातत्याने समोर येत होतं ते म्हणजे एच.के पाटील.

 

“मी पक्षश्रेष्ठींकडे संधी मागितली तर मला सांगितले जायचे तुमचे वडील आमदार आहेत, संधी मिळणार नाही. एच. के पाटील यांना एक वर्ष आधी सांगितलं होतं मला संधी द्या, संघटनेत पद द्या…पण तसे काही झाले नाही. त्यांनी मला सांगितले वडिलांच्या जागेवर निवडणूक लढवा. हे ऐकल्यावर मला राग आला, वडिलांच्या जागेवर निवडणूक लढायची मानसिकता माझी नाही हे मी स्पष्ट केलं होतं. मला माझ्या बळावर संधी हवी होती. निवडणूक लढवायची माझी मानसिकता तयार झाली नव्हती… त्यामुळे उमेदवार घोषित करू नका अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती”. 

“एच के पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. बाळासाहेब थोरात यांनी मला शेवटपर्यंत सांगितले काँग्रेसकडून फॉर्म भरायचा आहे…पण आमच्याकडे एबि फॉर्म नसल्यामुळे तो अपक्ष अर्ज झाला. मी अर्ज भरल्यावर सगळ्यांचा पाठिंबा घेणार सांगितलं तरी भाजपचा पाठिंबा घेणार, मी भाजपच्या संपर्कात असल्याचे आरोप झाले…जणू काही मला भाजप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला. आमच्या परिवाराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले होते… दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर झाली? ही स्क्रिप्ट लिहून तयार केली..बाळासाहेब थोरात अडचणीत आणण्यासाठी केले”

थोडक्यात सत्यजित तांबेंनी सर्व पोलखोल करताना घडलेल्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि एच. के. पाटील यांना जबाबदार धरलं.

पण हे एच के पाटील कोण आहेत ? जाणून घेऊया…

सप्टेंबर २०२० मध्ये काँग्रेस हायकमांडने काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल केले. त्या आधी महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी खर्गे यांच्याकडे होती. त्या दरम्यानच्या फेरबदलानंतर एच. के. पाटील यांची महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषतः मुंबईवर आपली पकड मजबूत कारण्यासाठी काँग्रेस हायकमांडने एच.के.पाटील यांना महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस बनवलं आणि त्यानंतर एच के पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत आले. 

एच. के. पाटील यांचं पूर्ण नाव हनुमंतगौडा कृष्णगौडा पाटील. 

एचके पाटील हे शेजारच्या कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यांचं कुटुंब काँग्रेसवासी. त्यांचे वडील के.एच.पाटील हे देखील कर्नाटक सरकारमध्ये सहकारमंत्री राहिले आहेत. एचके पाटील यांचं वय साधारण ७० च्या घरात असावं.

एच.के.पाटील हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते कर्नाटकातील ग्रामीण राजकारणाचा मोठा चेहरा आहेत. कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी कृषी, ग्रामीण विकास, पंचायती राज आणि जलसंपदा ही खाती सांभाळली आहेत. 

या शिवाय ते कायदा आणि संसदीय पद्धतीचेही जाणकार मानले जातात. विज्ञान आणि कायदा या दोन्ही विषयांत पदवीधर असलेले पाटील हे कर्नाटक सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्रीही राहिलेले आहेत. एच के पाटील कर्नाटक सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रालयाला सलग चार वर्षे राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला. 

गेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना राज्यातील प्रचार समितीचे प्रमुख केले होते. मात्र कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या खराब कामगिरीनंतर त्याची जबाबदारी घेत  राजीनामा देणाऱ्यांमध्ये एच के पाटील हे पहिले नेते ठरले होते. 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.