त्या युद्धाचा निकाल जर वेगळा लागला असता तर भारतावर फ्रेंचांचे राज्य असते..

२४ ऑगस्ट १६०८ ला ब्रिटिश सुरतमार्गे भारतात घुसले. ते आले तर होते व्यापारासाठी पण भारतावर कित्येक वर्ष राज्य करून गेले. दरम्यान, फार कमी लोकांना माहित असेल कि, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात येणारी पहिली कंपनी नव्हती. त्यांच्या आधीही डच, पोर्तुगाल आणि फ्रेंच भारतात आले होते आणि आपली दुकान मांडून व्यापार करत होते.

दरम्यान १७०० पर्यंत यातल्या दोनचं मुख्य कंपन्याच भारतात राहिल्या. त्या म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच  ईस्ट इंडिया कंपनी. या दोन्हींचा हेतू व्यापाराचा विस्तार कारण होत. आणि त्यामुळेच य दोघांत स्पर्धा वाढली. 

त्यात भारत हा सुजलाम- सुफलाम देश होता. त्यामुळे कोणालाही भारत आपल्या हातातून जाऊ नये असचं म्हणणं होत. यासाठी एकच पर्याय होता तो  म्हणजे व्यापार युद्ध. इंग्रजांनी यासाठी तयारी सुरु केली, पण यातून  मोठं मैदानी युद्ध झालं.

ही लढाई म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धाची पहिली लढाई. जी आजच्याच दिवशी ३ ऑगस्ट १७४९ ला झाली.  ज्याला ‘अंबूरची लढाई’ या नावानेही ओळखलं जात.

कर्नाटक आणि हैद्राबादवर शासन चालवण्यावरून ही लढाई सुरु झाली होती. पण या कर्नाटक लढाईने आणखी एक निर्णय दिला कि, भारतात पुढे जाऊन कोण राज्य चालवणार. 

या लढाईत हैद्राबाद आणि कर्नाटकच्या नवाबांसोबत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा देखील समावेश होता, ज्यांनी वेगवेगळ्या पक्षांची साथ दिली. आता या युद्धा दरम्यान व्यापार युद्धाचा निकाल सगळ्यांचं ठाऊक आहे कि , ब्रिटिशांनी ही लढाई जिंकली आणि भारतावर राज्य करायला सुरुवात केली.

तर याआधी १७४८ ला हैद्राबादचा निजाम असफ झा पहिला याचा मृत्यू झाला. निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूनंतर त्याचा नातू मुजफ्फर जंगला निजाम म्हणून घोषित करण्यात आलं.  मुगल सम्राट अहमद शाह बहादूरने एका निर्णयाला मान्यता दिली, परंतु निजाम-उल-मुल्कचा मुलगा नासिर जंगने तो नाकारला. आणि त्यानंतर त्याने सत्ताबदल करून मुझफ्फर जंगला हटवून हैदराबाद शहर ताब्यात घेतले.

हैदराबादच्या सिंहासनाच्या इच्छेमुळे घरातचं वाद सुरु झाला आणि यामुळेच नंतर दुसरे कर्नाटक युद्ध झाले. आता आसफचा मुलगा मीर अहमद अली खान अर्थात नासिर जंग आणि आसफचा नातू मुझफ्फर जंग हैदराबादच्या गादीवर आपला अधिकार सांगण्यासाठी समोरासमोर होते.

मुझफ्फर जंगने युद्धासाठी  फ्रेंच सैन्याशी करार केला. करारानंतर, मुझफ्फर जंगने फ्रेंच गव्हर्नर जनरल जोसेफ फॅन्कोस डुप्लेक्सच्या मदतीने दोस्त खानचा जावई चंदा साहिबला मराठ्यांच्या कैदेतून मुक्त केले.

खरं तर मुझफ्फर जंगची इच्छा होती कि,  नासीर जंगला सामोरे जाण्यापूर्वी  त्याला त्याचे साथीदार संपवायचे होते आणि नासिर जंगला कर्नाटकचे नवाब मुहम्मद अन्वरुद्दीन यांचे समर्थन मिळत होते. त्यामुळे मुजफ्फर जंगने अनवरुद्दीनचा शत्रू चंदा साहिबशी हातमिळवणी केली.

मुघलांच्या या परस्पर लढाईत ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात एक स्वतंत्र युद्ध चालू होते. फ्रेंचांनी  इच्छा होती कि, कर्नाटकमधील ब्रिटिशांचा प्रभाव कसा तरी कमी व्हावा आणि त्यासाठी  नवाबच्या गादीवर  अनवरुद्दीन ऐवजी दुसरा कोणी व्यक्ती बसावा जो फ्रेंच सैन्याचा मित्र असेल ना कि ब्रिटिशांचा.  म्हणून त्यांनी मोहम्मद अनवरुद्दीनचा प्रतिस्पर्धी चंदा साहिबला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

त्यात चंदा साहिबला सुद्धा संधी होती अन्वरुद्दीनविरुद्ध युद्ध करून आणि कर्नाटकची राजधानी आर्कोटचा नवाब होण्याची. याच हेतूने चंदा साहिबने मुझफ्फर जंगसह आर्कोटचे नवाब अनवरुद्दीन मुहम्मद खान विरुद्ध कट रचण्यास सुरुवात केली.

आता ब्रिटिशाना या सगळ्याची भनक नव्हती असे नाही. तेसुद्धा फ्रान्सला भारतातून संपवण्यासाठी नवाब मुहम्मद अन्वरुद्दीन आणि नासिर जंग यांना पूर्ण पाठिंबा देत होते. 

शेवटी १७४९ ला नवाब मुहम्मद अनवरुद्दीनला इंग्रजी सैन्याच्या संरक्षणाखाली अंबूरच्या युद्धात फ्रेंच सैन्याला सामोरे जावे लागले. पण वयोमानामुळं अनवरुद्दीनला युद्धात फार काळ टिकता आले नाही आणि युद्धात गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला.  

नवाबच्या मृत्यूनंतर चंदा साहिब अर्काटच्या गादीवर बसला. या दरम्यान, अनवरुद्दीनचा मुलगा महंमद अली खान आपला जीव वाचवून पळून गेला आणि त्रिचनापल्लीमध्ये लपला. त्याला पकडण्यासाठी फ्रेंच सैन्याचे एक मोठे पथक तिथं तैनात होते. या कठीण परिस्थितीत नसीर जंगने नवाबच्या मुलाच्या समर्थनार्थ आपले सैन्य पाठवले.

या दरम्यान, इंग्रजी अधिकारी रॉबर्ट क्लाइव्हने जाणीवपूर्वक एक उपाय शोधला. त्याने सुचवले की, अर्धे सैन्य आर्कोटला पाठवून चंदा साहिब आणि मुझफ्फर जंगला वेढा घातला जावा. क्लाइव्हची ही आयडिया सगळ्यांनाच पटली आणि क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली नासिर जंगचे सैनिक आणि ब्रिटिश सैन्याच्या ५१० सैनिकांची  हल्ला करण्यासाठी गेली. ज्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याच्या तुकडीने आर्कोटला ताब्यात घेतले.

दरम्यान, ही बातमी त्रिचनापल्लीमध्ये तैनात फ्रेंच सैन्याला समजताच त्यांचे अर्धे सैन्य आर्कोटला रवाना झाले. सैन्याच्या विभाजनाचा फायदा घेत ब्रिटिश सैन्याने त्रिचनापल्लीलाही आपल्या ताब्यात घेतले. या दरम्यान, फ्रेंच सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या कमांडरने आत्मसमर्पण केले.

अशाप्रकारे, १७५३ च्या सुमारास, फ्रेंच या युद्धात पूर्णपणे पराभूत झाले. दुसरीकडे, चंदा साहिब आणि मुझफ्फर जंग यांनाही ताब्यात घेण्यात आलं. ब्रिटीशांच्या पाठिंब्याने मोहम्मद अली खानला आर्कोटचा नवाब घोषित करण्यात आले. ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात परस्पर करार झाला.

ते युद्ध भारतासाठी निर्णयाक ठरलं. तेव्हा जर ब्रिटिशांच्या ऐवजी फ्रेंच सैन्य जिंकलं असत तर भारताचा इतिहास भूगोल संस्कृती काही असती. कदाचित भारतावर अनेक वर्ष फ्रेंचाच राज्य असतं. कदाचित मराठा व इतर शक्तींनी एकमेक्नाशी भांडून दुर्बल झालेल्या गोऱ्या व्यापारी कंपन्यांना भारतातून हाकलून लावलं असतं.

 हा सगळा जर तरचा मामला. पण या कर्नाटक युद्धाचे पडसाद युरोपमधल्या पॉवर बॅलन्स वर झाला हे नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.