वारणेच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगरांचे राज्य करणारा तो खराखुरा रॉबिनहूड होता

स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीनं पेटलेल्या वेड्या माणसांनी संघर्षाच्या यज्ञकुंडात सर्वस्वाचे बलिदान केले आणि ज्ञात अज्ञात वीरांच्या प्राणज्योतींनी अंधार उजळून निघाला ! अशाच एका रांगड्या दरोडेखोर देशभक्ताची कुंभोज गावात घडलेली ज्वलंत कथा !

वारणा नदीच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगरांचे राज्य करणारा हा

सत्तू भोसले म्हणजेच वारणेचा वाघ….

सत्तूने सातवीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन त्याने घोडदळात नोकरी धरली. आईशिवाय त्याला कोणी नव्हतं. मनानं आणि बळानं मजबूत झालेला तो सत्तू घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला. त्याची बेफाट घोडदौड बघून इंग्रज अधिकारी बावचळून गेले होते. कैक इंग्रजी मॅडम सत्तूला बघून जिभल्या चाटू लागल्या होत्या. साऱ्या घोडदळात त्याचा वचक बसू लागला होता. बंदुकीपासून ते कुस्तीपर्यंत त्याला रोखणारा अजून कुणी पैदा झाला नव्हता.

सत्याप्पा भोसले हा अंगाने धिप्पाड, राजबिंडा असा गडी होता. गावात सहसा त्याच्या कुणी नादी लागत नसायचं. हा सत्याप्पा भोसले पुढे सत्तू भोसले म्हणून ओळखला जाऊ लागला. सत्तूने पुढे ब्रिटिश फौजेत नोकरी धरली होती. त्याच्या नेमबाजीवर इंग्रज अधिकारी कायम खुश असायचे. सत्तू नेमबाजीत इतका कुशल होता कि त्याचा निशाणा हा अचूक लागायचा, त्यामुळे इतर ब्रिटिश अधिकारी त्याला घाबरून असायचे.

इंग्रज अधिकाऱ्यांच्या हेकट आणि उद्धट वर्तनाला वैतागून सत्तूने ती नोकरी सोडली आणि तो गावी येऊन शेती, मोलमजुरी करू लागला. गावाच्या मथाजी चौघुल्याने त्याला डिवचलं होतं, पण सत्तू शांत होता.

एके दिवशी कुंपणाची नांगी मोडली म्हणून मथाजी एका गरोदर बाईला मारत होता तेव्हा सत्याप्पाने त्याला अडवलं तेव्हा मथाजीने त्याला लोटून दिलं. सत्याप्पाने त्याला बरंच समजावलं पण मथाजीने उलट सत्याप्पाला बोलायला चालू केलं आणि मग कुऱ्हाडीच्या एका दणक्यात सत्याप्पाने मथाजीला गार केलं. 

गावाने सत्तूला फरारी घोषित केलं पण सत्याप्पा म्हणत राहिला कि आपण जे केलं ते नेक काम होतं.

तिथून पुढे सत्याप्पा भोसले हा रॉबिनहूड म्हणून पुढे आला. कैक लेकीबाळींचे संसार त्यानं सोयीला लावले. गावातले मी मी म्हणणारे त्याने कायमचे गप बसवले.

मुलींना हुंड्यापायी हाकलून लावणाऱ्या जावयांना त्याने सुतासारखे सरळ केले. बायकांना सत्तूत भाऊ गवसला होता.

वारणेच्या खोऱ्यात सत्तू राजा सारखा वावरायचा. ब्रिटिश सत्तेने त्याच्यावर पाच हजारांचा इनाम ठेवला होता. त्या खोऱ्यातील इरसाल टगे इंग्रज सरकारला मदत करत होते. ज्या गरोदर बाईचा त्याने प्राण वाचवला होता तो तिचा भाऊ झाला होता. इंग्रज सरकार सत्तूला पकडण्यासाठी जीवाचं रान करत होते. पण सत्तू हाती लागत नव्हता.

एके दिवशी सत्तू गावच्या टग्यांच्या तावडीत सापडला. तो अतिशय उदास झाला पण त्याने त्याच्या फकिरा मित्राला निरोप दिला , फकिराने घनघोर युद्ध आणि युक्तीच्या बळावर सत्तूला अलगद त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि तो तिथून सुटला. पुढे मात्र सत्तूने ब्रिटिश सत्तेची झोप उडवली. त्याने ब्रिटिशाना सळो कि पळो करून सोडले.

पण अनेक दिवस लपून छपून वावरणारा सत्याप्पा भोसले अडकलाच. परकीय शत्रुंपेक्षा घरचे भेदी घातक असतात याचा प्रत्यय सत्याप्पा भोसलेला आला, ज्याला सत्तूने आईच्या पोटात वाढवला त्यानेच सत्तूचा खून केला.

सत्याप्पा हा गोर गरिबांचा कनवाळू होता. तो बंडखोर होता. बऱ्याचदा तो कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी इंग्रजांपासून लपण्यासाठी येत असे. त्यामुळे पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांवरही त्याचा प्रभाव होता. बंडखोरी आणि सत्यनिष्ठा हे संस्कार लहानपणापासूनच भाऊरावांना सत्याप्पा कडून मिळाले होते. सत्याप्पा भोसले हा वारणेचा खऱ्या अर्थाने वाघ होता. शेवट्पर्यंत तो सांगत होता कि,

मी जे करतोय तो गुन्हा नाही, गोरगरिबांना जो त्रास देईल त्याच्यासाठी हा सत्याप्पा भोसले काळ बनून उभा राहील.

या सत्याप्पा भोसलेच्या जीवनावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘ वारणेचा वाघ ‘ हि कादंबरी लिहिली. हि कादंबरी त्याकाळातली बेस्ट सेलर कादंबरी होती. पुढे अण्णाभाऊंच्याच या कादंबरीवर आधारित वारणेचा वाघ हा चित्रपट आला ज्यात सूर्यकांत यांनी सत्याप्पा भोसलेची भूमिका साकारली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.