१० कोटी बजेट असलेल्या सिनेमाने हजार कोटी कमवले. काय होतं सिक्रेट?

काही लोकं अशी असतात ज्यांना आपण सुमडीत कोंबडी म्हणतो अशातलच एक प्रकरण आहे म्हणजे आमीर खान. झालंय काय की गेली वीस वर्षे भारतात शाहरुख खान आणि सलमान खान यांचा सुपरस्टार म्हणून दबदबा आहे, तेवढा दबदबा कधीच आमीरचा नव्हता.

वर्षातून एकच सिनेमा, त्यातही वेगवेगळे प्रयोग करणे, पत्रकारांशी फटकून राहणे, फिल्म अवार्डला न जाणे या गोष्टीमुळे त्याची हवा अशी कधी झाली नाही. पण गडी महाडोकेबाज. वर्षा दोन वर्षात एक सिनेमा करतो पण पुढच्या दहा वर्षांचे पैसे कमवतो.

उदाहरणच घ्यायचं झाल तर सिक्रेट सुपरस्टार.

आता हा सिनेमा आपल्या पैकी किती जणांनी बघितलाय माहिती नाही. पण याची स्टोरी थोडक्यात सांगायची म्हणजे एका छोट्या मुलीला गाण्याची आवड असते पण तिचे कर्मठ वडिल तिला गाऊ देत नसतात. त्यांच्या धाकामुळे लपून युट्युबवर आपलं अकाऊंट उघडते व बुरखा घालून गाण गाऊ लागते. तिचं नाव गाव कोणाला माहित नसत पण ही छोटी मुलगी काही दिवसातच युट्युब सेन्सेशन बनते. तिला बॉलीवूडमध्ये चान्स देणारा एकजण भेटतो, वडिलाना तीच सिक्रेट कळत वगैरे वगैरे.

पिक्चर नितांत सुंदर आहे. छोट्या मुलीचं यथार्थ दाखवलेलं भावविश्व, तिचं आणि तिच्या आईचं नातं, वडिलांच्या वागण्याने होणारी घुसमट सगळ पडद्यावर जसच्या तस मांडलंय. झहिरा वसीम, मेहर वीज, राज अर्जुन या कलाकारांनी भारी काम केलंय. सिनेमाच म्युजिक तर अप्रतिमच.

छोट्या रोल मध्ये आमीरने सुद्धा धमाल केली आहे.

हे सगळ ठीक आहे ओ. पण कमाई १००० कोटी?

याच सिक्रेट आहे थ्री इडियटस.

झाल काय की २०१०ला जेव्हा थ्री इडियटस आला तेव्हा प्रचंड हिट झाला. जवळपास ४५० कोटी कमवून या सिनेमाने विक्रम केला. सगळीकडे अमीरची चर्चा सुरु होती. आमीरराव पुढच्या सिनेमाच्या तयारीत होते. त्यावेळी त्याला कोणीतरी सांगितल की भावा तुझा सिनेमा चीनमध्ये प्रचंड हिट झालाय.

आमीर खान आणि सिनेमाचा डिरेक्टर राजू हिरानी चक्रावून गेले. आम्ही तर चीनमध्ये सिनेमा प्रदर्शित केला नव्हता. गंमत म्हणजे पायरसी होऊन थ्री इडियटस चीन मध्ये पोहचला आणि भयंकर हिट झाला. फक्त थ्री इडियटस नाही तर आमीर खान तिथ सुपरस्टार झाला होता.

आमीर खानला नवीन सिक्रेट सापडलं. यापूर्वी राज कपूरचे समाजवादी सिनेमे सोडले तर चीनमध्ये भारतीय सिनेमा कधी चाललाच नव्हता. म्हणून तिकडे कोणी लक्ष दिल नव्हत पण राजकुमार हिरानी आणि आमीर खानने व्यवस्थित चीनकडे लक्ष द्यायचं ठरवलं.

 त्यांचा पुढचा सिनेमा होता पीके. 

अंतराळातून आलेल्या एलियनवर असलेला पीके काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतात वादग्रस्त ठरला तरी इथे त्याने चांगली कमाई केली पण भारताबाहेर चीन मार्केटमध्ये पीके ने साडे तीनशे कोटी कमवले.

दंगल वेळी तर सगळे रेकोर्ड ब्रेक झाले. 

भारतात साडेपाचशे कोटी कमवणारा कुस्तीवाला दंगल चीनमध्ये जवळपास दीड हजार कोटी कमवून दिला. दंगलच्या वेळी आमीरखानची चीन मधली पॉप्युलरीटी टोकाला जाऊन पोहचली होती.

किती जरी झाल तरी तिथली जनता आपल्या प्रमाणेच आहे. त्यांचे प्रश्नसुद्धा आपल्या मध्यमवर्गीय संसाराप्रमाणे असतात. आमीर खानने हा धागा पकडला. एवढे दिवस त्याने हिरो म्हणून पैसे कमवले आता पुढचा सिनेमा प्रोड्युसर म्हणून कमवण्याचा होता.

सिक्रेट सुपरस्टार हा आमीर खान प्रोडक्शन खाली बनला. यात आमीर सोडला तर कोणी मोठा स्टार नव्हता. ना कोणते महागडे सेट्स, ना फॉरेन लोकेशनचा खर्च. अद्वैत चंदन या नवोदित दिग्दर्शकाने अगदी काटकसरीने हा सिनेमा बनवला.

जास्तीत जास्त १० ते १५ कोटी खर्च म्हटल तरी डोक्यावरून पाणी. (नेमका खर्च किती आमीर खानने कोणाला कळू दिलेलं नाही) 

अद्वैत चंदन हा अमीर खानच्या प्रोडक्शन हाउस मधला असिस्टंट दिग्दर्शक. सत्यमेव जयतेच्या एका एपिसोडचा रिसर्च करताना त्याला एका मुलीला बघून ही स्टोरी सुचली. भारतीयांना ही कनेक्ट तर झाली, इथे जवळपास १०० कोटी कमवले. छोट्या सिनेमाच्या मानाने हे चांगले पैसे होते.

पण आमीरच्या प्रेमात पडलेल्या चिन्यांना तर या सिनेमाने वेडच केलं.

१९ जानेवारी २०१८ रोजी चीन मधल्या जवळपास ११००० थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला. तुफान चालला. प्रमोशनसाठी गेलेल्या आमीर खानचं तिथ एखाद्या सुपरस्टार प्रमाणे स्वागत झालं. तिथल्या टीव्हीवर, तिथल्या त्यांच्या सोशलमिडीयावर फक्त आणि फक्त आमीर खाची चर्चा होती.

चीनमध्ये सिक्रेट सुपरस्टारने बॉक्सऑफिस फोडून जवळपास ९०० कोटी कमवले. शिवाय हॉंगकॉंग, शांघाय, जपान वगैरे वगैरे वेगळेच. सगळ मिळून जवळपास १००० कोटी झाले. दंगलच्या मानाने हे पैसे कमी होते पण दंगलपेक्षा सिनेमा बनवण्याचा खर्च देखील कमी आला होता. आज भारतात कमाईमध्ये  दंगल, बाहुबलीच्या खालोखाल तीन नंबरला सिक्रेट सुपरस्टार आहे.

सलमान शाहरुखचे भल्या मोठ्या बजेटमध्ये बनणारे कोणतेच सिनेमे याच्या जवळपास नाहीत.

प्रोड्युसर आमीर असल्यामुळे सगळे पैसे त्याच्याच खिशात गेले आहेत. आता या कमाईमधला किती वाटा चिन्यांनी उचललाय, किती पैसे त्या झायरा वसीमला दिलेत, किती पैसे दिग्दर्शकाला दिलेत माहित नाही. पण कोणी काहीही म्हणो भारतीय फिल्मइंडस्ट्रीमधला सगळ्यात चापटर माणूस कोण असेल तर तो आमीर खान आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. अमोल अर्जुन श्रीनाथ says

    अमीर खान ला चाप्टर का म्हणता ? त्याने मेहनत केली आणि पैसे मिळवले आहेत …कुठे ही काही ही बोलून उगाच अपमान का करता ! हुशार म्हंटलात तरी चालेल पण चापटर म्हणून स्वतः च्या वेबसाईट ची ….घालवू नका !

Leave A Reply

Your email address will not be published.