आयटीत कधीच भ्रष्टाचार होत नाही हा भ्रमाचा भोपळा ‘सत्यम’ मुळेच फुटला.

राजीव गांधीनी संवाद क्रांती केली आणि भारतीयांसाठी आयटीचे नवे विश्व खुले झाले. अनेक नव्या कंपन्या उभ्या राहिल्या. आयआयटी पास करून परदेशी जाणाऱ्या इंजिनियर्सचा ओघ थांबला. आपल्या देशात आयटीची नोकरी मिळू लागली.
नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आल मात्र त्याचा आयटी क्षेत्राला फायदाच झाल्या. येत्या दहा वर्षात प्रत्येक भारतीयाच्या हातात मोबाईल आणि ऑफिसमध्ये कॉम्प्यूटर दिसू लागला.
आयटीला बूम आहे हा शब्द तेव्हा परवलीचा होता. मुलगा कम्प्युटरमध्ये नोकरी करतो म्हटल्यावर घरच्यांची कॉलर अभिमानाने ताठ व्हायची. कॉर्पोरेटमधला बिनावशिल्याचा पांढरपेशा जॉब, चांगला पगार, परदेशी जायची संधी वगैरेमुळे प्रत्येकाला आयटीमध्येच जायचं होतं. तिथे कोणताही भेदभाव नसतो, कोणताही दोन नंबरचा व्यवहार होत नाही, फक्त तुमच्या कामगिरीवर तुमची इन्क्रीमेंट होत असते असे समज गैरसमज लोकांच्यामध्ये होते.
या सगळ्या भ्रमाचा भोपळा फुटला सत्यम घोटाळयामुळे.
सत्यम कंप्युटर ही एके काळी भारतातील आघाडीची आयटी कंपनी. रामलिंगा राजू यांनी १९८७ साली हैदराबादमध्ये तिची स्थापना केली होती. खरंतर राजू हे काही आयटी इंजिनियर नव्हते. त्यांचं शिक्षण कॉमर्समधलं. अमेरिकेत एमबीए केलं.
घरची परिस्थिती चांगली होती. भारतात परत आल्यावर अनेक उद्योग करून पाहिले. हॉटेल काढलं, स्पिनिंग मिल चालवायला घेतली, रियल इस्टेटमध्ये हातपाय मारून बघितला. पण काहीच चाललं नाही. शेवटी आपल्या मेहुण्यासोबत थेट सत्यम कंप्युटर सर्व्हिस नावाची आयटी कंपनीच उघडली. सुरवातीला अवघे वीस जण त्यांच्याकडे नोकरीला होते.
पुढच्या तीनचार वर्षात कंपनीच पब्लिक लिमिटेड मध्ये रुपांतर झाल.
जॉन डियर नावाच्या फोर्च्युन ५०० कंपनीने त्यांना काम दिले. तिथून सत्यम कंप्युटर्सची हवा सुरु झाली. राजू ज्याला हात लावेल त्याच सोन्यात रुपांतर होण्याचा तो काळ होता. स्वस्तात उपलब्ध होणारं हुशार भारतीय इंजिनीअर्सच मनुष्यबळ कस वापरायच हे राजूला व्यवस्थित उमगल होतं.
१९९५ साली आंध्रप्रदेश मध्ये सत्तेत आलेल्या चंद्राबाबू नायडू यांना हैदराबादला आयटीसिटी बनवायचं होतं. त्याकाळी ही उपाधी मिळावी म्हणून बेंगलोर आणि पुणे या दोन शहरामध्ये स्पर्धा लागली होती. चंद्राबाबूनी सॉफ्टवेअर कंपन्यासाठी हैद्राबादमध्ये पायघड्या पसरल्या. त्यांना बिझनेससाठीचे नियम शिथिल केले. त्यांचं मंत्रालय देखील एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे काम करत होतं.
एवढ्या आयटीच्या फायद्याच्या गोष्टी हैदराबादमध्ये घडत होत्या तर सत्यमचा रामलिंगा राजू मागे राहिलं हे कस शक्य होतं?
सत्यमवर चन्द्राबाबुंचा विशेष वरदहस्त आहे हे सगळ्यांना ठाऊक होते. रामलिंग राजूला मुख्यमन्त्र्याच्या ऑफिस मध्ये खुला प्रवेश होता. वेगवेगळ्या योजनांसाठी राजू नायडूंनां मदत करत होता. फक्त आंध्रातच नाही संपूर्ण भारतात सत्यमची धूम होती. सर्वात तरुण श्रीमंतांच्या यादीत त्याच नाव आघाडीवर होतं. त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत होता.
१९९८ साली तो म्हणाला,
येत्या काही वर्षात जगभरातल्या ५० देशात माझे पन्नास हजार कर्मचारी काम करत असतील. त्याच्या या वक्तव्यात कोणालाही अतिशयोक्ती वाटत नव्हती.
सत्यमची ही आघाडी २००४-०५ पर्यंत चालली. तो पर्यंत चंद्राबाबूंच सरकार आंध्रप्रदेश मध्ये सत्तेवर होतं. पण त्यानंतर मुख्यमंत्री बनलेले कॉंग्रेसचे वायएसआर रेड्डी यांना आयटीबद्दल कोणतीही सहानुभूती नव्हती. नायडूंच्या काळात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, त्यांनी आंध्रच्या शेतीकडे केलेले दुर्लक्ष यामुद्द्यावर वायएसआर यांनी निवडणूक जिंकली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही त्यांच्यासाठी प्रायोरीटी होती.
७ जानेवारी २००९ हा दिवस सत्यम कंप्युटर्ससाठी मुळापासून हादरवणारा ठरला.
त्यादिवशी सत्यम कंप्युटर्सचे चेअरमन रामलिंगा राजू यांनी एक पत्र लिहून त्यात आपण कंपनीमध्ये ७ हजार कोटींचा घोटाळा केला असल्याची कबुली दिली. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या आयटी इंडस्ट्रीवर बॉम्ब पडला. ज्याला आतापर्यंत राजकारण विरहीत सचोटीचा धंदा समजल जात होतं तिथेच हा घोटाळा उघडकीस आला होता.
लगेच सरकारने सीबीआय चौकशी लावली. त्यानंतर रामलिंगा राजूने केलेले पराक्रम उघड होतं गेले.
राजुनी गेल्या पाच-सहा वर्षात सत्यमच्या नफा-तोटा पत्रकांमध्ये व ताळेबंदामध्ये आकडे फुगवून दाखवले होते. लोकांच्याकडून येणी आहेत असेही खोटेच सांगितले होते. इतकेच नाही तर कंपनीमध्ये फक्त ४० हजार कर्मचारी असताना ५४ हजार कर्मचारी दाखवून त्यांचेही पगार मधल्या मध्ये हडप केले होते.
सत्यमच्या मालकी हक्कात अल्प हिस्सा असूनही तिथल्या व्यवस्थापनावर पकड घट्ट करण्यासाठी, शेअर बाजारात सत्यमचे तेजीत दाखवण्यासाठी राजू आणि त्याचे भाऊ खोटी हिशोबपत्रे दाखवत होते. आणि तो ताळेबंद जुळवून आणण्यासाठी मुलांच्या नावावर सुरु केलेल्या मायतास (सत्यमच्या नावातील अक्षरांच्या उलट) इंजिनियर्स नावाच्या कंपन्या विकत घेण्याचाही घाट घातला गेला होता.
सत्यमचा वैधानिक लेखा परीक्षणाची जबाबदारी प्राईस वॉटर कुपर या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या फर्मकडे देण्यात आली.
त्यांनी राजू सोबतच, सत्यमचे संचालक, अंतर्गत लेखा परीक्षण मंडळ यांच्यावर ठपका ठेवला. याशिवाय सेबी, कंपनी लॉ बोर्ड या संस्थेच्या कामावर देखील शंका उपस्थित केली. जवळपास १४ हजार कोटींचा घोटाळा असण्याची शक्यता व्यक्त केली गेली.
रामलिंगा राजूला व त्याच्या भावाला अटक केली गेली. बघता बघता देशातली ४थ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी धुळीस मिळाली. ४० हजार कंपन्याचं भविष्य धोक्यात आले. सत्यम घोटाळयाचा परिणाम भारतीय आयटीच्या जागतिक इमेजवर देखील पडला. पुढे कोर्टाचा निकाल लागल्यावर राजूला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
पुढे महिंद्राने ही कंपनी अल्पदरात विकत घेतली. तिचे नाव महिंद्रा सत्यम झाले. काही दिवसांनी त्यांनी ते अपशकुनी सत्यम हे नावसुद्धा हटवून टाकले.
सरकारने देखील यानिमित्ताने धडा शिकला. आयटी व कॉर्पोरेट म्हणजे कधीही टक्स न बुडवणारे व्हाईट कॉलर हे चित्र पुसून टाकण्यात आले. कॉर्पोरेटचे विषयकचे नियमदेखील कडक करण्यात आले. यानंतर असा घोटाळा परत होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
हे ही वाच भिडू.
- मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.
- दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.
- अंतुलेंचा सिमेंट घोटाळा, नेमकं काय होतं ते प्रकरण ?
- सेकदांच्या काही भागात त्यांनी शेअर मार्केटमध्ये हजार कोटींचा घपला केलाय.