मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची अवस्था पाहता भविष्यासाठी सी वॉटर डिसॅलिनेशनचा उपाय..!!

बिपारजॉय चक्रीवादळामुळे मुंबई पाणी टंचाईला तोंड देतेय. बिपारजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्यास खंड पडलाय. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव पाणीसाठा मिळून फक्त ४८ दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती मिळतेय. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती सद्याला निर्माण झाली आहे.

हे आत्ताचंच नाही तर मुंबईला पाणीपुरवठा करण्याचा १६२ वर्षांचा इतिहास पाहिल्यास भविष्यातील पाणी तुटवड्याचं डोक्यावर आहेच. हे जाणून घेण्यासाठी मुंबईच्या पाण्याचा आजवरचा इतिहास आणि भविष्यातील पाणीप्रश्न समजून घ्यावा लागेल..

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाण्याची स्थिती अशी आहे..

बृहन्मुंबई शहराला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणांचा समावेश होतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४.५ लाख मिलियन लिटर इतकी आहे. सध्या या धरणात किती पाणीसाठा आहे ?

  • अप्पर वैतरणा – शून्य टक्के
  • मोडकसागर – २२.१७ टक्के
  • तानसा – १९.५८ टक्के
  • मध्य वैतरणा – १३.३२ टक्के
  • भातसा – ५.२७ टक्के
  • विहार – २१.९२ टक्के
  • तुळसी – २८ टक्के

मुंबई शहरासाठी दीडशे वर्षात सात धरणं बांधावी लागली आहेत..याचा इतिहास पाहूया,

१८६० मध्ये निव्वळ एका तलावातून मुंबई शहराला पाणीपुरवठा व्हायचा. परंतु २०१२ येईस्तोवर मिठी, तुळशी, तानसा, भातसा आणि वैतरणा व अलवंडी या नद्यांना आडवून धरणं बांधावी लागली आहेत. जसजशी मुंबई शहराची वाढ होत आहे तसतशी मुंबई शहराची तहान वाढत आहे. गेल्या १६२ वर्षात तब्बल सात धरणं बांधण्यात आलेली आहेत.

विहार तलाव (१८६०)

औद्योगिकीकरणामुळे मुंबई शहराची वाढ व्हायला लागली आणि शहरातील नागरिकांबरोबरच उद्योगांची सुद्धा तहान वाढायला लागली. त्यामुळे ब्रिटिशांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १८५६ मध्ये मिठी नदीवर विहार तलाव बांधण्यास सुरुवात केली.

१८६० मध्ये विहार तलावाचं बांधकाम पूर्ण होऊन मुंबई शहराला पाणीपुरवठा सुरु झाला. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता २७६९८ दशलक्ष  लिटर आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच हा तलाव आहे. 

एकेकाळी मुंबई शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावाचे आज मुंबईच्या एकूण पाणीसाठ्यातील योगदान आज केवळ २१.९२ टक्के इतके आहे. या तलावातून संपूर्ण मुंबई शहराला केवळ साडे आठ दिवस पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.

तुळशी तलाव (१८७९)  

विहार तलावानंतर १९ वर्षानंतर १८७९ मध्ये ब्रिटिशांनी आत्ताच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच तुळशी नदीवर आणखी एक तलाव बांधला. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. 
या तलावातून दररोज १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या तलावातून संपूर्ण शहराला केवळ दोन दिवस पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.

तानसा धरण (१८९२)

विहार आणि तुळशी तलावाचे पाणी अपुरे पडू लागल्यांनंतर, ब्रिटिशांनी १८९२ मध्ये ठाणे जिल्ह्यातील तानसा नदीवर बंधारा बांधून तानसा धारण बांधले होते. या धरणापासून मुंबईत होत चाललेला लोकसंख्येचा विस्फोट पाहून मोठी धरणं बांधण्यास सुरवात झाली. या तानसा धरणात १४४१२२ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते. 

या धरणामध्ये विहार आणि तुळशी तलावाच्या दुप्पट पाणी साठवले जाते.. 

मोडक सागर (१९५६)  

स्वातंत्रानंतरही मुंबईच आर्थिक केंद्र म्हणून असलेलं महत्व तसूभरही कमी झालं नव्हतं. परिणामी लोकसंख्याही झपाट्याने वाढत राहिली.  ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९५६ मध्ये वैतरणा नदीवर धारण बांधण्यात आले. १९५६ मध्ये बांधण्यात आलेलं मोडक सागर हे स्वातंत्र्य मिळाल्यांनतर मुंबईसाठी बांधलेलं पहिलं धरण आहे.

नानासाहेब मोडक या इंजीनर्सच्या नावावरून धरणाला मोदक सागर असं नाव देण्यात आलं आहे. नानासाहेब मोडक यांनी  धरण बांधण्यापूर्वी नाशिक, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यांची पाहणी केली आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीहून ठाणे जिल्ह्यात खडीर्पर्यंत वाहत येणाऱ्या वैतरणा नदीला पाण्याचा चांगला ओघ असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तिथे जवळच त्या नदीला बांध घातला व तलाव तयार केला. मोडक सागर धरणात १२८९२५ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते.

अप्पर वैतरणा धरण १९७३    

मुंबई शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन १९७३ मध्ये अप्पर वैतरणा धरण बांधण्यात आले. हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वैतरणा आणि अलवंडी नद्यांना अडवून बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये २२७४०७ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते.

भातसा धरण १९८३

अप्पर वैतरणा धरणानंतर १९८३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील भातसा नदीवर हे धारण बांधण्यात आले आहे. या धरणात ७१७०३७ दशलक्ष लिटर पाणी साठवण्यात येते. हे धारण नवी मुंबईतील औद्योगिक वापरासाठी बांधण्यात आले होते. मात्र त्याचबरोबर धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा केला जातो.

भातसा धरण हे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे हे सगळ्यात मोठे धरण आहे. 

मध्य वैतरणा २०१२

मध्य वैतरणा धरण हे मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेले हे सगळ्यात शेवटचे धारण आहे. हे धरण २०१२ मध्ये मोडक सागर आणि अप्पर वैतरणा धरणाच्या दरम्यान वैतरणा नदीवर बांधलेले तिसरे धारण आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मध्य वैतरणा जलाशयाचं नाव आता ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असं करण्यात आलं आहे. या धरणामध्ये  १९३५१० दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते. 

गरजेइतकं सुद्धा पाणी मुंबई शहराकडे नाही..

बृहन्मुंबई शहराची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी दररोज ४५०० मिलियन लिटर पाण्याची गरज आहे. मात्र सध्या दररोज त्याच्या अर्ध्याच पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय.  यावरून असे दिसून येते कि मुंबई शहराची आजची गरज सुद्धा पूर्ण होत नाहीये. त्यामुळे भविष्यात पाणी संकट आणखी बिकट होईल..

जुन्या पाइपलाइनच्या गळतीमुळे बरंच पाणी वाया जातं..

या तलावातून मुंबई शहरात आणण्यासाठी मोठ मोठया पाइपलाइन्स टाकण्यात आल्या आहेत. मात्र आता ब्रिटिश काळातील अनेक पाईपलाईन जुन्या आहेत. त्यामुळे पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तसेच यातून बऱ्याच पाणी चोरी सुद्धा केले जाते.

या पाणी गळतीत आणि पाणी चोरीमध्ये तब्बल ९०० दशलसक्ष लिटर पाणी दररोज वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना दररोज केवळ २९०० मिलियन लिटर पाणीच मिळते.

परंतु भविष्याचे नियोजन करण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ योजना..

मुंबई शहरातील पाणी संकटावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘सर्वांसाठी पाणी योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दुबई शहराप्रमाणे समुद्रातील खऱ्या पाण्याचे क्षार काढून टाकून पाणी पिण्यायोग्य बनवले जाणार आहे.

‘सर्वांसाठी पाणी’ या योजनेसाठी मे २०२२ मध्ये महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या प्रकल्पामधून दररोज २०० मिलियन लिटर पिण्यायोग्य गोड पाणी मिळेल असे सांगण्यात आले आहे. 

मुंबईतील पाण्याची समस्या निवारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु आकडेवारी लक्षात घेत जाते पुरेसे नाही. त्यामुळे पाण्याची गळती, पाणीचोरी आणि अवैध पाण्याचे कनेक्शन थांबवणे गरजेचे आहे. गेल्या दीडशे वर्षात ७ धरणं बांधण्यात आली आहेत. या इतिहासाकडून शिकत मुंबईला पाण्याचे नियोजन करावे लागेल… मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना पाणीजपून वापरावं लागणार आहे.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.