या दहा गोष्टी वाचल्यास सावरकरांबद्दल तुमचे मत बदलेल..

१. गोहत्या आणि सावरकर-

गाय हा उपयुक्त प्राणी आहे हे सावरकर म्हणायचे हे सर्वाना ठाऊक आहे. पण काहीवेळा त्यांचे विचार एवढे प्रखर होते की आजही अनेकांना ते पचायला जड जातील. सावरकर म्हणतात,

“दुर्ग वा राजधानी हिंदू शत्रूच्या हाती पडू देण्यापेक्षा आणि तशा राष्ट्रहत्या करण्यापेक्षा वेढ्यातील अवश्य तितक्या गाई मारून खाणे, ती गोहत्या करणे हाच खरा हिंदू धर्म.”

(समग्र सावरकर वाङ्मय: खंड ३, पृष्ठ १८६)

२.१८५७ चे स्वातंत्र्य समर.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचे खुद्द शहिद ए आझम भगतसिंग हे भक्त होते. या पुस्तकाला बंदी आहे हे समजताच त्यांनी चोरून हे पुस्तक छापून घेतले होते आणि ते अनेक ठिकाणी वाटले देखील होते. या स्वातंत्र्यलढ्याच वर्णन सावरकरांनी हिंदू मुस्लीम एकतेचे उदाहरण म्हणून केले आहे. ते म्हणतात,

“हे पाच दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सदोदित चिरस्मरणीय असोत ! कारण महंमद गिजनीच्या स्वाऱ्यापासून सुरु झालेले हिंदू व मुसलमान युद्ध संपल्याची द्वाही पाच दिवसांनी फिरवली. हिंदू व मुसलमान यांच्यातील परकेपणा जाऊन व त्यांच्यातील जीतनेतृत्वभाव नामशेष होऊन त्यांचे भावा भावाचे नाते ह्या दिवशी जगजाहीर झाले.

हिंदुस्थान हा आपला स्वदेश आहे आणि आपण सर्व सख्खे भाई आहोत अशी गर्जना करीत हिंदू व मुसलमानांनी समसमानतेने व एक मताने दिल्लीच्या तक्तावर स्वराज्याचे उभयसंमत निशाण त्या दिवशी उभारले.”

(समग्र सावरकर वाङ्मय : खंड ८, पृष्ठ १०६)

३.गांधीजी आणि सावरकर भेट.

१९०९ साली लंडनमध्ये विजयादशमीनिमित्त भरलेल्या सभेच्या अध्यक्ष स्थानी महात्मा गांधीना आमंत्रित करण्यात आल होतं. तेव्हा सावरकरांनी श्रीरामाचा महिमा सांगितला,

“श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्तानातला राम नाहीसा झाला. हिंदू हिंदुस्तानचे हृद्य आहे तथापि इंद्रधनुष्यात जसे खरे सौंदर्य रंगांच्या अनेक्तेने न बिघडता ते अधिकच खुलते, तसेच मुसलमान, पारशी, यहुदी वगैरे जगातील सर्व सुधारणेचे उत्त्मांश मिसळून घेऊन हिंदुस्थानही कालाच्या आकाशात अधिक खुलेल. “

याला उत्तर देताना गांधीजी म्हणाले,

“काही मतभिन्नता असली, तरी मला देशभक्त सावरकरांसन्निध बसण्याची संधी मिळाली याब्ब्द्ल अभिमान वाटत आहे. त्यांच्या स्वार्थत्यागाची व देशभक्तीची मधुर फळे आपल्या देशाला चिरकाल लाभोत.”

४. जातीव्यवस्था आणि सावरकर. 

रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले.

या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना ‘धर्मद्रोही’ ठरवून ‘त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते’ असा ठराव मांडला.

५. भारतरत्न आणि सावरकर.

१९६० साल हे सावरकरांच्या दोन जन्मठेपेच्या सुटकेचे वर्ष. काँग्रेस आणि समाजवाद्यांचा सहित सर्व पक्षांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ मृत्युंजय दिन पुण्यात सप महाविद्यालयाच्या पटांगणावर साजरा केला. तेव्हा बोलताना ते म्हणाले,

“काहीजण मला भारतरत्न द्या अशी मागणी करतात. पण आता मला त्या पदव्यांचा काहीही कौतुक नाही. नागपूर विद्यापीठाने मला डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली. इतरही वेगवेगळ्या पदव्या माझ्या छातीवर लटकलेल्या आहेत. तेव्हा मला आता भारतरत्न घेऊन काय मिळवायचे आहे?

एवढा माझा देश स्वतंत्र झाला त्यातच मी समाधानी आहे, धन्य आहे, कृतार्थ आहे.”

६. सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन.

सावरकर प्रखर विज्ञानवादी होती. हिंदू धर्मातील कर्मकांड आणि अंधश्रद्धावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवाय इतर धर्मातील लोकांनाही या अंधश्रद्धेच्या जंजाळातून बाहेर काढल्याशिवाय मार्ग नाही हे त्यांना ठाऊक होते.

“हिंदूसमाजातीलच नव्हे तर भाकड धर्मवेडाने ग्रासलेल्या ख्रिस्ती मुसलमानांदिकांतील लक्षावधी अडाणी लोकांतुन्ही अज्ञानाची रोगट साथ फैलावली आहे , ती हटवून त्यांनासुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे (हे) बुद्धीवाद्यांचे कर्तव्य आहे.”

(समग्र सावरकर वाङ्मय : खंड ६, पृष्ठ १०१)

 ७. गणेशोत्सव आणि सावरकर.

१९०८ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी नाशकातल्या गणेशोत्सवात “सय्यद हैदर रेझा यांना बोलावून नेऊन हिंदुस्थानभर सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे उदाहरण घालून दिले.” त्यामुळे “नाशिकच्या देशभक्त हिंदू मुसलमानांनी देशविघातक दुहीवर केवढा भयंकर आघात केला” याबद्दल सावरकरांनी १३ नोव्हेंबर १९०८ च्या लंडनच्या बातमीपत्रात प्रशंसा केली आहे.

८. हिंदूराष्ट्र आणि सावरकर.

अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांनी हिंदू राष्ट्राची हिरीरीने मागणी केली मात्र त्यांच्या मनातील हिंदू राष्ट्राची कल्पना वेगळी आहे असे वाटते.

“आपल्याला जरी स्वराज्य हवे आहे तरी ते स्वराज्य हिंदुस्तानी स्वराज्य असावयास पाहिजे; म्हणजे त्या स्वराज्यात हिंदू मुसलमान व सर्व नागरिकांना सारखेच उत्तरदायित्व, सारखीच कर्तव्ये आणि समान अधिकार असले पाहिजेत.”

(समग्र सावरकर  वाङ्मय : खंड ७, पृष्ठ ३७४ )

९. सावरकर आणि राज्यघटना

भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी बोलताना सावरकरांनी राज्यघटनेवरचा विश्वास दाखवताना वक्तव्य केले होते,

“परसत्तेचा उच्छेद होता क्षणीच अराजकतेचे नाशकारक परिणाम घडू नयेत म्हणून तत्क्षणी बहुसंमतीने जी राज्यघटना निर्माण होईल तिला सर्वांनी वंद्य मानले पाहिजे.”

१०. सावरकर आणि अकबर जयंती.

जेष्ठ लेखक आणि सावरकरांचे अभ्यासक य.दि.फडके आपल्या नथूरामायण या पुस्तकात सांगतात की सावरकर बंधूंच्या अभिनव भारत या संघटनेचे सदस्य नाशकात शिवजयंतीसोबतच अकबर जयंतीदेखील धुमधडाक्यात साजरी करत असत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.