भारताच्या इतिहासातील रहस्यमय ‘चपाती आंदोलन’, ज्याने ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं !

भारताच्या इतिहासातील एक गूढ म्हणून चपाती आंदोलनाकडे बघितलं जातं. विशेष म्हणजे चपाती आंदोलनाचं गूढ अजूनपर्यंत उकललेलं नाही. असं असलं तरी इतिहासकारांच्या मते या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं.

नेमकं होतं काय चपाती आंदोलन…?

१८५७ सालच्या उठावादरम्यान भारतात चपाती आंदोलन सुरु झालं होतं. आधीच सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाभोवती एक गुढतेचं वलय असल्याने या आंदोलनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

काही इतिहासकारांच्या मते या आंदोलनादरम्यान कॉलरा रोगाने पिडीत असलेल्या लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात चपाती पाठविण्याचं काम केलं जात असे. परंतु ब्रिटिशांसाठी चपाती हा खाद्य प्रकार नवीन असल्याने या चपात्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का नेल्या जात आहेत, या प्रश्नाने ब्रिटिशांना भांबावून सोडलं होतं.

या आंदोलानामुळे ब्रिटीश नेमके का घाबरले होते..?

चपाती हा खाद्यप्रकार असल्याने त्यावर काही लिहिलं जाऊ शकत नव्हतं. म्हणजेच त्या माध्यमातून कुठलाही लिखित संदेश पाठविला जाऊ शकत नव्हता. तरीही मोठ्या प्रमाणात चपात्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का पोचवल्या जात आहेत, हा प्रश्न ब्रिटीश अधिकाऱ्यांना सतावत होता.

या आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात काहीतरी षडयंत्र केलं जात आहे, असा संशय ब्रिटिशांना होता. परंतु खूप सारे प्रयत्न करून देखील या साऱ्या प्रकारामागे नेमकं कोण आहे आणि चपात्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का पाठवल्या जाताहेत, हे शोधण्यास मात्र ब्रिटिशांना यश येत नव्हतं आणि त्यामुळेच हा सगळा गूढ प्रकार ब्रिटिश साम्राज्यावर कुठलं तरी नवीन संकट घेऊन येईल की काय अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती.

आंदोलन गूढ होतं तर मग आंदोलन झाल्याचा पुरावा काय..?

आंदोलनाभोवती जर गूढतेचं वलय असेल तर खरोखरच असं काही आंदोलन झाल्याचा पुरावा काय असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच आहे. पण याचा पुरावा उपलब्ध आहे. एका पत्राच्या स्वरुपात.

१८५७ साली ब्रिटीश सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गिल्बर्ट हैडो यांनी सर्वप्रथम अशा प्रकारच्या आंदोलनाचा उल्लेख आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे. बहुतेक भारताच्या इतिहासात हे असं एकमेव पत्र आहे, ज्यात या आंदोलनाचा उल्लेख बघायला मिळतो.

chapati movement

आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात डॉ. गिल्बर्ट हैडो म्हणतात, “ सध्या भारतात एक गुप्त आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन नेमकं काय आहे, त्यामागे नेमकी काय कारणं आहेत आणि आंदोलनामागे नेमकं कोण आहे, हे एखादं धार्मिक आंदोलन आहे की गुप्त समाजाने सरकारविरोधात रचलेलं षड्यंत्र यापैकी कुठल्याच गोष्टीविषयी काहीच माहिती नाही. एकच गोष्ट जी या आंदोलनाविषयी माहिती आहे ती अशी की हे आंदोलन ‘चपाती आंदोलन’ म्हणून ओळखलं जातं.

तपासांती ब्रिटीशांच्या हाती काय लागलं..?

भयभीत झालेल्या ब्रिटीश सरकारने या प्रकरणाची खूप चौकशी केली परंतु त्यांच्या हाती ठोस असं काहीही लागलं नाही. फक्त एक गावातून दुसऱ्या गावात जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करून चपात्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवल्या जात असत, एवढंच लक्षात आलं. मात्र त्या कोण पोहचवतय हे मात्र सरकारला शोधता आलं नाही.

आंदोलनामागे तात्या टोपे होते..?

काही लोकांच्या मते १८५७ सालच्या उठावाचे नायक समजले जाणारे तात्या टोपे या आंदोलनामागे असावेत. ब्रिटीशांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही रणनीती तयार केलेली असावी. परंतु हा फक्त तर्क आहे. हे सिद्ध करण्यासाठी कसलाही पुरावा उपलब्ध नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.