जेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..

माणसाजवळ असलेली कोणतीही कला त्याला कधी उपाशी ठेवत नाही, असं म्हणतात. पण स्वतःजवळ असलेली ही कला जेलमधून तुम्हाला बाहेर काढू शकते ? याचं उत्तर आहे हो. भिडुंनो, या प्रश्नाचा अर्थ चुकीचा घेऊ नका. गुन्हा मोठा असला तर तो कलाकार असो वा इतर कोणीही… शिक्षा ही झालीच पाहिजे.

पण हिंदी सिनेसृष्टीतील एका दिग्गज माणसाने स्वतःच्या आवाजाच्या जादूमुळे स्टेशन मास्तरावर इतका प्रभाव पाडला की त्यांनी त्याच्यासकट त्याच्या मित्रांना जेलमधून बाहेर काढले.

हा दिग्गज गायक होता सचिन देव बर्मन. म्हणजेच एस. डी. बर्मन.

सचिन देव बर्मन यांचा जन्म बंगाल इथे झाला. त्रिपुरा येथील आगरतला येथे सचिनजींचं शालेय शिक्षण गेलं. तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व भारताचा. त्यांना कळालं की, वरिष्ठ शिक्षण अधिकारी मुलांना शिकवण्याऐवजी त्यांचे लाड करत बसलेत. त्यांनी त्या क्षणी वडिलांना ही गोष्ट सांगितली. आणि त्यानंतर वडिलांनी त्यांना बंगाल येथे कोमिला भागात असणाऱ्या कोमिला जिल्हा शाळेत दाखल केले.

ही गोष्ट सचिनजी १४ वर्षांचे होते त्यावेळची.

सचिनजींना मित्रांसोबत मौजमजा करण्याची, फिरण्याची हौस होती. एकदा ते शाळेला सुट्टी असताना कोमीला रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडून असेच मित्रांसोबत फिरायला गेले होते.

तो काळ असा असतो की, आपल्या मनात एक वेगळ्या प्रकारचा बिनधास्तपणा दडलेला असतो. यामुळे त्यांनी व त्यांच्या मित्रांनी रेल्वे तिकीट काढलं नव्हतं. मनसोक्त फिरून हे सर्व पुन्हा घरी येण्यासाठी कोमिला रेल्वे स्टेशनवर उतरले.

तर समोर तिकीट चेक करण्यासाठी स्टेशनमास्तर उभा होता.

स्टेशन मास्तरला पाहताच तिकीट नसल्यामुळे ‘आता काय करावं?’ असा प्रश्न सचिनजी आणि त्यांच्या मित्रांच्या डोक्यात आला. त्यांनी काही न बोलता गर्दीमधून कोमिला स्टेशनच्या बाहेर स्टेशन मास्तरांची नजर चुकवून पळण्याचा प्रयत्न केला.

परंतु स्टेशन मास्तरांच्या नजरेत सचिन आणि त्यांचे मित्र आले. आणि त्यांनी या सर्व जणांना पकडले. हे सर्व पळून जात असल्यामुळे स्टेशन मास्तरांच्या लक्षात आलं की,यांच्याकडे तिकीट नाही.

या सर्वांना समज देण्यासाठी रेल्वे स्टेशन मध्ये असलेल्या जेलमध्ये स्टेशन मास्तरांनी यांना बंद केलं.

कोणाच्याही घरी हे माहीत नव्हतं. आणि घरी सांगावं कसं हा सुद्धा प्रश्न होता. म्हणून सचिनजी आणि त्यांच्या मित्रांनी एक रात्र जेलमध्येच घालवण्यासाठी मन तयार केलं. सचिनची आणि त्यांच्या सर्व मित्रांना जेलमध्ये डांबण्यात आलं.

रात्र वाढत होती. दिवसभर भरपूर फिरल्यामुळे सचिनजींचे मित्र त्या कोठडीत लगेच झोपून गेले.

सचिनजी मात्र काहीसे वेगळ्या मनोवृत्तीचे होते. त्यांना जेलमध्ये झोप येत नव्हती. ते तसेच भिंतीला पाठ टेकून बसले होते.

झोप येत नसल्यामुळे त्यांनी भजन गायला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती. कुणी कुजबुज केली तरी ऐकू येईल इतकी शांतता होते. यामुळे सचिनजी गात असलेल्या भजनाचा आवाज आसमंतात घुमत होता. पोलिस स्टेशनच्या मागे स्टेशन मास्तरांचं घर होतं.

स्टेशन मास्तरांच्या बहिणीपर्यंत हा आवाज पोहोचला आणि तिला या आवाजाने जागं केलं. सचिनजींचा श्रवणीय आवाज ती खूप वेळ ऐकत होती. तिने भावाला उठवलं.

स्टेशन मास्तर सुद्धा कानावर येणाऱ्या सुमधूर स्वरांनी प्रभावित झाले होते. त्यांना कळालं की, हा आवाज जेलमधून येत आहे.

रात्रीच्या वेळेस बहिणी सोबत स्टेशन मास्तर जेलमध्ये येऊन पोहोचले. सकाळी ज्या मुलांना तिकीट नसल्यामुळे आपण जेलमध्ये टाकलं होतं, त्यांच्यापैकीच एक मुलगा स्वतःच्या सुमधुर आवाजाने भजन गात आहे, हे त्यांच्या लक्षात आलं.

ते काही क्षण सचिनजी यांची गाणारी मुद्रा पाहत तिथेच उभे होते.

या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी सचिनजी आणि त्यांच्या सर्व मित्रांना जेलमधून बाहेर काढले.

आपल्या घरी येऊन गेले. स्टेशन मास्तर आणि त्यांच्या बहिणीने त्या सर्वांना चांगलं खाऊ-पिऊ घातलं. त्यांच्याशी गप्पा मारताना सचिनजींच्या आवाजाचं त्यांनी खुल्या दिलानं कौतुक केलं.

रात्र बरीच झाल्यामुळे तिथेच विश्रांती घेण्याचा सल्ला स्टेशन मास्तरांनी सर्वांना दिला. आणि सकाळ होताच सचिनजी आणि त्यांच्या मित्रांना सन्मानाने स्टेशन मास्तरांनी घरी सोडलं.

अशाप्रकारे स्वतःच्या गाण्याच्या कौशल्यामुळे सचिनजी त्यांच्या मित्रांसकट जेलमधून बाहेर आले. इतकेच नव्हे तर ज्या स्टेशन मास्तरांनी त्यांना जेलमध्ये डांबलं होतं, त्याच्याकडून त्यांना चांगली वागणूक मिळाली.

पुढे भारतीय सिनेसृष्टीतील एक महान संगीतकार आणि गायक म्हणून सचिनजींनी स्वतःची ओळख मिळवली. संगीत क्षेत्रातील जुनी-नवी अशी सर्वच पिढी आज एस. डी. बर्मन यांना गुरु मानते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.