महिलांचे चोरून व्हिडीओ शूट करायला गेलात तर अपमान वेगळाच, पण इतक्या वर्षांची शिक्षा होते

१६ सप्टेंबर रोजी चंदीगड युनिव्हर्सिटीमधील होस्टेलच्या काही मुलींचे अंघोळ करतांनाचे व्हिडीओ लीक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी युनिव्हर्सिटी कॅंपस मध्ये आंदोलन सुरु केलं होतं.

या घटनेमुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांच्या मनात भीती असून त्यांनी मुलींना घरी बोलावून घेण्यास सुरुवात केलीय. 

हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असून यावर पोलिसांची कारवाई सुरु आहे. त्यांनी व्हिडीओ शूट करणारी मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड पंकज वर्मा यासोबत आणखी एका मुलाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणात एकूण ६० व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत असा आरोप विद्यार्थिनींनी केलाय मात्र आतापर्यंत ४ व्हिडीओच पोलिसांना सापडलेले आहेत. 

पोलीस याचा तपास करतीलच पण यानिमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो; तो म्हणजे की, अशा प्रकारे जर कोणी महिलांचे चोरून लपून व्हिडीओ बनवत असेल कायद्यानुसार कोणती शिक्षा दिली जाते.

तर अशा प्रकरणांमध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी ॲक्ट २००० नुसार कारवाई केली जाते.

आयटी ॲक्टच्या कलम ६६ ए नुसार परवानगी न घेता एखाद्या महिलेचे फोटो काढणे तसेच ते शेअर किंवा पब्लिश करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. जर या कायद्यानुसार कोणी दोषी आढळत असेल तर त्याला तीन वर्षांची जेल आणि १ लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच आरोपी पुन्हा दुसऱ्या प्रकरणात सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा करत असेल तर त्याला पाच वर्षाची शिक्षा आणि १० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. 

चंदीगड विद्यापीठाच्या केसमध्ये याच आयटी ॲक्ट २००० च्या कलम ६६ ए नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

तसेच एखाद्या महिलेचा आपत्तीजनक व्हिडीओ किंवा त्यासंबंधी कंटेंट टेक्नोलॉजीच्या माध्यमातून सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांवर प्रसारित केलं गेल्यास आयटी ॲक्टचे कलम ६७ लागू होते. यानुसार आरोपीला ३ वर्षांची जेल आणि ५ लाखाचा दंड भरावा लागू शकतो. 

यासोबतच जर कोणी जाणून बुजून कोणाच्या प्रायव्हसीला धक्का लागेल असं चित्रण करत असेल किंवा त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो काढून ते शेअर करत असेल तर त्या ठिकाणी आयटी ॲक्टचे कलाम ६६ ई लागू होते. यामध्ये ३ वर्षांची जेल आणि २ लाखाच्या दंडाची तरतूद केली आहे. 

परंतु याबाबत आयटी ॲक्टसोबतच भारतीय दंड संहिता १८६० नुसार सुद्धा कारवाई केली जाते. 

भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५४ सी नुसार एखाद्या महिलेला अंघोळ करतांना, कपडे बदलतांना किंवा यासारखी कोणतीही आपत्तीजनक फोटो काढली गेली तर या कायद्यानुसार कारवाई केली जाते. यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला १ ते ३ वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तसेच आरोपी पुन्हा अशाच प्रकारच्या केसमध्ये दोषी असेल तर ३ ते ७ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलीय. 

या कलमांसोबतच अशा प्रकरणांमध्ये २ ते ४ आरोपी असतील तर आयपीसी कलम ३४ तर आयओपींची संख्या ५ किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर आयपीसी कलम १४७, १४८, १४९ लागू होते.

महिलांचे चोरून लपून व्हिडीओ बनवण्याच्या प्रकरणामध्ये कोणत्या कायद्यांच्या आधारे कारवाई केली जाते हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सायबर विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर अनिल डफळ यांच्याशी संपर्क साधला. 

याबद्दल कायदेशीर माहिती देतांना पीआय डफळ सांगतात की, “अशा प्रकरणांमध्ये प्रामुख्याने आयटी ॲक्ट २००० च्या कलम ६७ नुसार कारवाई केली जाते. हे कलम कोणीही जर आपत्तीजनक व्हिडीओ अथवा कंटेन्ट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर प्रसारित करत असेल त्यावर लागू होते. यात ३ वर्षांचा  कारावास आणि ५ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे.” असं त्यांनी म्हटलं. 

या कायद्याबद्दल अधिक माहिती देतांना ते सांगतात की, ” जर आरोपी दुसऱ्यांदा याच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढतात असेल तर त्यासाठी ५ वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.” असं ते म्हणाले.

महिलेच्या परवानगीशिवाय छुप्या पद्धतीने तिचे व्हिडीओ शूट केल्यास कारवाई करण्यासाठी कोणत्या कायद्यांचा वापर केला जातो. याबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सायबर कायद्यांचे वकील ॲड. रोहन माळी यांच्याशी संपर्क साधला. 

कायदेशीर बाबींबद्दल बोल भिडूशी बोलतांना ॲड. रोहन माळी सांगतात की, “अशा प्रकारांमध्ये आयपीसी कलाम ३५४ आणि आयटी ॲक्ट २००० चे कलम ६७ ए आणि ६७ ई  नुसार गुन्ह्याची नोंद केली जाते. पण जर प्रकरणात एकापेक्षा अनेक आरोपी सहभागी असतील तर त्यांच्यावर आयपीसी कलम ३४ नुसार गुन्हा नोंद केला जातो.” असं ॲड. रोहन माळी यांनी सांगितलं. 

चंदीगड केसमध्ये पोलिसांचा तपास सुरु आहे मात्र जर अशा प्रकारच गुन्हा केल्यास समाजात अपमान तर होतोच. पण वरील कायद्यानुसार शिक्षा सुद्धा होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.