सरकारची परवानगी मिळाली नाही, तर लसीचे १ कोटी डोस वाया जाणार

कोरोनाच्या थैमानानंतर सगळ्या जगाला कुणी दिलासा तर कोरोना प्रतिबंधक लसींनी. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटनं युद्धपातळीवर लसींची निर्मिती करत, जगभरात लसींचा पुरवठा केला.

भारतानंही लसीकरणात चांगलीच आघाडी घेत, १०० कोटी लसीकरणाचा टप्पा नुकताच पार केला. देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि स्फुटनिक-व्ही या तीन लसी दिल्या जातात. लहान मुलांसाठीची लसही लवकरच उपलब्ध होणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटनंच कोव्होव्हॅक्स नावाच्या लसीची निर्मिती केली आहे. सध्या ही लस वापरण्यासाठी भारतात परमिशन मिळालेली नाही. पण इंडोनेशियात मात्र या लसीला हिरवा कंदील दाखवण्यात असला असून त्यांनी सिरमशी लस पुरवठ्याबाबत करारही केला आहे.

इंडोनेशियानं सिरम इन्स्टिट्यूटकडून कोव्होव्हॅक्सचे १ कोटी डोस मागवले आहेत.

मात्र सरकारकडून कोव्होव्हॅक्सच्या निर्यातीसाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं सिरम इन्स्टिट्यूटनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहीत निर्यातीसाठी परवानगी मागितली आहे. जरी इंडोनेशिया आणि इतर देशांमध्ये निर्यात झाली, तरी त्याचा परिणाम देशातल्या लस पुरवठ्यावर होणार नाही, अशी हमी सिरमनं पत्राद्वारे दिली आहे. जर लसींची निर्यात झाली नाही तर जवळपास एक कोटी डोस वाया जातील, असंही सिरमनं या पत्रात म्हणलं आहे.

भारतात वापर करण्यासाठीही मागितली परवानगी

देशात मार्च २०२२ पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि स्फुटनिक व्ही यावरच अवलंबून न राहता, कोव्होव्हॅक्सचाही वापर करण्यात यावा अशी सिरमची मागणी आहे. मात्र अजूनही सरकारनं कोव्होव्हॅक्सच्या वापराला परवानगी दिलेली नाही. त्यामुळं इतर देशांप्रमाणं भारतानंही कोव्होव्हॅक्सच्या वापराला परवानगी द्यावी, अशी मागणीही सिरमनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

महाराष्ट्रातही लसीकरण चांगल्याच वेगात सुरू आहे. राज्यातल्या महाविद्यालय आणि विद्यापीठातले प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. डोस न घेतल्यास वेतनकपातीला सामोरं जावं लागणार आहे. दारूच्या दुकानांवरही लस (दोन्ही डोस) घेतली असेल, तरच दारूविक्री केली जाईल असं जाहीर करण्यात आलं आहे.

मॉल, थिएटर आणि इतर ठिकाणी याआधीच लसीचे दोन डोस घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळं आता सरकार कोव्होव्हॅक्सबाबत काय निर्णय घेतं आणि लोकांना आणखी एका लसीचा पर्याय उपलब्ध होणार का? हे लवकरच कळेल.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.