विधवा पुनर्विवाह संपन्न व्हावा म्हणून बडोद्याचे महाराज स्वतः पंगतीत जेवायला बसले..

समाजसुधारणा सहजासहजी घडत नाहीत. त्यासाठी मोठी पावले उचलावी लागतात. या सुधारणा घडून येण्यासाठी तितके खंबीर राज्यकर्ते देखील असावे लागतात. महाराष्ट्र या मानाने भाग्यशाली म्हणावा लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत अनेक दूरदृष्टीचे राज्यकर्ते लाभले ज्यांनी घेतलेल्या समाजसुधारणांच्या निर्णयाचे फायदे आपल्या आजच्या पिढयांनाही मिळतात.

अशाच आदर्शवादी राजांमध्ये नाव येते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे.

डोदा नरेश सयाजीराव गायकवाड हे स्वतंत्र वृत्तीचे होते. ते दूरदृष्टीचे होते. आपल्या राज्यात प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. न्यायव्यवस्था, राजव्यवस्था सुधारली, सर्वसामान्यांना कळेल अशी सोपी बनवली. १८९२ साली प्राथमिक मोफत शिक्षणाचा कायदा केला. पहिल्यांदा शेती खाते सुरू केले. गरजवंतांना सढळ हाताने मदत केली.

हिंदुस्थानातील अखेरचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले होते.

महाराजांच्या किर्तीमुळे देशभरातील उत्तम प्रशासक, शिक्षण तज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, गायक, नाटककार, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारक बडोद्यात जमा झाले होते. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांच्यापासून ते महात्मा गांधीं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना सयाजी महाराजांनी मदत केली होती.

याच बरोबर सयाजीराव महाराजांनी केलेले महत्वाचे कार्य केले ते म्हणजे स्त्री सुधारणांचे.

महाराज युरोप व इतर पाश्चात्य देशात जाऊन आले होते. शिक्षणाचे विशेषतः स्त्रीशिक्षणाचे महत्व त्यांनी जाणले होते. त्यासाठी खास आदेश काढून त्यांनी आपल्या राज्यात स्त्रीशिक्षणास सुरवात केली. महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा अनेक विभूतींच्या कार्याला मदत केली.

बडोदा नरेशांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई लहान मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांची शाळेतील संख्या वाढावी म्हणून काम सुरू केले.

त्यासोबतच तत्कालीन हिंदू समाजामध्ये असणारी पडदा पद्धती हटवण्यासाठीही त्यांचे योगदान मोलाचे होते. त्याकाळी बालविवाह सर्वमान्य होता व लहान मुलींचे लग्न तुलनेने मोठ्या वयाच्या माणसाची केले जायचे. बडोद्याच्या महाराजांनी कायद्याने बालविवाहावर बंदी आणली. याचे पालन न करणाऱ्यांना कडक शिक्षा व दंडाची तरतूद होती. एवढे करून ते थांबले नाहीत तर सक्तीच्या वैधव्याच्या प्रथेचा विरोध करून विधवा पुनर्विवाहाचा कायदा मंजूर केला.

आपल्या आदेशात ते म्हणतात,

“विधवांनी आयुष्यभर एकटे राहणे अन्यायकारक आहे. म्हणून आम्ही विधवा विवाहाला मुभा देण्याचा कायदा करत आहोत. तसेच विध्वंसही विवाह करणाऱ्याला मदत करण्याचेही आमचे धोरण राहील.” 

महाराज फक्त कायदा करून थांबले नाहीत तर त्यांनी अशी लग्ने धडाक्यात लावून देखील दिली. अशाच एका विधवा पुनर्विवाहाची हकीकत रियासतकार देसाईंनी सांगितली आहे.

गणेश सदाशिव भाटे नावाचा एक उच्चविद्याविभूषित तरुण महाराजांच्या नोकरीत होता. त्याची पहिली बायको वारल्यामुळे दुसरे लग्न करण्याचे ठरवले आणि त्यासाठी एका तरुण विधवेचे निवड केली. पण त्यांचा विवाह लावून देण्यास व त्याला मदत करण्यास कोणीहि सनातनी तयार होईनात.

हि गोष्ट सरदेसाई यांनी महाराजांच्या कानावर घातली. बडोदा नरेशांनी लगेच आपल्या आश्रित ब्राह्मणांना आदेश दिला कि हे लग्न सरकारतर्फे लावायचे आहे.

राजवाड्याशेजारी मंडप उभारण्यात आला.  सरकारतर्फे तीनचारशे प्रतिष्ठितांना निमंत्रण देण्यात आले. पुण्यामुंबईहून लोक हजर झाले. बॅ .जयकर, स्वतः महाराज अशी मंडळी हजर झाली. पण मुलाचे आईवडिलच रुसून बसले होते. महाराजांनी आदेश दिल्यावर ते लग्नाला हजर झाले मात्र काही केल्या ते जेवणास तयार होईनात.

शेवटी खुद्द महाराज जेवणाच्या पंक्तीला बसले. गणेश शिव भाटे यांच्या पित्याला तुम्ही महाराजांच्या शेजारी नुसते पाटावर बसा असं सांगण्यात आलं. पाटावर बसलेल्या सदाशिव भाट्यांच्या ताटात मिठाई वाढण्यात आली. हे सगळं दरबारी आदरातिथ्य आणि सयाजीराव गायकवाड महाराजांची स्नेहशील वागणूक बघून वरपिता सदाशिव भाटे विरघळून गेले.

नंतर नंतर तर ते स्वतः पंक्तीत फिरून पाहुण्यांना जेवणाचा आग्रह करू लागले. महाराज ते पाहून मनसोक्त हसत होते.

ज्यांचे हे भाग्यशाली लग्न झाले, म्हणजे ख्यातनाम नृत्यकलावती श्रीमती रोहिणी भाटे यांचे आईवडील. खुद्द सयाजीराव महाराजांनी हे लग्न लावून दिलं, एवढंच नाही तर ते स्वतः लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसले. यामुळे विधवा पुनर्विवाहाचे अनेक सामाजिक बंधने मोडीस निघाली. फक्त बडोदा संस्थान नाही तर संपूर्ण देशभरासाठी हा नवा धडा शिकायला मिळाला. समाजसुधारणेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले गेले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.