शिवसेनेच्या ५२ नगरसेवकांनी मिळून केला होता एका नगरसेवकाचा खून..?

सेना आणि राडे हे समीकरणं महाराष्ट्राला नवीन नाही. या राड्याची अनुभूती अनेक दिग्गजांनी शिवसेना सोडताना घेतली आहे. भुजबळांपासून ते राणेंपर्यन्त अनेक जण सेना सोडत असताना शिवसैनिकांनी केलेल्या राड्याला साक्षीदार आहेत. सेना सोडताना अशा राड्यांना सामोरं जावं लागत असेल तर विचार करा शिवसेनेत असताना मत फुटल्याचा आरोप झाल्यानंतर एका नगरसेवकाचं काय होवू शकतं.

हा किस्सा तोच जेव्हा एका नगरसेवकाचा मत फोडल्याच्या आरोपातून चौकात गेम करण्यात आला. 

शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या २१ एप्रिल १९८९ साली करण्यात आली होती. २२ मार्च रोजी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या हल्याच्या प्रयत्नातून ते बचावले. मात्र २१ एप्रिल रोजी ते लुईसवाडी भागात काही कामानिमित्त गेल्यानंतर त्याच्यावर तलवारीचा हल्ला करण्यात आला. याच हल्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेला कारणही तसच होतं, 
मार्च १९८९ मध्ये ठाण्याच्या महापौर पदाची निवडणुक होती. यामध्ये कॉंग्रेसनं आगरी सेनेशी दोस्ती करत सेनेला शह द्यायचा प्रयत्न केला होता.
मात्र सेनेच्या ३० नगरसेवकांनी जनता पक्ष व जनता दलाच्या साथीनं महापौर पदावर दावा ठोकला. ठाण्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि माजी महापौर सतीश प्रधान यांच्या हाती निवडणुकीचीं ही सुत्र देण्यात आली. मात्र एवढं करुन सेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे अवघ्या एका मताने पडले तर उपमहापौर पद दोन मतांनी पडलं. सेनेची दोन मतं फुलटी असा निष्कर्ष काढण्यात आला आणि हे दोन गद्दार कोण ते शोधण्याचं फर्मान वरिष्ठ पातळीवरुन निघालं.

गद्दार कोण ? म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले होते. अवघ्या एका मताने झालेला पराभव सेनेच्या जिव्हारी लागला होता आणि त्यातूनच शिवसैनिक या गद्दार नगरसेवकाला शोधत होते. गद्दार नेमकां कोण हे शोधत असतानाचा अचानक सेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा खून करण्यात आला.

या प्रकरणात आनंद दिघे यांच्यासह ५२ नगरसेवकांना अटक करण्यात आली. दिघे यांच्या अटकेच्या निषेधात ठाणे बंद करण्यात आलं. तर दूसरीकडे खोपकर यांच्या अंत्ययात्रेला एकही शिवसैनिक उपस्थित राहिला नाही. यावर तत्कालीन ठाण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त रामदेव त्यागी यांनीदेखील खोपकरांचा खून सेनेनं केला असे उद्गार काढले होते..