एका सत्यनारायण पूजेने मुंबईच्या कामगार चळवळीचा इतिहास बदलून टाकला…

९ ऑगस्ट १९६८ रोजी ‘भारतीय कामगार सेना’ अधिकृतरीत्या स्थापन झाली. शिवसेनेची स्थापना होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला होता. ठाकरे यांनी मराठी माणसांच्या मनामध्ये फुलवलेला अस्मितेचा निखारा धगधगत होता.

लालबाग-परळ-सात रस्ता-ना. म. जोशी मार्ग या गिरणगावात सेनेचं बस्तानही बऱ्यापैकी बसलं होतं.

पण या पट्ट्यातील शिवसैनिक कायम दुहेरी कात्रीत सापडलेले असायचे. गिरण्यांच्या बाहेर शिवसैनिक वावरणारे आणि कम्युनिस्टांच्या विरोधात सहभागी होणारे हे कामगार, गिरण्यांच्या गेटवर आपले कार्ड पंच करून आत शिरल्यावर मात्र हाती एकदम लाल बावटाच घ्यायचे.

१९६० च्या दशकात मुंबईतल्या गिरण्यांमध्येच नव्हे, छोट्या -मोठ्या उद्योगांमध्ये कम्युनिस्टांच्या संघटनांचं वर्चस्व होतं. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉ.डांगे आणि साठी जॉर्ज फर्नांडिस असे मात्तब्बर कामगार नेते विजयी झाले होते आणि मुंबईच्या कामगार चळवळीवर डाव्या, साम्यवादी आणि समाजवादी विचारांचं वर्चस्व संपवून, त्या जागी शिवसेनेचा ‘भगवा’ आणल्याशिवाय साम्यवादाच्या या प्रभावाला छेद देता येणार नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांना कळून चुकलं होतं.

कम्युनिस्टांचं आपल्या कामगारांवर असलेले वर्चस्व मोडून,या कामगार संघटना मोडीत काढण्यासाठी, कामगार क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.

त्यामुळेच ९ ऑगस्ट १९६८ रोजीची संध्याकाळ ‘भारतीय कामगार सेना’ या नावाने नरे पार्कवर भगवे झेंडे फडकवत गिरणगावच्या सामोरी आली होती. भर पावसात ठाकरे यांच्या सभेला गिरणगावातील कामगारांनी केलेली गर्दी केवळ कुतूहलापोटी जरूर होती; परंतु ठाकरे यांच्या भाषणाचा एकूण नूर आणि सभेचा थाट यामुळे यामुळे त्या कामगारांच्या मनात कम्युनिस्ट संघटनांविषयी असलेल्या आत्मीयतेला थोडाफार धक्का जरूर बसला होता हे मान्य करावंच लागतं.

बाळासाहेब म्हणाले,

“आजवर आमची युनियन नव्हती, तरी एकजुटीच्या ताकदीवर कामगारांच्या हितावर निखारे ठेवणारे संप आम्ही मोडून काढले. आता तर आमची युनियन आहे. मालक चांगला असेल तर त्याला नमस्कार, कामगारांना नीट वागवलं तर शेक हॅन्ड. जर तस केलं नाही तर मात्र शेकवायचं !” 

मुंबई ठाणे भागात शिवसेनेच्या शाखांचं जाळं आधीच पसरत चाललं होतं. तिथे कामगारांची देखील वर्दळ वाढू लागली. एखाद्या कामगारावर अन्याय होत असल्याचं गाऱ्हाणं आलं कि लगोलग त्या कारखान्यात फोन करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु होतं. फक्त अट एकच असायची, कामगार सेनेचाभगवा झेंडा कारखान्यात न्यायचा.

डाव्या संघटनांच्या सारख्या होत असलेल्या संपाला मालक वर्ग वैतागला होता. त्यांनी दुसरी युनियन स्थापन होत असेल तर त्याला सहकार्यच करायचं धोरण स्विकारलं. 

भारतीय कामगार सेनेचं औद्योगिक क्षेत्रावरील वर्चस्व खऱ्या अर्थाने प्रस्थापित झालं, ते ‘टी.माणेकलाल आणि कंपनी’तील संप फोडल्यानंतर.

हि घटना आहे १९६९ मधली. त्या काळात टी.मानेकलाल हि मुंबईतील एक बडी इंजिनिअरिंग कंपनी होती आणि तेथे प्रदीर्घ काळापासून ‘आयटक’ या कम्युनिस्टांच्या संघटनेची युनिअन होती. बी.एस धुमे या पन्नाशीतल्या नेत्याच्या हातात तेंव्हा मानेकलाल मधील आयटक’चं युनिट होतं. ‘इंजिनिअर अँड मेटल वर्कर्स युनिअन’ असं संघटनेचं नाव होत. संपाची हाक अर्थातच ढुमे यांच्या नेतृत्वाखालील कमिटीने दिलेली होती.

९० दिवस झाले कामगारांची जिद्द कायम होती आणि मालकही कामगारांच्या मागण्यांकडे ढुंकून पाहायला तयार नव्हता. संप मोडून काढण्यासाठी मालकाने गुंडाचा वापर कसा सुरु केला होता, त्याचा तपशील खुद्द धुमे यांनी माहिती दिली होती. पण मालकांच्या गुंडगिरीने कामगार मुळीच घाबरून गेले नव्हते.

टी. माणेकलाल अँड कंपनीत त्या वेळी सुमारे ६० टक्के मराठी कामगार होते. पण तेही एकजुटीने आयटकच्या लाल बावट्याखाली एकत्र आले होते.

त्यांच्या या ‘मराठी’पणाचा फायदा उठवून संप फोडायचा, असं मालकानं ठरवलं. ‘कारखान्यात पाप खूप झालं आहे, त्यापासून मुक्ती मिळावायची’ असं कारण देऊन त्यांनं कारखान्यात सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि ठाकरे यांना आमंत्रण दिलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कारखान्यात येऊन दाखल झाले. कारखान्याच्या आवारात एका झाडाखाली त्यांच्यासाठी खुर्ची टाकण्यात आली होती. तेंव्हा ‘ठाकरे’ या नावाला एक वलय प्राप्त होतं. आणि मराठी माणसाच्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल होतं. एकएक करत कारखान्यातील सगळे मराठी कामगार त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले.

बाळासाहेबांनी भाषण सुरु केलं,

” हे लाल बावटेवाले तुमचं नुकसान करत आहेत. संपामुळे काहीही फायदा होण्याची शक्यता नाही. तेंव्हा निदान मराठी कामगारांनी तरी एकत्र होऊन कामावर जायला हवं.” 

कम्युनिस्ट पक्षांच्या संपणे आपल्याला खरोखर  याबाबदल मराठी कामगारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. संपाला गळती लागायला सुरुवात झाली. त्याकाळात दाक्षिणात्य लोकं आपल्या नोकऱ्या घेतात यामुळे असंतोष होताच. मराठी कामगार गटागटाने कामावर जायला लागले. बाळासाहेबांनी कम्युनिस्टांचा संप मोडून काढला.

मालकाने लढवलेल्या आयडियाचा अपेक्षित परिणाम झाला. टी. माणेकलाल कंपनीवर भारतीय कामगार सेनेचा भगवा फडकला आणि कारखाना सुरु झाला.

टी. माणेकलाल आणि कंपनीत एका सत्यनारायणाच्या पूजेने कामगार चळवळीच्या मुंबईतील इतिहासाला वेगळंच वळण दिलं ! एका प्रतिष्ठेच्या कारखान्यातील कम्युनिस्टांच्या वर्चस्वाला शह देण्याची कामगिरीही बाळासाहेब ठाकरे यांनीच बजावली होती. पण एवढंच नाही तर कम्युनिस्टांच्या हातात असलेली मुंबई जिंकण्याच्या दिशेने शिवसेनेचं पहिलं पाऊल पडलं होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.