इंदिरा गांधीनी सावरकरांच्या स्मारकाला वैयक्तिक खर्चातून ११ हजार रुपयांची देणगी दिली होती.

वि.दा.सावरकरांच्या मृत्यूला आता पन्नासहून जास्त वर्षे उलटलेत. मात्र आजही भारत त्यांच्यावरून दोन हिश्श्यात वाटला गेलाय. काही जन त्यांना माफीवीर म्हणून चेष्टा करत आहेत तर काही जन त्यांच्या सारख्या स्वातंत्र्यवीरावर ही टीका होतीय यामुळे वैतागलेत.

टीका करणाऱ्यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत कॉंग्रेस पक्षाचे तरुण कार्यकर्ते.

भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस गेले अनेक आठवडे सावरकरांच्या मुद्द्यावरून एकमेकांशी हमरीतुमरीवर आलेली आहे. भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे की कॉंग्रेसने सुरवातीपासून सावरकरांशी द्वेषपूर्ण व्यवहार केलेला आहे.

पण कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दुर्दैवाने इतिहास वेगळ सांगतो. 

जेव्हा ब्रिटीश सरकारने ५० वर्षाच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी सावरकरांना अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये डांबल, तेव्हा त्यांच्या सुटकेची मागणी करणारी पत्रे अनेक नेत्यांनी ब्रिटीश सरकारला पाठवली होती. यात लोकमान्य टिळकांच्या सोबत महात्मा गांधी देखील आघाडीवर होते. गांधींचा त्यांचा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग वेगळा होता. दोघांचे मतभेद जगजाहीर होते.

पुढे गांधींच्या हत्येत सावरकरांचे नाव आले. त्यांना अटक झाली पण काही वर्षांनी पुरेशा पुराव्या अभावी त्यांची सुटका करण्यात आली. या काळापासून सावरकरांच्या बद्दल कॉंग्रेसमध्ये संशयाचे वातावरण कायम होते.

पण नेहरूंच्या मृत्यू नंतर पंतप्रधानपदी आलेल्या लालबहादूर शास्त्रींनी सावरकरांची स्वातंत्र्यसैनिकासाठी असलेली पेन्शन सुरु केली.

पुढे काहीच वर्षात सावरकरांचे निधन झाले. या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधीनी शोक व्यक्त केला होता. त्यांच्या स्मरणार्थ एका तिकीटाच अनावरण केलं होतं. इंदिराजींच्या पुढाकाराने सावरकरांच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली होती. १९८० साली स्वातंत्र्य वोर सावरकर स्मारक समितीचे सचिव पंडीत बखले यांनी तेव्हाचे इंदिरा गांधी यांना सावरकर जन्म शताब्दी कार्यक्रमासंदर्भात पत्र पाठवले होते. याला उत्तर देताना त्या म्हणतात

“आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात वीर सावरकरांच्या ब्रिटिश सरकारविरुद्धच्या धैर्यपूर्ण लढ्याला वेगळे महत्त्व आहे. भारताच्या या असामान्य पुत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या योजनांना मी यशस्वी होण्याची शुभेच्छा देते.”

२० मे १९८० साली लिहिलेल्या पत्राची अस्सलता अभ्यासकांनी पटवून दिलेली आहे.

इतकच नाही तर सावरकरांच्या स्मारकासाठी इंदिरा गांधीनी ११ हजार रुपयांची खाजगी देणगी दिली होती.  इंदिरा गांधीनी अनेकदा मान्य केल आहे की सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी त्यांचा विरोध कट्टर आहे मात्र त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

गेल्या काही वर्षात सोनिया गांधी यांच्या कडे कॉंग्रेसची कमान आल्यापासून सावरकरांच्या प्रति दृष्टीकोन अधिक पूर्वग्रहदूषित झालेला दिसून येतो. काही भाजपचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे नेहरूंच्या चारित्र्यावर खालच्या पातळीची टीका करत असतात त्याला उत्तर म्हणून काही कॉंग्रेस कार्यकर्ते सावरकरांवर विनोद करून टीका करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.