भारतातले सगळे राजे इंग्लंडच्या राजापुढं नतमस्तक होत होते, अपवाद फक्त सयाजी महाराजांचा…

डिसेंबर १९११ ला ब्रिटीश साम्राज्याचा नवा सम्राट पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि पंचम जॉर्जला भारताचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्ली मध्ये १२ डिसेंबरला दरबार भरवण्यात आला.

त्याला नाव दिले “दिल्ली दरबार.”

 भारतभरातून सगळे राजे, राजकुमार, नवाब आपल्या सम्राटाचं अभिवादन करण्यासाठी हजर झाले होते. दिल्लीच जुनं वैभव झगमगत होतं. एका दिवसासाठी अख्खं शहर सजवण्यात आलं होतं. 

सगळी जनता गोऱ्या राजाराणीला बघायला चांदणीचौकात जमा झाली. पंचम जॉर्ज त्याच्यासाठी खास बनवलेला हिरेजडीत “भारताचा राजमुकुट” घालून थाटात लाल किल्ल्याच्या गॅलरीमध्ये आपल्या प्रजेला दर्शन देण्यासाठी आला. 

असं म्हणतात राजमुकुटामधल्या हिऱ्यांचा भार राजाला पेलवला नसल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दिल्ली दरबाराच्यानंतर त्याने कधीच हा मुकुट घातला नाही.

आज कोरोनेशन पार्क म्हणून ज्याला ओळखलं जात, त्या मैदानात हा दरबार भरवला होता. राजाराणी समोर ब्रिटीश रॉयल सैन्याने संचलन केले.

शाही शामियान्यामध्ये एकएक करून सगळे राजे महाराजे किंग जॉर्जला झुकून अभिवादन करून येत होते. या सगळ्या राजा मध्ये फक्त एकच महिला राज्यकर्ती हजर होती. ती म्हणजे आपल्या लाडक्या तैमुरची खापर पणजी भोपालची बेगम सुलतान जहान.

जगातला सर्वात श्रीमंत माणूस हैद्राबादचा नवाब सुद्धा अलिशान नजराणे घेऊन किंग जॉर्जसमोर कुर्निसात करत होता.

300px The Nizam of Hyderabad pays homage to the king and queen at the Delhi Durbar
हैद्राबादचा नवाब पंचम जॉर्जसमोर स्त्रोत- विकिपिडीया


असा हा सगळा रंगढगाचा माहोल होता पण तिथे एक वाद झाला .

बडोद्याचे सयाजीमहाराज गायकवाड हे जेव्हा पंचम जॉर्जला अभिवादन करण्यासाठी सिंहासनासमोर आले तेव्हा त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. शिवाय त्यांनी राजापुढे थोडेसे झुकून अभिवादन केले आणि लगेच पाठमोरे वळले. निम्म्या पृथ्वीवर राज्य करणाऱ्या इंग्रज राजापुढे पाठ करणे हा राजशिष्टाचाराचा भंग होता. 

भारताच्या गुलामीच्या या उत्सवात सयाजीराव गायकवाड हा एकमेव वाघ असा निघाला ज्याने सर्वशक्तिमान पंचम जॉर्जला आपल्या कृतीतून दाखवून दिले की तुम्हाला आमचा देश सोडून जायची वेळ जवळ आली आहे.

या कार्यक्रमाचे सर्व शुटींग करण्यात येत होते. दिल्ली दरबारवर रंगीत डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्यात आली. त्याकाळच्या मानाने हे एक आश्चर्य होते. 

याच दिल्ली दरबार मध्ये पंचम जॉर्जने घोषणा केली,

” भारतीय जनतेला हे सांगण्यास आम्हाला हर्ष होतो की इथले प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावशाली व्हावे यासाठी ब्रिटनचे सरकार भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतरीत करत आहे ”  

१३ डिसेंबर पासून दिल्लीचे राजधानी मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरु झाली. सर एडविन ल्युटन नावाच्या जगप्रसिद्ध आर्किटेक्टने राजधानी दिल्लीचा नकाशा बनवला. तिला नाव दिले नवी दिल्ली.

इथल्या संसद भवन पासून राष्ट्रपती भवन पर्यंत अनेक इमारती या ल्युटनच्या संकल्पनेतून उभ्या राहिल्या आहेत. नवी दिल्ली उभी करायला ल्युटनला जवळपास वीस वर्षे लागली.

हीच ल्युटनची दिल्ली स्वातंत्र्यानंतरही भारताच्या राजधानीची शान आहे. पण इंग्रज गेले पण तिथल्या सत्ताधार्यांना मुजरा करायची सवय आजही अनेकांना आहे. एखादाच सयाजी महाराजांसारखा वाघ येतो आणि दाखवून देतो की खरे राज्यकर्ते जनता आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.