लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी. भारतीय राजकारणाची दोन टोकं. या दोघांच्याही मृत्यूला अनेक वर्षे झाली मात्र आजही यांच्यातील वैचारिक वाद चालूच आहे. अजूनही यांचे समर्थक एकमेकांच्या उरावर बसून भांडताना दिसतात.
मात्र गंमतीची गोष्ट म्हणजे एकदा स्वा.सावरकर आणि म.गांधी यांनी लंडन मध्ये एकत्र दसरा साजरा केला होता.
गोष्ट आहे एकोणीसशे दहाच्या दशकातली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरु केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून सावरकर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तिथे वर्मा यांच्याच इंडिया हाऊस या वसतिगृहात ते राहत होते. एक फक्त एक वसतिगृह नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक गुप्त क्रांतिकेंद्र होते.
लंडन व इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी येथे जमत व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करीत तसेच चळवळी आखीत. मादाम कामा, लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा अशा अनेक क्रांतिकारक नेत्यांचा इंडिया हाऊसशी संबन्ध होता.
याचा फायदा सावरकरांनी उठवला. भारतात स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्थेला लंडन मधून मदत पाठवण्यास सुरवात केली.
त्यांनी तिथे बाँब तयार करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती.
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध जागतिक पातळीवर मोठा लढा उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.
इंडिया हाऊस मध्ये असताना विद्यार्थी दशेत असतानाही सावरकरांचा जगभरातल्या राजकीय चळवळीशी संपर्क आला होता. भारताप्रमाणेच स्वातंत्र्यलढा चालवत असलेले काही आयरिश क्रांतिकारक न्यूयॉर्क येथून गेलिक अमेरिकन हे वृत्तपत्र चालवत. त्यात सावरकरांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. हे सगळं कार्य गुप्तपणे चालू होतं.
लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची त्यांनी स्थापना केली होती. त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले. ख्रिसमस सारख्या विदेशी सणांचा इंग्लंडमधल्या भारतीयांवरील प्रभाव कमी व्हावा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते.
लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. याच वार्तापत्रांमध्ये सावरकरांनी एका दसरा सोहळ्याचे वर्णन केले आहे, या वार्तापत्रात ते सांगतात की
आम्ही विजयादशमीच्या कार्यक्रमाला देशभक्त मोहनदास गांधी यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रण दिलं होतं.
४ नोव्हेम्बर १९०९ रोजी विजयादशमीच्या दिवशी लंडनच्या क्वीन्सरोड हॉल येथे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीरामो विजयते नावाने निमंत्रणपत्रिका संपूर्ण लंडनमधील भारतीयांना वाटण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या मेजवानीची वर्गणी तीन रुपये होती.
शंभरच्या वर हिंदी महिला व पुरुष या कार्यक्रमाला जमले. यात मोठमोठे व्यापारी, प्रोफेसर,डॉक्टर, विद्यार्थी होते. या कार्यक्रमासाठी फक्त भारतीयांना प्रवेश होता. गोऱ्या इंग्रज युरोपियांना सक्तीने प्रवेश नाकारला होता.
हॉलमध्ये भारतीय पद्धतीने जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आल्या होत्या. धुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. मध्यभागी ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर ठळक अक्षरात वंदे मातरम असे लिहिण्यात आले होते. राष्ट्रगीताच्या स्वराने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली होती.
दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी खास या कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. अली अझीझ हे आफ्रिकेतील त्यांचे सहकारी सोबत होते. पंक्तीत स्वयंपाक, जेवणाची पाने वाढणे, पाणी देणे वगैरे कामे डॉक्टर,प्रोफेसर अशा पदावर असलेले स्वयंसेवक करत होते. गांधीजींनी आपल्या अध्यक्षीय भाषणात याचे प्रचंड कौतुक केले. ते म्हणाले,
“या कार्यक्रमामुळे मला आमच्या लोकांमध्ये वाढत चाललेल्या लोकसेवातत्परतेची प्रचिती मला आली. लंडनमध्ये असा कार्यक्रम होतो हे मला आतापर्यन्त खरं वाटलं नसतं. हा समारंभ हिंदू असूनही यात मुसलमान, पारशी वगैरे देशबंधू येतात हे लक्षात घेतले पाहिजे. श्रीरामाचे सद्गुण जर पुन्हा आपल्या राष्ट्रात उतरले तर आपल्या उन्नतीला वेळ लागणार नाही.”
यानंतर वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, अली अझीझ यांची भाषणे झाली. स्वा. सावरकर जेव्हा श्रीरामाच्या चरणावर पुष्प चढवण्यास उठले तेव्हा सलग पाच मिनटापर्यंत टाळ्यांचा गजर झाला. गांधीजी या प्रसंगी म्हणाले,
“काही मतभिन्नता असली, तरी मला देशभक्त सावरकरांसन्निध बसण्याची संधी मिळाली याब्ब्द्ल अभिमान वाटत आहे. त्यांच्या स्वार्थत्यागाची व देशभक्तीची मधुर फळे आपल्या देशाला चिरकाल लाभोत.”
सावरकरांनी गांधीजींचे धन्यवाद मानत आपले विचार मांडले,
“श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्तानातला राम नाहीसा झाला. हिंदू हिंदुस्तानचे हृद्य आहे तथापि इंद्रधनुष्यात जसे खरे सौंदर्य रंगांच्या अनेक्तेने न बिघडता ते अधिकच खुलते, तसेच मुसलमान, पारशी, यहुदी वगैरे जगातील सर्व सुधारणेचे उत्त्मांश मिसळून घेऊन हिंदुस्थानही कालाच्या आकाशात अधिक खुलेल. “
त्यांनी केलेल्या पाऊणतासाच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधीजी म्हणाले,
“सावरकरांचे भाषण सर्वानी अक्षरशः लक्षात घ्यावे व त्यातील शेवटच्या उद्दयपिक भागातील स्वार्थत्यागाच्या विनंतीची सर्वानी पूर्तता करावी. ”
यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला. इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी, तिथे राहणारी कुटुंबे यांच्या दृष्टीने हा दसऱ्याचा छोटासा कार्यक्रम म्हणजे एक मोठी घटना होती. महात्मा गांधी आणि सावरकर हे या कार्यक्रमाचे हिरो होते.
खरे तर महात्मा गांधी आणि सावरकर हे दोघेही त्या काळी अजून राष्ट्रीय नेते बनले नव्हते. सावरकर तर अवघ्या २६ वर्षांचे होते मात्र लंडनमधल्या या कार्यक्रमामुळे त्यांची नेतृत्वाची क्षमता दिसून आली.
पुढे जाऊन या दोन्ही नेत्यांचे मार्ग वेगवेगळे झाले. सावरकरांनी जहाल क्रांतिकार्याचा मार्ग स्वीकारला तर गांधीजींनी अहिंसक सत्याग्रहाच्या वाटेने ब्रिटिशांशी स्वातंत्र्य लढा लढला. त्यांच्यात वैचारिक वाद जरूर होते मात्र एकमेकांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शंका कधीच नव्हती.
हे हि वाच भिडू.
- या दहा गोष्टी वाचल्यास सावरकरांबद्दल तुमचे मत बदलेल..
- इंदिरा गांधीनी सावरकरांच्या स्मारकाला वैयक्तिक खर्चातून ११ हजार रुपयांची देणगी दिली होती.
- आझाद हिंद सेना उभी राहण्यामागे सावरकरांची प्रेरणा होती !
- कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.