सौदी अरेबियातल्या अरबांना उंटांवरून फेरारीत आणणारा माणूस आज वारला..

सौदी अरेबिया हा तसा एका माणसाचा एका कुटूंबाचा देश. अब्दुल अझीझ इब्न सौद या माणसाच्या नावाने निर्माण झालेला देश म्हणजे सौदी अरेबिया. आजच्या इतिहासात या माणसाचे २१ हजार वंशज सौदी भूमीत असल्याचे सांगतात. प्रत्येकाला १०-१५ बायका आणि त्या बायकांना १०-१५ मुलं. साहजिक खूप कमी काळात खूप जास्त वंशविस्तार होत गेला. 

पण राजा असणाऱ्या सगळ्यांना शेख म्हणवून घेता येत नाही. फक्त पुरूषांना तनखा मिळते.  एका राजाच्या पाच मुलांना समान अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे हे सगळे शेख नसतात. शेख हे फक्त राजाच्या गाभाऱ्यात जाणाऱ्यांना मिळणारा मान. तो मान देखील अब्दुल अझीझ इब्न सौदच्या पोरांना. 

अशा या राजेशाही वातावरणात एक आऊटसाईडर आला.  

सौदीच्या इतिहासात एकमेव बाहेरचा व्यक्ती होता ज्याला वेगळ्या घरातला असूनही २५ वर्ष तेलमंत्रीपदावर राहण्याचा मान मिळाला. ज्याला शेख बिरूद लावलं गेलं.. 

तो माणूस म्हणजे शेख अहमद झाकी यामानी… 

अरब देशांच्या इंधननितीचे शिल्पकार समजल्या जाणाऱ्या शेख अहमद झाकी यामानी यांच आज निधन झाल्याची बातमी आली. यापूर्वी १९९० साली त्यांचा खून झाल्याची बातमी पसरली होती.  तेव्हा त्यांच्यात व सौदी राजघराण्यात वितुष्ट आलं होतं. ते पदावर देखील नव्हते.  पण जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा अमेरिकेचं शेअर मार्केट कोसळलं होतं. या बातमीचं खंडन यामानी यांच्यामार्फत कोणीही केलं नव्हतं. अखेर सौदी राजघराण्यालाच यामानी यांना काहीही झालं नसल्याचं सांगून या विस्तवावर पाणी टाकावं लागलं होतं. 

यामानी नक्की कोण होते हे सांगताना त्यांच महत्व सांगायला पाहीजे,  हे महत्व सांगताना त्यांच्या सुरक्षेवर एक झलक टाकली पाहीजे. या माणसाच्या सुरक्षेसाठी इंग्लडच्या नेव्हीची एक तुकडी कायम असे. प्रवासाला नेहमी स्वत:च विमान असे. जेव्हा या माणसाला पार्टी करू वाटे तेव्हा कुठे बाहेर जाण्याऐवजी हा माणूस आपल्याच लंडन, न्यूयॉर्क, जिनिव्हा अथवा पॅरिसच्या हवेलीत पार्टी करायचा. पार्टीसाठी बिल क्लिंन्टन पासून ते नेल्सन मंडेलांना बोलवायचा. ते देखील तितक्याच जलदपणे.. 

अरब देशातल्या राजघराण्यात इतकं महत्व एका बाहेरच्या माणसाने कसं निर्माण केलं याचं आश्चर्य वाटू शकतं, पण त्यांच्याबाबत माहिती वाचल्यानंतर ते पटू लागतं.. 

यामानी यांचा जन्म १९३० चा. त्यांचे वडील हे कुराणाचे पंडीत. सरकारचे धर्मगुरू होते. त्यांचे पणजोबा सौदीतून येमेनला आणि परत येमेनमधून सौदीला आले होते म्हणून त्यांच आडनाव यामानी झालं.  यामानी यांचा जन्म झाला तेव्हा तेलाचं साम्राज्य नव्हतं. खुद्द राजाचा दरिद्र्याचं जीवन जगत होता.  यामानी हा शिक्षणात सर्वात पुढे होता. एक काळ असा आला की त्याला सौदीचे राजपुत्र फैझल यांच्याकडून बक्षीस मिळालं. याच राजपुत्रासोबत मिळून त्याने जगाला तेलाचं अर्थकारण समजावलं. 

पुढे यामानी आपल्या हुशारीमुळे कैरो विद्यापीठात गेला. दूसरीकडे तेलाच्या अर्थकारणाने सौदी घराण्याचं महत्व वाढत होतं तर सरकारचे धर्मगुरू म्हणून यामानी कुटूंबाचे सुद्धा चांगले संबंध प्रस्तापित होत होते. या दरम्यान यमानी यांच्या विद्यापीठात एक मुलगा होता. त्याला एका वाळवंटात स्वत:चा देश निर्माण करायचा होता. यामानी यांनी आपले संबंध वापरून या मुलाला ३३ हजार डॉलर्सची मदत मिळवून दिली. यामानी यांचा हा वर्गमित्र म्हणजे यासर अराफत. 

शिक्षण संपवून मक्केत आलेल्या यामानी याला अर्थखात्याने नोकरी देवू केली.

त्याने एका बाजूला नोकरी आणि दूसऱ्या बाजूला धर्मशिक्षण देखील सुरू केलं.  त्या काळात सौदीत शिक्षणाच्या जास्त सुविधा नव्हत्या. दूसरीकडे तेलक्रांन्तीमुळे सौदीचे जगभराशी व्यवहार वाढू लागले होते. अशा वेळी एकदिवस यामानीला सूचना मिळाली की न्यूयॉर्क विद्यापीठात जावून पुढील शिक्षण घ्यावे. तेल निर्मातीमुळे देश विदेशातल्या येणाऱ्या प्रस्तावाचे बारकावे समजणाऱ्या व्यक्ती सौदीला हव्या होत्या.  

यामानी अमेरिकेत गेला आणि शिक्षण घेवू लागला. इथल्या शिक्षणात वरिष्ठांवर त्याचा इतका प्रभाव पडला की त्याला सांगण्यात आलं की तू हॉवर्ड विद्यापीठात जावून कॉर्पोरेट ज्युरसप्रुडन्सचा अभ्यास करावास. यामानी हावर्ड विद्यापीठात दाखल झाला. 

१९५६ साली हॉवर्ड मधलं शिक्षण संपवून तो सौदीत परतला. धार्मिक आणि आयकरासाठी निर्माण केलेलं स्वतंत्र खातचं त्याच्याकडे देण्यात आलं. पुढे सौदीचे तेलमंत्री अब्दुला तारिकी यांनी त्याला तेलकरार समजून घेण्याचं व योग्य प्रस्ताव आपणापुढे आणण्याचं काम त्याला दिलं. 

पुढे त्याने हे काम संपवून कायदेशीर सल्ला देणारी लॉ फर्म काढली. तेव्हा सौदीत कायदा, व्यवहार याबद्दल जागरूकता नव्हती. सौदीत येणाऱ्या कंपन्यांना ते इथले कायदे समजावून सांगू लागला. याच दरम्यान तो वर्तमानपत्रात लिहू लागला. प्रचंड वाचकसंख्या निर्माण झाली… 

याच त्याच्या वाचकांपैकी एक होते प्रिन्स फैझल.. 

१९५७ साली प्रिन्स फैझल यांनी यामानीला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि थेट या क्षणापासून तू माझा कायदेशीर सल्लागार अशी ऑफर दिली.. 

याच क्षणापासून यामानी हा आदरार्थी यामानी झाले… 

फैझल आणि यामानी हे पुढे समीकरण झालं.  या दोघांच्यात फुट पाडण्याचे कारस्थान सर्व जगाने करुन पाहीले पण कोणालाच ते शक्य झालं नाही. आपल्या पोटच्या पोरांपेक्षा जास्त माया फैझल यांनी यामानीला लावली. 

यानंतर यामानी एक एक पायऱ्या वर चढत गेले.  १९६२ ते १९८६ या काळात ते सौदीचे तेलमंत्री राहिले.  ओपेकचे ते २५ वर्ष मंत्री राहिले. या काळात तेलातून पैसा निर्माण करण्याचं यंत्र त्यांनी राबवलं. १९८६ साली सौदीच्या सेंटर फॉर ग्लोबल एनर्जी स्टडीज संस्था उभारली.  १९८२ साली त्यांनी स्थापन केलेल्या इन्व्हेस्टकार्प या खाजगी गुतंवणूक कंपनीतर्फे अनेक कंपन्याचे व्यवहार पाहीले जावू लागले. टिफनी, ब्रेक्वेट ही स्वीस घड्याळाची कंपनी कार्टियर, पियाजे, बॉम मर्सियर, आल्फ्रेड डनहिल अशा कंपन्यामध्ये त्यांची गुंतवणूक राहिली. 

त्यांना पेन बाळगण्याचा शौक होता. MONT BLOC या कंपनीत देखील त्यांची गुंतवणूक व सहभाग होता.  

त्यांच्या एका शब्दावर लोकांची गुंतवणूक ठरायची. असे हे शेख अहमद झाकी यामानी. त्यांच आज वयाच्या ९० व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाल… 

माहिती संदर्भ : 

https://www.nytimes.com/2021/02/23/business/ahmed-zaki-yamani-dead.html

एका तेलियाने : गिरीश कुबेर 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.