नागपूरच्या कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी पैज लावून एक डिश बनवली : सावजी मटण

वऱ्हाडी पाहुणचार म्हणजे अघळपघळ कारभार. खाण्यापिण्याचा शौक करावा तर नागपुरी लोकांनीच. स्वतःदेखील चवीने खाणार व तिथे येणाऱ्या प्रत्येकाला खिलवणार. तिथलं आदरातिथ्य कोणीही विसरू शकणार नाही.

अशा या नागपूर व्यंजणामधली फेमस डिश म्हणजे सावजी मटण.

संपूर्ण भारतात ‘सावजी’ म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. झणझणीत ‘सावजी’चा जन्म या नागपुरातच झाला.

सत्तर वर्षांपूर्वी हलबा कोष्टी समाजबांधवांनी ‘सावजी’ प्रकाराला नागपुरात जन्म दिला. या मागे देखील एक गंमतिशीर इतिहास आहे.

इंग्रजांच्या काळात व त्यानंतरही काही वर्षे नागपूर हे मध्यप्रदेश मध्ये येत असे. त्याकाळी देखील हे समृद्ध शहर होतं. नोकरी, काम धंद्यासाठी मध्यभारतातुन अनेकजण नागपूरमध्ये येत असत.

विदर्भात पिकणाऱ्या कापसामुळे नागपुरात बऱ्याच कापड गिरण्या सुरू झाल्या होत्या.

मध्य प्रदेशच्या मुलताई, बतूल, पांढुर्णा,छिंदवाडा या भागांतील आदिवासी हलबा कोष्टी समाजाचा हातमाग हा प्रमुख व्यवसाय होता. त्यांना सावजी म्हणून ओळखलं जायचं.

इंग्रजांच्या धोरणांमुळे त्यांचे धंदे बंद पडले व या समाजातील अनेक तरुण कापड गिरणीमध्ये मजुरी करण्यासाठी नागपूरला आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची कुटुंबे देखील आली.

दिवसभर गिरणीमध्ये राबराब राबल्यावर ही मुलं रात्री विरंगुळा म्हणून कबड्डी खेळायची.

कामाचा ताणतणाव या खेळातून निघून जायचा. हे सामने अत्यंत चुरशीने खेळले जायचे. त्यावर पैजा लावल्या जायच्या. एकदा अशीच एक पैज लागली ती होती चविष्ट रेसिपी बनवण्याची.

आतापर्यंत खाल्ला नाही असा नॉन व्हेजपदार्थ बनवायचा होता.

पोरं झाडून कामाला लागली. घरी आयांना विचारून टिप्स घेतली गेली. कोणी मटण बनवलं तर कोणी चिकन. जे मांसाहारी नाहीत, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीची डाळकांदा भाजी, पाटवडी, गवार अशा भाज्या तयार झाल्या.

वेगवेगळे प्रयोग करून या रेसिपी बनवण्यात आल्या. त्यांच्या मित्रांना त्या प्रचंड आवडल्या.

परंपरागत सावजी घरात बनणारा खास गरम मसाला हे त्यांचे सिक्रेट इन्ग्रेडियंट होते. कांदा लसूण तिखटाची झणझणीत फोडणी द्यावी तर सावजींनी, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.

नागपूरच्या पट्टीच्या खवय्यांना त्या पदार्थांच्या चवीने वेडं केलं होतं.

या सावजी पदार्थांचे हॉटेल सुरू करायचा सल्ला मिळू लागला.

गिरणीत मजुरी करून वैतागलेल्या पोरांनी धाडस करायचं ठरवलं. नागपूरच्या गोळीबार चौकात दुकाने लागली. एकाचे दोन दोनाचे चार असे करत ही हॉटेल्स वाढत गेली.

शौकीन नागपूरकरांनी त्याला डोक्यावर घेतले. विशेषतः झणझणीत सावजी मटण सुपरहिट झाले.

फक्त नागपूरच नाही तर बाहेरच्या लोकांना देखील हलबा कोष्टी लोकांची तिखटजाळ सावजी रेसिपी भन्नाट आवडली. पण प्रत्येकाला ती झेपेलच अस नाही.

आज जवळपास २५० च्या वर हॉटेलमध्ये सावजी मटण मिळते. पण सगळीकडेच ओरिजिनल सावजी खायला मिळेल अस नाही.

खास सावजी रेस्टॉरंटमध्ये मात्र ७०-८०वर्षां पूर्वीची चव अजूनही जपलेली आहे.

ही नागपुरी रेसिपी पुण्या मुंबईला पोहचली, तिथून तर ती आता सातासमुद्रापार गेली आहे. दुबई सारख्या शहरात देखील सावजी मटण मिळणे अवघड गोष्ट उलरलेली नाही.

नागपुरी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, रविवारचा दिवस खास सावजी मटणाचा असतो, मित्रमंडळींना बोलवून मटण खिलवल जात. त्याच्या चवी बरोबर रेंगाळणारी सुस्त दुपार नागपूरची ओळख बनलेली आहे.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. अभिजित दलाल says

    सावजी मटण ही नागपूरच्या कोष्टी समाजाची नाही तर आदिवासी हलबा समाजाची ओळख आहे. नागपूरला आदिवासी हलबा समाजा व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे कोष्टी समाज राहतात उदा:- देवांग,लाड,गाढेवाल ई. परंतु सावजी म्हणून ओळखल्या जाते ते फक्त आदिवासी हलबाना !! आदिवासी हलबानी कोष्टी (वीणकरी) व्यवसाय फार पूर्वी पोट भरण्यासाठी स्वीकारला आणि पिढी दर पिढी तो व्यवसाय चालू राहिला. या व्यवसायामुळे हलबाना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. हिंदू समाज व्यवस्थेनुसार व्यवसाया वरून ती जात ठरवल्या गेली…परंतु स्वतः च्या विशिष्ट बोली भाषेमुळे आनि काही रीती रिवाजांमुळे हे लोक इतर कोष्टयापेक्षा वेगळे ठरतात. यांना बोली नुसार हलबा कोष्टी असेही समजले जाते. अल्पसंख्य असल्याने राजकीय ताकद नाही त्यामुळे योग्य ते ऐतिहासिक पुरावे असूनही त्यांना स्वतःची आदिवासी हलबा ही ओळख मिळवण्यासाठी 40 वर्षांपासून सतत संघर्ष करावा लागत आहे..

  2. Amit Patil says

    खूप साऱ्या सावजी हॉटेल ना चंद्रशिला सावजी असं नाव असतं. त्यामागे काय कारण आहे. ? चंद्रशिला कोण होती?

Leave A Reply

Your email address will not be published.