सिरमला भारताबाहेर न्यायचं हे आधीच फिक्स झालं होतं, ५ दिवसांचा वाद फक्त निम्मित ठरला.
मागच्या ५ दिवसांपासून भारतातील सिरम इन्स्टिट्यूट आणि इंग्लंडच्या संदर्भात ज्या चर्चा चालू होत्या त्याला अखेर पूर्णविराम मिळताना दिसत आहे. आज ब्रिटिश सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार सिरम आता लस निर्मितीसाठी भारताबाहेर इंग्लंडमध्ये गुंतवणूक करणार आहे हे स्पष्ट झालयं, आणि तो आकडा पण साधासुधा नसून तब्बल २ हजार ४०० कोटींच्या घरात आहे.
तसचं तिथं एक नवीन सेल्स ऑफिस देखील सुरु केलं जाणार आहे, जिथून ६ हजार ५०० जणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
पण हा सगळा घटनाक्रम एका दिवसात घडला आहे का? तर नक्कीच नाही. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी, झालेले काही वाद आणि त्यावरून झडलेल्या चर्चा हे सगळं बघितलं तर आपल्याला ही गोष्ट समजून येऊ शकते.
Y दर्जाची सिक्युरिटी
सगळ्यात आधी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सरकार आणि नियामक कामांचे संचालक असलेले प्रकाशकुमार सिंह यांनी १६ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं होतं. आता या पत्रात काय होतं, तर अदर पुनावाला यांना सुरक्षा पुरवण्याची विनंती त्यात केली होती.
त्यानंतर आठचं दिवसांमध्ये बातमी आली की, केंद्र सरकारकडून अदर पुनावाला यांना ‘Y’ दर्जाची सरकारी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावेळी खरतर ही सुरक्षा नेमकी का पुरवली आहे, अदर पुनावाला यांच्यासारख्या व्यावसायिकाला नेमका कोणता आणि कोणापासून धोका आहे या संदर्भात काहीच माहिती देण्यात आली नव्हती.
या नंतर अदर पुनावाला यांनी सहकुटुंब थेट लंडन गाठलं.
या दरम्यान त्यांनी जागतिक माध्यम असलेल्या लंडन टाइम्स/द टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात वादंग निर्माण झालं. आपल्याकडे तीच मुलाखत इकनॅामिक टाइम्सने छापली. यात अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं कि,
‘मला लसीसाठी वजनदार नेत्यांकडून धमक्या येत आहेत’. आणि मुख्य म्हणजे यात काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सोबतच मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती पण त्यांनी व्यक्त केली.
याच ठिकाणी लिंक लागली कि अदर पुनावाला यांना Y दर्जाची सिक्युरिटी का दिली.
पण पुनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलं नसल्यामुळे सहाजिकच चर्चा, अफवांना तोंड फुटलं. राजकारण सुरु झालं. या दरम्यानचं एक राजकारण सांगायचं तर इंडिया टुडेचे ॲंकर राहुल कंवल यांनी अदर पुनावाला यांना धमकी देण्याचा आरोप थेट शिवसेनेवर केला. त्यानंतर सेनेकडून यावर आक्षेप घेतं चॅनलला जाब विचारणारं पत्र पाठवलं.
यावर कंवल यांनी याबद्दल माफी मागत स्पष्टीकरण दिलं की, पूनावालांनी आपल्याला काही क्लिप्स पाठवल्या. त्यात धमक्या देणाऱ्या लोकांची संघटना SSS असं म्हटल्याने आपला गोंधळ झाला. ते सेनेचे कार्यकर्ते नव्हते, तर SSS म्हणजे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते.
या दरम्यान पुनावाला यांनी आणखी काही गौप्यस्फोट केले.
त्यातील पहिला होता तो म्हणजे सिरमचं उत्पादन लंडन बाहेर घेऊन जाणार आहेत. तसेच आताच्या परिस्थिती भारतात परत जाऊ इच्छित नाही. सगळचं ओझं माझ्या खांद्यावर टाकलं आहे. पण मी सगळं नाही करू शकत.
त्यावर भारतात राजकीय चर्चा झाल्यानंतर पुनावाला यांनी खुलासा करत आपण लवकरचं परतणार असल्याचं सांगितलं.
Had an excellent meeting with all our partners & stakeholders in the U.K. Meanwhile, pleased to state that COVISHIELD’s production is in full swing in Pune. I look forward to reviewing operations upon my return in a few days.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 1, 2021
दुसरा गौप्यस्फोट होता केंद्राकडून नव्या लसीची मागणीच केली नसल्याचा.
यानंतरच भारतात सिरम आणि केंद्र सरकार वादाला सुरुवात झाली.
या मुलाखती दरम्यान पुनावाला यांना लसीच्या उत्पादन वाढी संबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं कि, भारत सरकारकडून कंपनीला ऑर्डर मिळाल्या नाहीत त्यामुळे वर्षाला १ अब्ज डोसच्या वर उत्पादन करण्याची गरज कंपनीला वाटली नाही. त्यामुळे पण लस निर्मिती मंदावल्याचा दावा त्यांनी केला. सरकारला वाटत होतं की कोरोना महामारीवर आपण विजय मिळवला आहे, त्यामुळे दुसरी लाट येणार नाही.
मात्र केंद्र सरकारकडून हे आरोप तात्काळ फेटाळण्यात आले. तसचं पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण पण दिलं.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला २८ एप्रिल २०२१ रोजी, लसींच्या खरेदीसाठी १७२.५० कोटी रुपये संपूर्ण आगावू रक्कम म्हणून (१६९९.५० रुपयांच्या टीडीएस कपातीनंतर) अदा करण्यात आली आहे. यातून, केंद्र सरकारला मे, जून आणि जुलै महिन्यासाठी ११ कोटी कोविशिल्ड लसींच्या मात्रा मिळणार आहेत.
सिरमला हे पैसे २८ एप्रिल रोजीच मिळाले देखील आहेत. आतापर्यंत, सरकारने आधी दिलेल्या १० कोटी कोविशिल्ड लसींच्या ऑर्डरपैकी ३ मे २०२१ पर्यंत सरकारला ८.७४४ कोटी लसींचा पुरवठाही झाला आहे.
या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर अदर पुनावाला यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं. एक पत्र ते ट्विट करत म्हणाले,
माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. प्रथम तर, लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही. आपल्याला हे पण समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणे हे सोपे काम नाही. अगदी प्रगत देश आणि कंपन्या तुलनेने कमी लोकसंख्या असतानाही संघर्ष करीत आहेत
दुसरे म्हणजे, आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असे सर्व प्रकारचे समर्थन सरकारकडून मिळाले आहे. आजपर्यंत आम्हाला एकूण २६ कोटी पेक्षा जास्त डोसचे ऑर्डर प्राप्त झाली, त्यापैकी आम्ही १५ कोटीहून अधिक डोस पुरविले आहेत.
आम्हाला १००% आगाऊ रक्कम देखील मिळाली आहे. पुढच्या काही महिन्यांत ११ कोटी डोससाठी १७३२.५० कोटी मिळाले आहेत. पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी ११ कोटी डोस पुरवल्या जातील.
Amongst multiple reports it is important that correct information be shared with the public. pic.twitter.com/nzyOZwVBxH
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 3, 2021
आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. ते ही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही आणखी कठोरपणे काम करू आणि कोरोना विरुद्धचा भारताचा लढा मजबूत करू.
आज इंग्लंडमध्ये गुंतवणुक करत असल्याची घोषणा
या सगळ्या वादानंतर आज अदर पुनावाला हे इंग्लंडमध्ये २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची बातमी आली आहे. ती देखील खुद्द इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. या गुंतवणुकीच्या पाठीमागे इंग्लंडमध्ये एका वॅक्सीन बिझनेसला चालना देणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
त्यासाठी सिरमच एक सेल्स ऑफिस देखील इंग्लंडमध्ये सुरु केलं जाणार आहे. त्यातून जवळपास ६ हजार ५०० जणांना नोकरी उपलब्ध होणार आहे.
जाता जाता आणखी एक गोष्ट.
india.com ने दिलेल्या बातमीनुसार अदर पुनावाला यांनी या सगळ्या वादाला सुरुवात होण्यापूर्वीच म्हणजे २५ मार्च रोजी लंडनमध्ये एक घर भाड्यानं घेतलं आहे. ज्याचं भाडं जवळपास ५० लाख रुपये आहे. त्यात आता असं ही सांगितलं जाऊ लागलयं कि, पुनावाला यांनी लंडनमध्ये संबंधित प्रॅापर्टी विकत घेतली आहे. हा सौदा इतका मोठा आहे की त्यामुळे लंडन मधल्या जागांचे भाव वाढले आहेत.
त्यामुळे पुनावाला आगामी काळात इंग्लंमध्ये स्थायिक झाल्यास जास्त आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही. कारण सगळ्या तयारीला २ महिन्यापूर्वीच सुरुवात झाली होती. हा ५ दिवसांचा वाद केवळ निम्मितमात्र ठरला आहे.
हे हि वाच भिडू
- पवारांच्या दोस्ताने इतक मोठ्ठं काम केलय की मोदींना देखील पुण्यात यावं लागलं…
- अर्थसंकल्पात कोरोना लसीसाठी ३५ हजार कोटी रुपये जाहीर केले, तरी लस फुकट का नाही?
- कोरोना लशीच्या स्ट्रॅटेजीमध्ये अमेरिकेने कशी बाजी मारली आणि आपण कुठे गंडलो ?