म्हणून जगभरातला प्रत्येक ‘फॉरेनर कृष्णभक्त’ हा ‘इस्कॉनचा’ असतो…

काल एक बातमी आली, की बांगलादेशमध्ये काही लोकांनी इस्कॉनच्या मंदिराची तोडफोड केली. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधल्या श्री राधाकांता मंदिरात गौर पौर्णिमा उत्सवाची तयारी सुरू असताना दोनशे लोकांच्या जमावानं मंदिरावर हल्ला करत नासधूस केली.

ऑक्टोबर २०२१ मध्येही बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त बांगलादेशमधलीच नाही, तर जगभरातली इस्कॉन मंदिरं आणि इस्कॉन समूह चर्चेत आला आहे.

इस्कॉन म्हणजे काय?

सुरुवात कशी झाली, ती कुणी केली, इस्कॉन जगभरात कसं पोहोचलं आणि गेल्या ५६ वर्षांपासून सुरू असलेली ही संस्था पैसे कसे कमवते? असे प्रश्न पडतात.

इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्रिष्णा कॉन्शिअसनेस. जगात श्रीकृष्ण हेच सर्वोच्च दैवत आहे असं इस्कॉनचे अनुयायी मानतात. त्यांना भारतात आणि परदेशात हरे क्रिष्णाज या नावानंही ओळखतात. श्रीकृष्णानं सांगिलेली भगवतगीता आणि भागवतपुराणाला हे भक्तगण प्रमाण मानतात.

भारतापेक्षा जास्त परदेशात प्रसिद्ध असणाऱ्या इस्कॉनची स्थापना केली, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी.

१८९६ मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या स्वामी प्रभुपाद यांच्या घरातच कृष्णभक्तीचं वातावरण होतं. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी गुरूकडून दीक्षा घेतली आणि संन्यास घेत आपलं आयुष्य कृष्णभक्तीत आणि भक्तीप्रसारात खर्च करण्याचं ठरवलं. १९६५ मध्ये ते खिशात ४० रुपये आणि बरीचशी पुस्तकं घेऊन न्यूयॉर्कला गेले. तिथे मैदानात किंवा बागेत बसून ते कृष्णाच्या नावाचा जप करायचे.

त्यांच्या आजूबाजूला नशेत गुल असलेले हिप्पी तरुण असायचे, सुरुवातीला त्यांनी प्रभुपाद यांच्याकडे दुर्लक्ष केलं… मात्र नंतर तेही हरे क्रिष्णाचा गजर करु लागले. प्रभुपाद यांनी १९६६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉनची स्थापना केली आणि पुढे इस्कॉन हळूहळू अमेरिकेतल्या राज्यांपासून पूर्ण जगात पसरत गेलं.

इस्कॉनमध्ये भक्तगण केवळ श्रीकृष्णाला मानतात, त्याचा जप करतात. अनेक जण संन्यास घेऊन पूर्णवेळ इस्कॉनचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. इस्कॉनमध्ये चार नियम पाळले जातात, आहार शाकाहारीच घ्यावा, दारू, चहा, कॉफी अशा उत्तेजक पेयांपासून दूर राहावं, सट्टा किंवा जुगार खेळू नये आणि प्रजनना व्यतिरिक्त शारीरिक संबंध ठेवू नयेत.

इस्कॉन फेमस झालं, ते त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळं. इस्कॉननं आपला प्रसार करण्यासाठी दोन फंडे वापरले. पहिलं म्हणजे पब्लिक एंगेजमेंट आणि दुसरं म्हणजे पुस्तकांचं वाटप. इस्कॉनला सुरुवात झाली ती अमेरिकेत. अमेरिका असेल किंवा युरोप तिथल्या लोकांना भारतीय संस्कृतीचं  प्रचंड आकर्षण आहे.

इस्कॉननं ही गोष्ट अगदी अचूक हेरली.

इस्कॉननं त्यांचा प्रसार मंदिरातून करण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन गेला. भारतीय पेहरावातली लोकं हरे कृष्णाचा गजर करतायत, भक्तीरसात न्हाऊन निघालीयेत हे चित्र फॉरेनर लोकांना चांगलंच आवडायचं. त्यामुळं इस्कॉनचा प्रसार एअरपोर्ट, हॉटेल्स, बागा अशा ठिकाणी होऊ लागला साहजिकच अनेक विदेशी लोकं इस्कॉनला जोडली गेली.

प्रसार करण्याची दुसरी पद्धत होती, ती म्हणजे पुस्तकं.

जगभरातच अनेकांचा ओढा धार्मिक पुस्तकं वाचण्याकडे जास्त असतो. जेव्हा इस्कॉनची सुरुवातीची वर्ष होती, तेव्हा अमेरिकेत अध्यात्मिक आणि प्रेरणादायी पुस्तकं वाचण्याचा ट्रेंड आला होता. इस्कॉननं तेव्हा प्रभुपाद यांनी लिहिलेली आणि कृष्णाच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तकं मोफत वाटली आणि त्यातूनच लोकांना इस्कॉनबद्दल ओढ तयार झाली आणि ते हरे क्रिष्णा चळवळीत समाविष्ट झाले. इस्कॉनच्या विचारांचा आणि भूमिकेचा प्रसार करण्यात या पुस्तकांनी मोलाची भूमिका बजावली.

अमेरिकेत सुरुवात झाल्यानंतर, अमेरिका आणि भारतातल्या अनेक ठिकाणी इस्कॉननं मंदिरं उभारली आणि जमही बसवला.

सोबतच नेपाळ, बेल्जीयम, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतल्या देशांमध्येही इस्कॉन पोहोचलं. सोव्हियत युनियनचा पाडाव झाल्यानंतर अनेक रशियन नागरिक इस्कॉनकडे आकर्षित झाले. आता त्यांची जगभरात मंदीरं, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स आणि टुरीझम प्रोग्रॅमही आहेत. जिथं भक्त जप आणि कीर्तन करु शकतात, दीक्षा घेतलेले किंवा घेऊ इच्छिणारे भक्त तिथं राहूदेखील शकतात.

इस्कॉनचा जगभर पसरलेला पसारा पाहता एक प्रश्न पडतो, तो म्हणजे या सगळ्यासाठी लागणारा पैसा ते कसा उभा करत असतील? 

इस्कॉनला पैसे मिळतात ते डोनेशन्स, पुस्तकांची विक्री, हॉटेल्स आणि कलादालनातून मिळणारं उत्पन्न यातून. प्रभुपाद यांनी बनवलेल्या नियमानुसार एका गोष्टीतून मिळालेले पैसे दुसऱ्या गोष्टीसाठी वापरता येत नाहीत. मंदीराचं जे काही उत्पन्न होतं, त्यातूनच तिथला रोजचा खर्च चालवला जातो. मंदिराच्या अध्यक्षाकडे सगळी जबाबदारी असते आणि जे काही होईल त्यासाठी त्याला गव्हर्निंग बॉडीला उत्तर द्यावं लागतं. 

जगभरातले अनेक लोक इस्कॉनच्या मंदिराला भेट द्यायला येतात, त्यातले अनेक जण सढळ हातानं मदत करतात. सोबतच इस्कॉनच्या पुस्तकांची विक्री प्रचंड आहे, ज्यातून त्यांना भरघोस फायदा मिळतो. अनेक इस्कॉन मंदिरांमध्ये प्रसादालय वेगळं आणि कँटिन किंवा हॉटेल वेगळं अशीही सोय असते. त्यामुळं हॉटेल्स आणि निवासस्थानंही उत्पन्नात भर घालतात.

पलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्यापासून प्रसिद्ध बँड बीटल्सपर्यंत अनेकजण इस्कॉनचे अनुयायी राहिले आहेत. साहजिकच त्यांच्या हुंडीत परकीय चलनापासून सोन्याचीही भर पडत असते. १९६६ पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात वादाचेही अनेक प्रसंग आले मात्र इस्कॉनची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. भारतात आणि भारताबाहेरही श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झालेला हरे क्रिष्णा समुदाय आपल्याला पाहायला मिळतो. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.