आंबेगावच्या घटनेमुळे “बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची” आठवण आली, तो सध्या काय करतोय ?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथे असणाऱ्या थोरांदळे गावातला ६ वर्षाचा रवी बोअरवेलमध्ये पडला. शर्तीचे प्रयत्न करुन रवीला तब्बल 16 तासाने बाहेर काढण्यात आलं. NDRF च्या जवानांनी हि कामगिरी पार पाडली.
काल हि घटना घडली आणि अनेकांना आठवण आली ती प्रिन्सची.
बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स हा न्यूज चॅनेलचा पहिला हिरो होता. 24 तास बातम्या दाखवणाऱ्यांनी निर्माण केलेला पहिला हिरो. भारतात जागतिकरण येवून खूप दिवस झालेले. कॉम्प्युटर आणि टिव्ही आलेले. क्यू किं सास भी कभीं बहू थी घराघरात पोहचलं होतं. आहट आणि झी हॉरर शो मधून भिवून भिवून कंटाळा आलेला. आत्ता काय करायचं म्हणून माणसं टिव्हीकडून सिडीप्लेअरकडे वळू लागलेली. बाजारात तेव्हा मोबाईल धुमाकूळ घालत होते.
अशा वेळी चोवीस तास बातम्या देणारे चॅनेल आले.
लोक सकाळ संध्याकाळ आजतक लावून बसायचे. पोरगं डिस्कवरी आणि बाप आजतक अस समीकरण कित्येक घरात सुरू झालं. डिस्कवरीवर एकच वाघ वेगवेगळ्या अॅंगलमधून दाखवणं शक्य होतं पण ह्या चॅनेलवरती काय दाखवायचं. तरी नवा प्रयोग म्हणून मिडीया वर येतच होता.
अशाचच एक ब्रेकिंग न्यूज सापडली.
जुलै २००६.
हरयाणातील कुरुक्षेत्रमधील प्रिन्स कुमार कश्यप नावाचा मुलगा ५ वर्षाचा असताना बोअरवेलच्या खड्यात पडलेला होता. न्यूज चॅनेलवरुन अहोरात्र त्याला दाखवण्यास सुरवात झाली. चोवीस तास बातमी असणाऱ्या चॅनेलवाल्यांना पहिल्यांदा 48 तासांची बातमी मिळाली.
त्यानंतर प्रिन्सचं काय झालं हे वेगळं सांगायला नको, भारताच्या घराघरात प्रिन्स पोहचला. प्रत्येकाला तो माहित झाला. मग नेहमीप्रमाणे मिडीया त्याला विसरुन गेला, कालच्या घटनेमुळे अनेकांना प्रश्न पडला प्रिन्स सध्या काय करतो? प्रिन्स बाबतीत माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आम्हाला दोन बातम्या वाचायला मिळाल्या.
पहिली नोव्हेंबर २०१३ मधली, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राची.
या बातमीनुसार, घटनेनंतर प्रिन्स सेलिब्रिटी झालेला होताच. आजूबाजूच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तो प्रमुख पाहुणा म्हणून बोलावला जात असे. हरयाणा सरकार आणि एका हिंदी न्यूज चॅनेलकडून त्याला काही लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्याला लहान मुलांसाठीची बाईक गिफ्ट म्हणून दिली होती.
अर्थात हे फक्त सुरुवातीच्या काही दिवसानंतरचं चित्र होतं. २०१३ सालापर्यंत प्रिन्सच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं होतं.
प्रिन्सला खड्यात पडलेली घटना बऱ्यापैकी आठवत होती आणि तिचं तपशीलवार वर्णन सुद्धा तो सांगू शकत होतं. घटनेबद्दलच्या आपल्या कुठल्याही दुखद आठवणी नसल्याचं त्याने ‘टाईम्स’शी बोलताना सांगितलं होतं. गावापासून जवळच असलेल्या शाळेत त्याचं शिक्षण सुरु होतं.
प्रिन्सचा शोध घेणारी दुसरी बातमी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये डिसेंबर २०१६ साली प्रकाशित झालेली बघायला मिळते.
यावेळी प्रिन्स नववीच्या वर्गात शिकत होता. प्रिन्सचे वडील आपलं ५ लोकांचं कुटुंब रोजंदारीतून मिळणाऱ्या ३०० रुपयातून भागवत होते. त्यांनी ‘एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं की, “दुर्घटनेनंतर अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची घोषणा केली होती.
परंतु त्यातली फक्त ३ लाख रुपयांची मदत फक्त कुटुंबाला मिळाली. बाकी पैसे मिळालेच नाहीत”
प्रिन्सची बोरवेलच्या खड्ड्यातून यशस्वी सुटका केल्यानंतर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला सैन्यामध्ये नोकरी देण्याचं आश्वासन सैन्याकडून देण्यात आलं होतं. त्यामुळे प्रिन्सने आपल्याला शिकून सवरून सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, असं त्यावेळी सांगितलं होतं. प्रिन्सच्या कुटुंबियांची देखील तिच इच्छा होती. त्याने लवकर कामाला लागून घराची जबाबदारी घ्यावी असं त्यांना वाटत होतं.
ही झाली डिसेंबर २०१६ पर्यंतची माहिती. त्यानंतरच्या माहितीत तो सध्या दहावीचे परिक्षा देणार असल्याच कळतं. सध्या गावात राहून टिपीकल दहावीच्या मुलांसारखच तो आयुष्य जगतोय.
हे ही वाचा –
- पन्नालाल गाढव सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर कशी काय द्यायचा ?
- आजही ब्रेकअपच्या आवाजापुर्वी त्याचाच आवाज ऐकू येतो.
- ‘बिग बॉस चाहते है..’ हा लोकप्रिय आवाज नेमका कुणाचा..?