जेव्हा लेनिनला सावरकरांनी लंडनमध्ये तीन दिवस लपवलं होतं..

मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह. रशियाचा. कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचून साम्यवादी विचारांच्या प्रेमात पडला. भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे या ध्येयाने प्रेरित झाला. जहालपणे यासाठी कार्य देखील करू लागला. राजद्रोहाचे आरोप होऊन सायबेरियामध्ये तीन वर्ष शिक्षा देखील भोगली.

परत आला ते भूमिगत झाला. रशियाचा स्वातंत्र्यलढ्याला जगभरातून मदत मिळवण्यासाठी गुप्तपणे लंडनला आला. इथे एक वर्तमान पत्र सुरु केलं, याच नाव इस्क्रा. त्यात लेख लिहिताना वापरलेलं टोपणनाव त्याच्या आयुष्यभराची ओळख बनलं.

व्लादिमिर लेनिन

साधारण याच काळात भारत देखील एक स्वातंत्र्यलढा जन्म घेत होता. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले विनायक दामोदर सावरकर भारतमातेला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारी संघटना स्थापन करत होते. ब्रिटिश कपड्यांची होळी करत होते. त्यांचं कर्तृत्व व राष्ट्रभक्ती बघून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सावरकरांना शिवाजी स्कॉलरशिप दिली आणि लंडनला कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी बोलावून घेतलं.

श्यामजी कृष्ण वर्मा यांचा लंडन मधील इंडिया हाऊस हा या अशा क्रांतिकारी तरुणांचे आश्रयस्थान बनला होता. इथे राहून सावरकर व इतर क्रांतिकारक बॉम्ब बनवणे व इतर गोष्टींचे प्रशिक्षण घेत होते. सावरकरांनी तिथे गुप्तपणे मिळवलेले पिस्तूल व बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान भारतातील आपल्या साथीदारांना पाठवले.

तिथे असताना सावरकरांकडे इंडिया हाऊसच नेतृत्व आलं होतं व लंडन मध्ये असणाऱ्या भारतीय समाजात त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल आदर देखील होता.

एकीकडे सावरकरांचे क्रांतिकार्य सुरु होते तर दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्याबद्दल जगभरात सहानुभूती मिळवण्यासाठी प्रचार व प्रसार सुरु होता. जर शक्तिशाली ब्रिटिश सत्तेला सशस्त्र क्रांतीद्वारे हादरा द्यायचा असेल तर इतर देशातील संघटनांची देखील मदत घ्यावी लागेल हे सावरकरांना लक्षात आले होते. त्यांनी लंडनमधून अशा संघटनांना संपर्क केला व त्यात त्यांना यश देखील आलं.

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध जागतिक पातळीवर मोठा लढा उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.

इंडिया हाऊस मध्ये असताना विद्यार्थी दशेत असतानाही सावरकरांचा जगभरातल्या राजकीय चळवळीशी संपर्क आला होता. भारताप्रमाणेच स्वातंत्र्यलढा चालवत असलेले काही आयरिश क्रांतिकारक  न्यूयॉर्क येथून ‘गेलिक अमेरिकन’  हे वृत्तपत्र चालवत. त्यात सावरकरांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. हे सगळं कार्य गुप्तपणे चालू होतं.

अशातच १९०९ सालच्या मार्च महिन्यात सावरकरांचे मित्र आणि ब्रिटिश कम्युनिस्ट कार्यकर्ता गाए एल्ड्रेड एका तरुणाला इंडिया हाऊस मध्ये सावरकरांच्या भेटीसाठी घेऊन आला.

तो तरुण म्हणजे रशियन साम्यवादी क्रांतीचा प्रणेता व्लादिमिर लेनिन.

ही गुप्त भेट असल्यामुळे याबद्दलचे पुरावे उल्लेख इतिहासात कुठे आढळत नाहीत. मात्र आपल्या ‘कम्युनिज्म अपनी ही कसौटी पर’ या पुस्तकात दत्तोपंत ठेंगडी यांनी या भेटीचे वर्णन केले आहे. त्यात ते सांगतात की पुढे अनेक वर्षांनी एकदा एका शाळेत सावरकरांना विद्यार्थ्यांनी कम्युनिजमच्या विरोधाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी हा लेनिनच्या भेटीचा किस्सा सांगितलं होता.

लेनिनच्या मागे रशियन गुप्तहेर लागले असल्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी इंडिया हाऊस मध्ये आला होता. सावरकरांनी त्याला तिथे तीन दिवस आश्रय दिला. रोज दिवसभर आप आपल्या कामात ते गढलेले असत आणि रात्री जेवणाच्या वेळी त्यांची भेट होत असे. त्यात आपल्या देशातल्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल चर्चा देखील होई.

दोघांच्या विचारसरणीमध्ये जमीन अस्मानचे अंतर होते. एकदा दोघांच्यात यावरून वादविवाद देखील झाला. सावरकरांनी लेनिन ला सांगितलं,

“हे तुमचे ‘इज्म’ वगैरे काय आहे याच्या बद्दल मला काही देणे घेणे नाही. पण हे सांगा कि कर रशियाची सत्ता तुमच्या हातात आली तर तुमच्या या इज्म नुसार तिथली सामाजिक व आर्थिक रचना कशी असेल ?”

सावरकर सांगतात कि माझ्या प्रश्नावर लेनिन हसला आणि म्हणाला,
“आता तरी माझ्याजवळ अशी कोणती रूपरेषा नाही आणि ती असूही शकणार नाही कारण जो पर्यंत आम्ही सत्तेत येत नाही तो पर्यंत हे सारं कस असेल हे आम्ही कस ठरवू ? “

सावरकरांनी त्या विद्यार्थ्यांना आपला कम्युनिज्मचा विरोध का आहे सांगताना हि घटना सांगितली आणि म्हणले, जर तुमच्या नेत्याकडे भविष्यातील आर्थिक सामाजिक रचनेची रूपरेषा नसेल तर तुम्ही माझ्याकडे हिंदुत्वाची रूपरेषा कसे मागताय?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भारतातील हिंदुत्वाचा इतिहास या नावापासून सुरु होतो. भारतात उजव्या विचारसरणीचा पुरस्कार आणि त्याची रुजवात त्यांनीच घातली. तर एकीकडे व्लादिमिर लेनिन याने रशियात राजेशाही उलथवून टाकत क्रांती केली आणि जगभरात मार्क्सवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार केला. अशा या दोन टोकाच्या विचारांच्या महान क्रांतिकारकांची भेट थरारक व उद्बोधक असणार मात्र तत्कालीन इतिहासातून या बद्दलचा आणखी अभ्यास व्हायला हवा हे देखील निश्चित.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.