बडोदा संस्थानच्या खेडोपाडी भारतातलं पहिलं फिरतं ग्रंथालय सुरु केलं होतं..

आपल्या देशात अनेक संस्थाने आहेत तसेच त्यांचे अनेक राजे देखील होऊन गेले. या पैकी काही राजांची नावे मात्र इतिहासात कायम स्वरूपी अजरामर झाले. युद्धात पराक्रम गाजवतो तोच श्रेष्ठ राजा असतो असे नाही तर अनेकदा आपल्या रयतेला सुखाचे आयुष्य भेटावे या साठी झटणारी काही विचारांनी आणि मनानी श्रीमंत असणारी माणस श्रेष्ठ असतात.

असेच एक बडोदा घराण्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड.

आपल्या कर्तुत्वाने आणि कार्याने या माणसाने जागतिक पातळीवर आपले नाव कोरले आहे. थेट आग्रा ते दिल्ली आणि कन्याकुमारी ते महाराष्ट्र अशा अखंड भारतात ज्या व्यक्तीच्या कार्याचा विस्तार होता असे हे राजे.

संपत्तीने श्रीमंत असणारी बरीच माणसे आपल्या देशात घडलीत पण या संपत्तीचा स्वताच्या रयते साठी उपयोग करणाऱ्या काही मोजक्या राजांनी पैकी एक म्हणजे सयाजीराव गायकवाड.

त्यांनी बडोदा संस्थानमध्ये शाळा सुरु केल्या, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले, बँक सुरु केली, अनेक कलाकारांना मदत केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दलित कुटूंबातील होतकरू तरुणाला शिक्षणासाठी परदेशी पाठवलं. कित्येकांना स्कॉलरशिप दिली.

ते नेहमी म्हणायचे,

हिंदुस्तानास जर उर्जितकाळ यावयाचा असेल तर तो एकी आणि विद्या या वाचून कधीही यावयाचा नाही…

आणखी एका गोष्टीचे श्रेय सयाजी महाराजांना द्यावे लागेल, ते म्हणजे त्यांनी  बडोद्यात सुरु केलेली ग्रंथालय चळवळ.

२८ डिसेंबर १८८१ रोजी सयाजीराव महाराज बडोद्याच्या गादीवर विराजमान झाले. तेव्हा इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमधून भेटीचे आमंत्रण आले होते. महाराज जेव्हा आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यावर गेले तेव्हा तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. हे त्यांच्या मनात बसलं.

त्या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. बडोद्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय उभारणीसाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.

त्यांनी फक्त बडोदा शहरात मध्यवर्ती ग्रंथालय उभारलं नाही तर गावोगावी ग्रंथालयाची चळवळ पोहचावी यासाठी प्रयत्न सुरु केले. काही प्रमुख गावांमध्ये ग्रंथालये उभी केलीच शिवाय १८८५ साली त्यांनी आणखी एक अभिनव कल्पना साकार केली.

ती म्हणजे फिरते ग्रंथालय.  

ज्या वाड्या वस्त्यांवर ग्रंथालय उभारता येणे शक्य नाही तिथे फिरते ग्रंथालय पोहचवायचं हे त्यांचं उद्दिष्ट होतं.

सुरुवातीच्या काळात २५ ते ३० पुस्तकांची पत्र्यांची पेटी पुरवली, दर पंधरा दिवसांनी तो पेटी बदलून तेथे दुसरी आणली जाई. बैलगाडीच्या मदतीने ती पेटी ने-आण करण्याचा कार्यक्रम चाले. वाचकांना पुस्तके मोफत वाचायला मिळत. सुरवातीला घोडागाडी, बैलगाड्या, वाळवंटी प्रदेशासाठी उंट गाडी यातून फिरते ग्रंथालय बनवले. इतकेच नाही तर हत्ती कधी कधी गाढवांचा देखील वापर फिरत्या ग्रंथालयासाठी केला गेला.

नंतरच्या काळात खास कार या ग्रंथालयासाठी देण्यात आल्या.

सुरवातीला पाचशे ग्रंथालये होती. नंतर नंतर तो एकदा वाढवून अडीच हजार पर्यंत नेण्यात आला. यातील दोनशे ग्रंथालये बडोदा संस्थानच्या बाहेर होती. या सगळ्या ग्रंथालयात मिळून जवळपास अडीच लाख पुस्तके ठेवण्यात आली होती.

सार्वजनिक ग्रंथालय निर्मितीचा आद्यप्रणेता या शब्दात त्यांचे गौरव करणारे प्रमाणपत्र न्यूयॉर्क लायब्ररी असोशिएशनकडून प्रदान केले गेले.

बनारस हिंदू विद्यापीठाला देखील ग्रंथालय उभारण्यासाठी मोठी देणगी दिली होती. १९४१ साली तेव्हा तिथे महाप्रचंड इमारत उभी करण्यात आली आणि त्याला नाव सयाजीराव गायकवाड महाराज लायब्ररी असं देण्यात आलं.

त्यांनी सुरु केलेलं बडोदा मध्यवर्ती ग्रंथालय आजही भारतभरात आदर्श मानलं जातं. याच ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी चलत चित्रपट दाखवण्यासाठी एक खास विभाग बनवण्यात आला होता.

१८९१ साली राणी चिमणाबाई यांच्या देवस्थान संग्रहातील अत्यंत मूल्यवान पाच हस्तलिखिते (महाभारत, भागवत, भगवतगीता, हरिवंश व आणखी एक) ह्या संस्थेस भेट देऊन प्राच्य विद्या मंदिराचा श्रीगणेशा केला गेला. यामध्ये  ऐतिहासिक शहरांमधून, धार्मिक संस्थांमधून व काही ख्यातनाम व्यक्तींच्या वैयक्तिक संग्रहातून हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथ मिळविण्यात आले.

सर्वसामान्य प्रजेला याचा लाभ घेता यावा म्हणून येथील अनेक ग्रंथांचे गुजराती व मराठी भाषेत रूपांतर करण्यात आले आणि ती पुस्तके फिरत्या ग्रंथालयात ठेवण्यात आली.

आजही गुजरात राज्यातील दाभोई, संखेडा, बोदेली, छोटैडपुर, कवंट, नसावाडे, तिलकवाडा, नर्मदा, सीओर, वाघोडीया, सावली, करजन, बडोदरा या तालुक्यात ९० खेडेगावात ‘फिरते वाचनालये’ कार्यरत आहे.

आपल्या जनतेमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अगदी वाड्या वस्तींवरील विद्यार्थी देखील जगातल्या अफाट ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून झटणाऱ्या राजाचं वेगळेपण इतर राज्यकर्त्यांपेक्षा उठून दिसते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.