निर्भयाला न्याय देणाऱ्या सीमा कुशवाह आता श्रद्धा-आफताबची केस लढवणार आहेत..

दिवस १६ डिसेंबर २०१२, रात्रीची वेळ होती. २२ वर्षांची इंटर्नशिप करत असलेली एक फिजिओथेरपिस्ट स्वतःच्या मित्राबरोबर बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये त्या दोघांसोबत ड्रायव्हर आणि त्याचे ५ मित्र देखील प्रवास करत होते.

अचानक ड्रायव्हर आणि त्याच्याच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या मित्राला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि दोघांना बसमधून खाली ढकलून दिलं. कसंबसं निर्भयाला एम्समध्ये  दाखल करण्यात आलं.  

ही बातमी माध्यमांसोबत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि देशातील सामान्य जनता मिळेल त्या माध्यमातून रस्त्यांवर उतरली. दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेले लोक राष्ट्रपती भवनापर्यंत गेले.

लोकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या सरकारला हादरवून सोडलं होतं.

एकीकडे एम्समध्ये चाललेले प्रयत्न यशस्वी होत नाहीयेत हे बघून तिला एअर म्ब्युलन्सने सिंगापूरला पाठवण्यात आलं. थोडक्यात निर्भयाचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न कॉंग्रेस सरकारमार्फत करण्यात आले. मात्र दूर्देवाने २९ डिसेंबर रोजी निर्भयाचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ट्विट करून शोक संदेश देण्याची औपचारिकता पार पाडली नाही तर स्वत: पार्थिव स्विकारण्यासाठी विमानतळावर गेले.

त्या आक्रोशामध्ये सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करायला सुरुवात करणाऱ्या सीमा कुशवाह यांच्याकडे ही केस ठेवण्यात आली.

सीमा कुशवाह या नुकत्याच सुप्रीम कोर्टात आल्या होत्या आणि त्यांच्यासमोर पहिलीच केस आली होती ती निर्भयाची. केस किती गंभीर आहे याची जाणीव त्यांना त्याच क्षणी झाली होती परंतु सीमा कुशवाह यांनी ती केस स्वीकारली आणि सुप्रीम कोर्टात निर्भयाची बाजू मांडण्याला सुरुवात केली.

अतिशय साध्या कुटुंबात जन्म झालेल्या सीमा कुशवाह यांच्या पाठीशी कोणतंही आर्थिक पाठबळ नव्हतं की, घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. परंतु सीमा कुशवाह यांनी केस लढण्याचा निर्धार केला. अखेर मार्च ८ वर्षानंतर मार्च २०२० मध्ये निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी झाली.

निर्भयाची केस लढणाऱ्या सीमा कुशवाह आता श्रद्धा वालकार हत्याकांड प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांची बाजू मांडणार आहेत.

काल श्रद्धाच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना माहिती देतांना सांगितलंय की, श्रद्धाची केस देखील सीमा कुशवाह याच लढणार आहेत. याबद्दल सीमा कुशवाह यांनी सुद्धा माध्यमांना माहिती दिलीय. श्रद्धा वालकरची केस सीमा कुशवाह यांच्यासारख्या दिग्गज वकिलाकडे दिल्यामुळे या प्रकरणात श्रद्धाला लवकर न्याय मिळेल अशी केली जात आहे.

पण आज इतक्या नामांकित वकील असलेल्या सीमा कुशवाह यांनी अतिशय गरिबीतून हा प्रवास केला आहे.  

सीमा यांचा जन्म उत्तर प्रदेशाच्या इटावा जिल्ह्यातील उग्रपूर गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला. आजही घराला नीट प्लास्टर नसलेल्या सीमाच्या आईवडिलांनी मुलीला शिकवण्याचा मनाशी ठरवलं होतं. सीमाने सुरुवातीचं शिक्षण इटावमध्येच पूर्ण केलं आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी कानपुर गाठलं. कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केली.

कॉलेजमधून लॉची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात प्रॅक्टिस सुरु केली.परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लवकरच प्रॅक्टिस सोडून प्रौढ शिक्षण विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी दिल्ली गाठली आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरु केली. त्यानंतरचा प्रसंग सगळ्यांना माहीतच आहे.

निर्भयाची केस लढल्यानंतर त्यांनी निर्भया ज्योती ट्रस्टची स्थापना केली.

या त्रासातच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या केसेस लढवल्या आहेत. ज्यात हाथरस बलात्कार प्रकरणाचा समावेश आहे. सप्टेंबर २०२० मध्ये हाथरसच्या १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि सीमा कुशवाह या पीडित मुलीची बाजू मांडत आहेत. जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी बहुजन समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्या सध्या बसपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या देखील आहेत. 

निर्भया आणि हाथरस प्रकरणाप्रमाणेच श्रद्धा वालकरच्या हत्येचं प्रकरण सुद्धा फार गंभीर आहे. मात्र आता या प्रकरणात तिच्या वडिलांची बाजू सीमा कुशवाह मांडणार असल्यामुळे श्रद्धाच्या मारेकऱ्याला शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.