बेन्डर्स फॅमिलीची खानावळ प्रवासी लोकांसाठी स्मशान बनली होती….

जगात अनेक विचित्र गुन्हे घडत असतात. काही प्रकरणात आरोपी सापडतात, काही प्रकरणात सापडत नाहीत मात्र बळी जाण्याचं सत्र थांबत नाही. सिरीयल किलर लोकांबद्दल आपण ऐकतच असतो, डोक्यातल्या सनकीपणामुळे ते अनेक लोकांचा जीव घेतात. पण आजचा किस्सा आहे बेन्डर्स फॅमिलचा. हि बेन्डर्स फॅमिली इतिहासात सिरीयल किलर फॅमिली म्हणून ओळखली जाऊ लागली.

१८५० आणि १८७० च्या काळात दुनियेत अनेक घटना घडत होत्या. लोकांचं एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर वाढलं होतं. याच काळात युरोपातून बरेच लोक अमेरिकेत स्थायिक झाले. यात बहुतेक लोकं हे व्यापारी होते. या दरम्यान एक परिवार १८७० ला जर्मनीहून कन्सास मध्ये आला. या कुटुंबाने शेती करण्याच्या उद्देशाने १६० एकर जमीन विकत घेतली.

या परिवारात जॉन बेन्डर, पत्नी एल्वीरा, मुलगा जॉन ज्युनियर आणि मुलगी केट होते. त्या जमिनीवरच त्यांनी दोन खोल्यांचं घर बांधलं आणि तिथे हि बेन्डर्स फॅमिली राहू लागली. जॉन बेन्डरच्या परिवारात फक्त त्याच्या मुलीला केटला उत्तम इंग्रजी येत होतं. ज्या ठिकाणी ते राहत होते तिथून पुढे घनदाट जंगल सुरु व्हायचं. त्या मार्गाने व्यापारी लोकांचं येणंजाणं जास्त होतं.

या प्रवाशांच्या सोयीसाठी या बेन्डर्स फॅमिलीने एक खानावळ सुरु केली. घराच्या बाहेर टेबल खुर्च्या लावण्यात आल्या. बेन्डर्स फॅमिली तिथे राहायला लागल्यापासून एक दोन वर्षानंतर अनेक लोकांच्या गायब होण्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण बेन्डर्स फॅमिलीकडे कोणाचं लक्ष गेलं नाही कारण ते स्वतःला धार्मिक फॅमिली म्हणवून घेत. जॉनची पत्नी हि आत्म्यांसोबत बोलत असल्याचं सांगण्यात येत असे. 

१८७३ मध्ये कन्सासचे सिनेटर मिस्टर यॉर्क आणि यूएस मिलिटरीच्या कर्नलचे भाऊ अचानक गायब झाले. अनेक चौकशा आणि तपास सुरु झाले. अनेक लोकांनी सांगितलं कि त्या दोघांना शेवटचं बेन्डर्स फॅमिलीच्या खानावळीजवळ पाहण्यात आलं होतं. बेन्डर्स फॅमिलीने सांगितलं कि ते इथे आले होते पण पुढे कुठे गेले माहिती नाही.

कर्नलचा बेन्डर्स फॅमिलीवरचा संशय बळावला होता. त्याने शोध मोहीम जोरात सुरु केली. तपासाची चक्रे फिरवली. अनेक लोकांकडून बेन्डर्स फॅमिलीच्या कारवायांबद्दल बातम्या मिळू लागल्या. एका आठवड्यानंतर कर्नल बेन्डर्स फॅमिलीकडे पुन्हा गेला. पण बेन्डर्स फॅमिली तिथून दोन तीन दिवस अगोदरच गायब झाली होती. कर्नलने घराची चौकशी केली तेव्हा घरात मानवी मांस सडल्याचा वास येऊ लागला. 

अजून सखोल लक्ष केली तेव्हा भिंतींवर रक्ताचे डाग दिसून आले. एक गुप्त खोलीसुद्धा मिळाली ज्यात खून पाडले जात असे. घराच्या बाहेर लावलेल्या झाडांकडे नीट निरखून बघितलं तेव्हा असं दिसून आलं कि नुकतीच माती उकरली आहे. तेव्हा कर्नलने आदेश दिला आणि झाडांच्या तिथे खोदायला सांगितलं. या उत्खननात कर्नलला त्याच्या भावासोबतच अजून ११ लोकांची प्रेतं मिळाली.

सरकारने बेन्डर्स फॅमिलीला पकडण्यासाठी तब्बल ६० हजार डॉलर्सचा इनाम ठेवला. पण इतक्यावरच थांबेल ती बेन्डर्स फॅमिली कुठची ? घराजवळच्या नदीत अजून १० लोकांची प्रेत सापडली. २१ लोकांची हत्या या बेन्डर्स फॅमिलीने घडवून आणली आणि हे कुटुंब फरार झालं होतं.

अजूनही या बेन्डर्स फॅमिलीबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या जातात. पोलिसांनी अटक करण्याआधी हि फॅमिली जे गायब झाली ती परत कुणालाच सापडली नाही. बेन्डर्स फॅमिलची खानावळ पुढे एक ब्लडी बेन्डर्स नावाने म्युझियम म्हणून नावारूपाला आलं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.