त्या दिवशी सेनापतींनी पेशवाई सुरू होण्याच्या आधीच संपवली असती

पेशवाई म्हणजे मराठी राजसत्तेचा वैभवाचा इतिहास. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या प्रधानांना विशेष अधिकार दिले ज्याचा वापर करून त्यांनी मराठ्यांचा भगवा झेंडा अटकेपार पोहचवण्यात महत्वाची कामगिरी बजावली.

या पेशवाईची सुरवात बाळाजी विश्वनाथ भट यांनी केली होती.

बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातल्या श्रीवर्धनचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या घराण्याकडे तिथली देशमुखी चालत आली होती. देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजी यांना मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्याशी त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजीनां श्रीवर्धन सोडावे लागले.

ते आपल्या कुटुंब कबिल्यासह साताऱ्याला आले. तिथे त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नजरेस आली.

धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. सेनापतीच्या सैन्यासह बाळाजी विश्वनाथ गुजरात मोहिमेवर देखील गेले होते.

त्याकाळात छत्रपती ताराराणी बाईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य औरंगजेबाशी लढत होतं. स्वराज्याला घशात घालण्याचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाला मराठी मातीतच मृत्यू आला. स्वराज्यावरील संकट दूर झालं. शंभुपुत्र शाहू महाराज पुन्हा महाराष्ट्रात परतले.

शाहू महाराजांनी आपला छत्रपतीपदाच्या गादीवर हक्क सांगितला. ताराराणी यांनी आपला हक्क सोडण्यास नकार दिला.

भोसले घराण्याच्या दोन्ही वारसदारांमध्ये युद्ध झाले.

स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधव ताराराणी यांच्या पक्षात होते. ऑक्टोबर सन १७०७ च्या खेडच्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्याविरूद्ध न लढण्याचा सल्ला बाळाजींनी दिला. त्यांच्याच मध्यस्तीमुळे सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट झाली.

सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल झाले. खेडची लढाई शाहू महाराजांनी जिंकली. राजधानी सातारा त्यांनी काबीज केला.

या घटनेनंतर बाळाजी विश्वनाथ याच्या बद्दल शाहू महाराजांच्या मनात विशेष जागा निर्माण झाली.

पुढे धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच चंद्रसेन जाधव यांना सरसेनापतीपदाची वस्त्रे दिली. चंद्रसेन जाधव हे देखील आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी व कर्तबगार होते. पण सुरवातीपासून त्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीबद्दल आस्था होती. शाहू महाराजांच्या मनात त्यांच्या बद्दल शंका निर्माण करून देण्यात आली होती.

पुढे जेव्हा मुघलांच्या प्रदेशात चौथाई सरदेशमुखी गोळा करून आणण्यासाठी ते मोहिमेवर निघाले तेव्हा सेनाकर्ते हे पद देऊन बाळाजी विश्वनाथ याची सुद्धा त्यांच्या सोबत नेमणूक करण्यात आली.

चंद्रसेन जाधवांना बाळाजी विश्वनाथ यांच्या बद्दल राग होता.

बाळाजी विश्वनाथ म्हणजे एकेकाळी त्यांच्या हाताखालचा कारकून, घोड्यावरही बसायला न येणाऱ्या, तलवार न चालवणाऱ्या व्यक्तीला आपल्याबरोबरीने मोहिमेवर पाठवण्यात आले याची त्यांच्या मनात खंत होती.

दोघांच्यातील सुप्त संघर्षाचा एकदा भडका उडाला, याला कारण ठरली एक हरणाची शिकार.

सरसेनापती चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथ यांची उंब्रजजवळ छावणी पडली होती. तेव्हा लष्कराच्या येण्याजाण्यामुळे जंगलातून एक हरीण भेदरलेल्या अवस्थेत छावणीत घुसले.

बाळाजींचा एक पिराजी नावाचा शिलेदार त्या हरणाला पकडण्यासाठी मागे लागला.

या हरणाने धावपळ करून छावणी डोक्यावर घेतली. पळता पळता ते एका तंबूत शिरले. तिथे चंद्रसेन जाधवांचे व्यासराव नावाचे ब्राम्हण कारकून राहत होते. पिराजी देखील त्या राहुटीत शिरले पण व्यासरावाने त्या हरणाला त्यांच्या हवाली करण्यास नकार दिला.

दोघांची त्या हरणावरून मोठी भांडणे झाली. पिराजींनी त्या हरणाला मारण्यासाठी भाला फेकला तो भाला हरणाचे जीव वाचवण्यासाठी पुढे आलेल्या व्यासरावाला लागला. तो जागीच गतप्राण झाला.

या गुस्ताखी मुळे सेनापती चंद्रसेन जाधव भडकले. त्यानी पिराजीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी बाळाजींकडे केली. पण बाळाजीने चक्क यास नकार दिला. त्यांनी सेनापतींना निरोप पाठवला,

“पिराजी आम्हास शरण आला आहे, त्यास काय शिक्षा करायची ती आम्ही करतो.”

दोघांचे वाद झाले. शेवटी पिराजीला पकडून आणण्यासाठी चंद्रसेन जाधवांनी फौज पाठवली.

या फौजेला पाहून बाळाजी विश्वनाथ भट पळाले. त्यांनी पुरंदर किल्ल्यात आश्रय घेतला. मागून आलेल्या चंद्रसेन जाधवांच्या सैन्याने पुरंदरला वेढा घातला. तिथल्या सचिवाला बाळाजी विश्वनाथाला बाहेर काढा म्हणून सक्त ताकीद देण्यात आली.

अखेर बाळाजी, अंबाजीपंत पुरंदरे, कुटुंब कबिल्यासह पाचशे स्वार घेऊन तिथूनही पळाले. मागून येणाऱ्या चंद्रसेन जाधवांच्या सैन्याने त्यांना निरेजवळ गाठले. दोघांचेही युद्ध झाले. बाळाजींचा पराभव झाला.

सेनापतींनी बाळाजीचा संपूर्ण नाश करायची प्रतिज्ञाच घेतल्याप्रमाणे निघाले होते.

अगदी निवडक सैनिक आणि बाजीराव व चिमाजी ही दोन मुले यांना घेऊन बाळाजी रानोमाळ भटकू लागले. त्यांची ही अवस्था पाहून पिलाजीराव जाधवांचे मन द्रवले. त्यांनी जोखीम पत्करली, स्वतः जातीने आपल्या लोकांसह गेले, बाळाजींना शोधून काढण्यात आलं. त्यांना घोड्यावर बसवून दोन्ही बाजुंनी दोन माणसे त्यांना धरायला उभी केली, मोठ्या बंदोबस्तात त्यांना पांडवगडावर पोहचवण्यात आले.

पिलाजीराव जाधव होते म्हणून बाळाजी विश्वनाथ आणि त्यांची मुले वाचली नाही तर पेशवाई सुरू होण्या आधीच संपली असती.

या लढाईमुळे चंद्रसेन जाधवांच्याबद्दल शाहू महाराजांची खप्पा मर्जी झाली. त्यांचे सेनापती पद काढून घेण्यात आलं. चंद्रसेन जाधव पुढे महाराणी ताराराणी यांच्या सैन्यात सामील झाले. त्यांच्या जाण्यामुळे शाहू महाराजांची बाजू डळमळू लागली, अनेक सरदार आपल्या भवितव्याबद्दल साशंक बनले.

पण बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्देगिरी करून या सर्व सरदारांना जिंकले, या कामी पिलाजीराव जाधव यांची मदत घेतली. या दोघांनी मिळून सातारा गादी भक्कम करण्यास मदत केली. यामुळे खुश झालेल्या छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपदाची वस्त्रे बाळाजी यांना दिली.

आणि पेशवाईस प्रारंभ झाला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Deep says

    पेशवाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या साम्राज्याचा नाश . नंतरच्या काळात पेशवा एवढे मग्रूर झाले होते की नंतरच्या छत्रपती वारसांना शिक्षणा पासून दूर ठेवले. पुण्यात नांग्या मुलींना धावण्याच्या शर्यतीत उतरवले. बहुजन समाजाचे अधिकार काढून टाकले. पेशवाई म्हणजे महाराष्ट्राला लागलेले कलंक.

Leave A Reply

Your email address will not be published.