सयाजी महाराजांचा गायकवाड वाडा केसरी वाडा कसा झाला?

आज पुण्याच्या नारायण पेठेत गेलं की केसरी वाडा असा भला मोठा फलक असलेला मोठा दरवाजा दिसतो. लोकमान्य टिळकांचे घर म्हणून याला काहीजण टिळक वाडा म्हणून देखील ओळखतात. दरवर्षी गणेशोत्सवात पुण्याच्या पहिल्या मानाच्या पाच गणपतींमध्ये या केसरी वाड्याच्या गणपतीचा समावेश होतो.

अशावेळी प्रश्न पडतो की केसरी वाड्याचा इतिहास काय आहे?

मुळात हा वाडा केसरी वाडा किंवा टिळक वाडा नाही तर तो गायकवाड वाडा आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा हा वाडा.

महाराष्ट्रापासून दूर असणाऱ्या बडोदा संस्थानचे महाराज म्हणजे सयाजीराव गायकवाड. तस बघायला गेलं तर इथल्या कोणत्याही भूभागाव्रर राजकीयदृष्ट्या त्यांची कोणतीही सत्ता नव्हती.असे असतानाही महाराष्ट्राची जनता त्यांना मनोमन आपला राजा मानत होती. महाराष्ट्राच्या जनतेचे आपण काही देणे लागतो असे सयाजीरावांनी त्यांच्या महाराष्ट्रीयत्वामुळे वाटत होते.

महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांना त्यांनी मदत केली. विशेषतः पुण्याशी त्यांचे जवळकीचे नाते होते. बडोद्याहून पुण्याला त्यांच्या अनेक भेटीगाठी व्हायच्या. इथल्या न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले, भांडारकर इतर प्रभुतींशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.

सयाजीरावांचे पुण्याच्या  समाजसुधारणाचं नाहीत तर इथल्या राजकीय चळवळींकडे पूर्ण लक्ष होते.

राज्यकारभार सुरु केल्यापासून पुणे सार्वजनिक सभेसारख्या नागरी संस्थानां पाठिंबा देण्याचे कार्य त्यांनी केलं. लोकमान्य टिळक हे सयाजीरावांच्या महाराष्ट्रातील एक समकालीन नेते. सरकारविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या टिळकांचासुद्धा सयाजीराव महाराजांशी एक वेगळ्या प्रकारचा संवाद होता.

रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्याचे टिळकांनी ठरवले तेव्हा या कार्यासाठी सर्वात मोठी निधी सयाजीराव गायकवाडांनी पाठवली होती. इतके असले तरी महाराजांच्या कारभाराकडे आणि तिथल्या समाजसुधारणांकडे टिळकांचे केसरी मधून लक्ष असे आणि वेळप्रसंगी त्यावर निर्भीड टीका देखील केली जात असे.

सयाजी महाराजांनी जेव्हा गुजराती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जावी म्हणून प्रयत्न केला तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्याचे स्वागत केले मात्र बडोदा संस्थानमध्ये वेगळी नाणी निर्माण करण्याचे थांबवून ब्रिटिश नाणी स्वीकारली गेली तेव्हा केसरीतून जोरदार टीका देखील झाली. गायकवाड महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शस्त्रात्रे निर्मिती देखील थांबवली याबद्दल देखील टिळकांनी खंत व्यक्त केली होती.

टिळकांची टीका हि बडोदा संस्थानाविषयीच्या आणि सयाजी महाराजांच्या आत्मीयतेमधून झाली होती.

या दोघांना जोडणारा एक अदृश्य दुवा म्हणजे स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारी चळवळ. सयाजीराव महाराज आणि लोकमान्य टिळक हे इंग्रज सत्ते विरुद्ध सशस्त्र उठाव व्हावा यासाठी प्रयत्नशील होते मात्र त्यांनी याच कधीच जाहीर समर्थन केलं नाही.

बापट कमिशनच्या निमित्ताने लोकमान्य टिळक काही काळ बडोदा संस्थानमध्ये वास्तव्यास होते. तेव्हा या बापट यांना न्याय देण्याच्या निमित्ताने दोघांचा संबंध आला होता.

सयाजी महाराजानीं आपल्या दरबारात अनेक क्रांतीकारकांना नोकरी देऊन त्यांना इंग्रजांपासून एक प्रकारचं संरक्षण पुरवलं होतं. यात योगी अरविंद यांचा देखील समावेश होता. याच योगी अरविंद यांच्या मार्फत टिळकांनी क्रांतिकारक पक्षाचे नेतृत्व करावे असा संदेश सयाजीराव महाराजानी पाठवला होता असे मानले गेले.

मात्र राजकीय वास्तवाचे भान असल्यामुळे सयाजी महाराजानी टिळकांसोबत थेट भेटीगाठी घेतल्या नाहीत. त्यांच्या कार्याबद्दल सहानुभूती मात्र होती. या सहानुभूती मधूनच नारायण पेठेत असलेला गायकवाड वाडा टिळकांना हवा असल्याचे कळताच महाराजांनी तो मोफत देण्याची तयारी केली. मात्र तसे करणे सार्वभौम सत्तेच्या प्रतिनिधींना आवडणार नाही म्हणून लोकमान्य देऊ शकतील ती किंमत ठरवण्यात आली.

ED2EBUjUYAEGZnZ

टिळक हे मूळचे रत्नागिरीच्या चिखली या गावचे. मात्र वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांचं संपूर्ण बालपण पुण्यात गेलं. पुण्यात केसरी, मराठा सारखी वर्तमानपत्रे सुरु केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून न्यू इंग्लिश स्कुल, फर्ग्युसन कॉलेज या शैक्षणिक संस्था सुरु केल्या.

मात्र इतके असूनही ते शुक्रवार पेठेत सरदार विंचूरकरांच्या वाड्यात भाड्याने राहत होते.  

पुढे जेव्हा ते वादातून डेक्कन एज्युकेशन मधून आभार पडल्यावर त्यांनी सर्व प्रथम आपले निर्वाहाची साधने ठीकठाक करण्याकडे जोर दिला. चिखली या गावी जाऊन वडिलोपार्जित मालमत्तेची व्यवस्था लावली. लातूर येथे काही पार्टनरसोबत जिनिंग फॅक्ट्री उभी केली. पुण्यात पहिला लॉ क्लास सुरु केला. या क्लासमुळे आर्थिक सुबत्ता आली व टिळकांनी स्वतःसाठी व केसरी वृत्तपत्राची कामे करता यावीत म्हणून गायकवाड वाडा विकत घेतला.

इ. स. १९०५ साली लोकमान्य टिळक गायकवाड वाड्यात राहू लागले. त्याच वर्षांपासून या वाड्यात केसरी संस्थेचा गणेश उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. 

केसरीचा छापखाना, केसरीचे प्रकाशन याच वाड्यातून होत असे. फक्त इतकेच नाही तर इंग्रजांविरुद्धच्या अनेक कटाचे आराखडे याच वाड्यात आखले गेले. लोकमान्यांची भेट घेण्यासाठी मोठमोठे नेते गायकवाड वाड्यामध्ये उतरत असत.

520bdef59d050225ae36630fbb44aadc

पुढील काळात देशाच्या राजकारणाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून टिळकांची ओळख निर्माण झाली. तेव्हा राष्ट्रीय चळवळीचे मुख्य केंद्र गायकवाड वाडाच बनला होता. इंग्रज सरकारला थरकाप भरवणारे अग्रलेख याच वाड्यात लिहिले गेले. पुढंच संपूर्ण आयुष्य टिळकांनी याच वाड्यात व्यतीत केलं.

टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी केलेले सामाजिक प्रयोगाची नांदी देखील याच गायकवाड वाड्यात घडली.

श्रीधरपंत टिळकांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संघाची पुण्याची शाखा ८ एप्रिल, इ. स. १९२८ रोजी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली.

सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन गायकवाड वाड्यात आनंदाने पार पडले.

इतकेच नव्हे तर एका गणेशोत्सवासाठी टिळक बंधूनी अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा लोकमान्यांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या ट्रस्टींनी या अस्पृश्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून गणपतीला पिंजऱ्यात कोंडले. बाहेर गोऱ्या सार्जंटची पोलीस पार्टी उभी केली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या मदतीने टिळक बंधूनी पोलिसांचा व सनातन्यांचा विरोध मोडून काढला व मोठ्या थाटात अस्पृश्य समाजाच्या मेळ्यासह गणेशोत्सव साजरा केला.

अशी अनेक सामाजिक स्थित्यन्तरे या गायकवाड वाड्याने अनुभवली. केसरी त्याकाळी लोकाप्रियतेच्या शिखरावर होता. त्याचे प्रकाशनाचे ठिकाण म्हणून गायकवाड वाड्याचे नवीन नामकरण केसरी वाडा असे झाले.

53349313

आजही या वाड्याच्या आवारात टिळकांच्या वंशजांचे घर आहे. तिथे लोकमान्यांच्या स्मृती जपण्यासाठी एक छोटेखानी म्यूजियम उभा केले असून तिथे टिळकांच्या खोलीची प्रतिकृती आहे. या खोलीत टिळकाचा पलंग, छडी, भांडी, खूर्ची, चपला, पुस्तके आणि पेन या वस्तू आहेत. अधिकृत नाव केसरी वाडा असे असले तरी अनेक जण आजही या वाड्याला टिळक वाडा म्हणून ओळखतात.

संदर्भ – कर्मयोगी लोकमान्य लेखक सदानंद मोरे

संघर्ष आणि शहाणपण लेखक नरेंद्र चपळगावकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.