भारतीय टीमवर दादागिरी करणाऱ्या ग्रेग चॅपलला सेहवागने आपल्या भाषेत उत्तर दिलं होतं.

साल होतं २००५. ग्रेग चॅपल नावाच वादळ भारतीय क्रिकेटवर घोंघावत होतं तो काळ. कप्तान गांगुलीच्या खास आग्रहास्तव ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर ग्रेग चॅपलला भारतीय कोच म्हणून नेमण्यात आलं होतं.

ग्रेग चॅपल क्रिकेटर म्हणून प्रचंड लोकप्रिय होता. आपल्या तगड्या बॅटिंगमुळे त्याने अनेकदा ऑस्ट्रेलियाला जिंकून दिल्या होत्या. अस्सल ऑस्ट्रेलियन चिकटपणा त्याच्यातही भिनलेला होता. मॅच जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीला जाण्याची त्याची तयारी असायची. त्यामुळेच त्याची कप्तानीसुद्धा अनेक वेळा वादग्रस्त ठरली होती.

पण तरीही भारतीय टीमने त्याच्यावर विश्वास ठेवला होता.

भारतीय क्रिकेट टीम त्या काळात मजबूत होती मात्र तरीही ऑस्ट्रेलियाची उंची गाठणे आपल्याला शक्य झाले नव्हते.२००३च्या वर्ल्डकपवेळी देखील फायनलला जाऊनदेखील आपण ऑस्ट्रेलिया कडून हरलो होतो. त्यांच विजयाच सिक्रेट त्यातल्या तज्ञाकडून समजावून घेणे महत्वाचे होते आणि यासाठीच ग्रेग चॅपलची भारताचा मुख्य कोच म्हणून नेमणूक झाली.

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियामध्ये बदलण्याच्या नादात चॅपलने अनेक बदल केले.

सर्वात प्रथम चॅपलने त्याला भारतात आणलेल्या गांगुलीलाच कप्तानीवरून काढून टाकल. त्याच्या जागी द्रविडला कप्तान केलं. स्विंग बॉलर इरफान पठाणला वरच्या ऑर्डरमध्ये बॅटिंग करायला यायला लावलं. सचिनला ओपनिंग मधून मिडल ऑर्डरमध्ये ढकललं. त्याचे हे बदल खेळाडूना पचवणे जड जात होतं.

खेळाडूंच्यात प्रचंड नाराजी होती. पण कोणी काही बोलत नव्हते. सगळ्या टीममध्ये एक भयाण प्रेशर होतं.

आपली टीम वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेली होती. पहिली ५ सामन्यांची वनडे सिरीज विंडीजने ४-१ने सहज खिशात टाकली. भारतात द्रविड आणि ग्रेग चॅपलवर सडकून टीका होत होती. या टीकेमुळे चिडलेल्या चॅपलने आपली मास्तरकीची छडी बाहेर काढली आणि त्याचा पहिला शिकार ठरला सेहवाग.

सेहवाग हा मस्तकलंदर माणूस. त्याची स्वतःची एक वेगळीच स्टाईल होती. त्याला पळून धावा काढण्यापेक्षा जागेवर उभे राहून लंबे लंबे शॉट मारायला आवडायचं. म्हणूनच काय त्याच फुटवर्क शून्य होतं. पाय जागेहून हलायचेच नाहीत. सगळे म्हणायचे की सेहवाग कधी कोणाच ऐकत नाही.

एकदा ग्रेग चॅपलने ठरवलं की सेहवागला सुधरायचं.  

दुसऱ्या टेस्टच्या आदल्या दिवशी जेव्हा सगळे खेळाडू प्रॅक्टीससाठी मैदानात आले तेव्हा वार्म अप झाल्या झाल्या चॅपलने विरू ला सांगितलं की तू आज मी सांगतो तसही प्रॅक्टीस करायची. त्याने सेहवागला चांगलेच रगडले. शेवटी जेव्हा तो त्याला पाय स्ट्रेचिंग करून खेळायला लावायला लागला तेव्हा अखेर वीरूने सांगितलं,

“I am not comfortable”

पण गुरु चॅपल ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते. त्याच मत होतं की सेहवाग आपल्या आळसपणामुळे आपल टलेंट वाया घालवत आहे. त्याने थोड जरी फुटवर्क सुधारलं तर त्याला कोणीच आउट करू शकणार नाही हे त्याच प्रामाणिक मत होतं. पण विरू स्वतःमध्ये बदल केले तर खेळूच शकणार नाही या मताचा. दोघांच्यात भांडणे सुरु झाली. चॅपलने त्याला सांगितलं की

“टीम मध्ये रहायचं आहे तर माझ ऐकलंच पाहिजे.”

जो खुद्द गांगुलीला टीमच्या बाहेर काढू शकतो तो कोणालाही काढू शकतो हे सेहवागला ठाऊक होतं.

पण त्याने ठरवलं की काहीही होऊ दे आपण त्याच ऐकायचं नाही. दोघांचा वाद तापला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून कॅप्टन द्रविड तिथे आला. त्यानेही सेहवागला समजावून सांगितलं. पण विरू सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता.

अखेर द्रविडने त्याला सांगितलं की,

कोच म्हणतोय म्हणून फॉर्मलिटी तर पूर्ण कर उद्या बॅटिंग करताना तुला हवी तशीच कर, तेव्हा तुला कोण अडवणार नाही.

मग मात्र सेहवागने चॅपलने सांगितलं होत तशी प्रॅक्टीस केली. पण दुसऱ्या दिवशी तो जास्तच जोशात बॅटिंगला उतरला. पहिल्या ओव्हर पासून वेस्ट इंडियन बॉलर्सची त्याने पिटाई सुरु केली. जेरोमी टेलरला त्याने सलग तीन बाउन्ड्री हाणली.

कॉमेंटेटर म्हणत होते होते की कोणीतरी सेहवागला सांगा की हा कसोटी सामना आहे वनडे नाही.

अख्ख वेस्ट इंडियन क्राउड शांत होतं. समोर जाफर आउट झाला, त्यानंतर आलेला लक्ष्मणसुद्धा आउट झाला. पण सेहवाग काही थांबण्याच्या मूड मध्ये नव्हता. लंच सेशन झालं तेव्हा तो ९९ वर खेळत होता. आणि या सगळ्या धावा त्याने आपल्या स्टाईलने पाय न हलवता बनवल्या होत्या. लंचच्या वेळी त्याने कोचला सांगितलं,

“माझे पाय हालतात की नाही हे महत्वाचे नाही पण माझ्या बॅटमधून रन्स निघतात की नाही ते महत्वाचे आहे.”

त्यादिवशी सेहवाग आउट झाला तेव्हा त्याने १९० चेंडूत १८० धावा बनवल्या होत्या. तो अजून थोडा वेळ टिकला असता तर एका दिवसात डबल सेंच्युरी करण्याचा विक्रम त्याने त्या दिवशीच बनवला असता. ग्रेग चॅपलला त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. परत कधी तो त्याला शहाणपणा सांगायला गेला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.