एकच आमदार तरीही राज ठाकरेंचं नाणं कायम खणखणीत वाजतं ते या ७ कारणांमुळे..

३० एप्रिल २०२२, बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर आणि नेत्यांच्या वक्तव्यात फक्त एकच विषय होता, तो म्हणजे राज ठाकरे.

१ मे २०२२, महाराष्ट्र दिन. राज्यात राजकीय रण पेटलेलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांची भाषणं झाली. पण सगळ्यात जास्त गाजलेलं, चर्चेत असलेलं भाषण होतं राज ठाकरेंचं.

खरंतर विधानसभा निवडणुकांमध्ये जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त एकाच जागेवर यश मिळालं तेव्हा अनेकांनी राज यांची आणि मनसेची खिल्ली उडवली होती. अजूनही विरोधकांकडून मनसेचा संपलेला पक्ष, बी टीम असा उल्लेख होतो.

पण एक गोष्ट मात्र नाकारुन चालत नाही, ती म्हणजे राज ठाकरे जेव्हा जेव्हा चर्चेत येतात तेव्हा, ते राजकीय अवकाश पूर्णपणे व्यापून टाकतात.

त्यांची भूमिका, भाषण आणि रणनीती याचा धसका विरोधकांना असतो, तो या सात कारणांमुळे.

कारण क्रमांक एक- राज ठाकरेंचं भाषण

राज ठाकरे बोलायला उभं राहिले, की समोरच्या विस्तीर्ण जनसमुदायावर मोहीम टाकू शकतात, आपल्या काकांची म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही लकब त्यांनी जबरदस्त आत्मसात केली आहे. त्यांच्या भाषणातले मुद्दे प्रखर असतात. भाषणाला व्हिडीओ, चित्रफिती आणि कागदपत्रांचा आधार घेऊन ते अधिक दमदार सादरीकरण करतात. त्यांची भाषाशैलीही अत्यंत सोपी आणि सामान्य माणसाला भिडणारी असते. साहजिकच लोकांच्या मनावरची पकड मजबूत होते.

दुसऱ्या बाजूला राज टीकेचे बाण कुठल्या दिशेला सोडतील हे सांगता येत नाही. मागे मोदींवर टीका करताना त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत आणि व्हिडीओ दाखवत आपलं भाषण प्रचंड गाजवलं होतं. त्यामुळे ठाकरे काय बोलतात, याकडे मनसे कार्यकर्त्यांसोबतच अनेक नेतेही लक्ष ठेऊन असतात, हे काही लपून राहिलेलं नाही.

सत्तेत नसतानाही राज यांच्या भाषणाला होणारी लाखोंची गर्दीही, त्यांची ताकद अधोरेखित करते. 

कारण क्रमांक दोन – भाषणांना मिळणारा टीआरपी

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांवेळी एकाच दिवशी एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा होत्या. तेव्हा सर्व वृत्तवाहिन्यांनी राज यांचं भाषण लावण्यास प्राधान्य दिलं होतं. महाराष्ट्र दिनाला झालेल्या राज यांच्या भाषणाची चर्चा आयपीएल सामन्यांपेक्षा जास्त झाली. टीव्हीसोबतच मोबाईलवरुनही सभा पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. फक्त लोकसभेवेळेच नाही, तर अगदी महानगरपालिका निवडणुकांसाठी राज भाषण करणार असतील, तर टीव्हीवर ‘राज ठाकरेच’ दिसणार हे जवळपास नक्कीच असतं.

त्यांच्या भाषणाला टीआरपी मिळायचं आणखी एक कारण म्हणजे राज यांची भाषाशैली. त्यांच्या भाषाशैलीत असलेले शेलके शब्द, नक्कल करण्याची लकब लोकांमध्ये अनेकांमध्ये लोकप्रिय आहेत. 

कारण क्रमांक तीन – त्यांचं ‘ठाकरे’ असणं

प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही चारही नावं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वजन असलेली नावं. प्रबोधनकारांच्या प्रखर भूमिकांनंतर, बाळासाहेबांनी राजकीय अवकाश व्यापून टाकलं होतं. मात्र बाळासाहेबांचा करिष्मा कायम ठेवण्यात उद्धव यांच्यापेक्षा राज काकणभर सरस ठरले, असं कायम बोललं जातं.

आजही राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांचं वर्चस्व आहेच. अनेक कार्यकर्ते आणि मतदार हे मनसेला केवळ ‘ठाकरे’ ब्रँडमुळं जोडले गेले आहेत, अर्थात तो ठाकरी बाणा आणि ठाकरी शैली जपण्यात राज यांनी कायम यश मिळवलं आहे.

कारण क्रमांक चार – मुंबईवरचं वर्चस्व

गेल्या निवडणुकांमध्ये मतपेटीवर फारसं यश मिळालं नसलं, तरी मनसेचा मुंबईवर चांगलाच होल्ड आहे. जेव्हा मनसे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरली होती, तेव्हा त्यांनी मुंबईतल्या सहा जागा जिंकत सेना-भाजपला विशेषतः सेनेला धक्का दिला होता.

मुंबईमधल्या मराठी मतदारांचा ओढा आजही शिवसेना आणि मनसेकडे आहे. अमराठी मतदारांची संख्या वाढत असली, तरी अमराठी लोकांविरोधात भूमिका घेऊनही मनसेनं मुंबईतली ताकद कायम ठेवली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या जुन्या नेत्यांसोबतच अविनाश जाधव, गजानन काळे, संदीप देशपांडे, अभिजित पानसे अशी फळीही मुंबईत तयार झाली आहे. सोबतच २०१९ च्या निवडणुकांमध्ये मनसेला मिळालेलं एकमेव यश म्हणजेच आमदार राजू पाटीलही कल्याण ग्रामीणमधूनच निवडून आले होते.

२०१७ च्या महापालिका निवडणुकांनंतर मनसेचे सात नगरसेवक निवडून आले, त्यातले सहा सेनेत सामील झाले. मात्र तरीही राज आणि मनसेनं मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन मोर्चेबांधणी केली आहेच.

कारण क्रमांक पाच – ‘टायमिंग’

मनसेचा राजकीय पटलावर उदय झाला, तेव्हा शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत होती. ज्यावेळी शिवसेनेचा राजकीय पटलावर उदय झाला, तेव्हा त्यांनी मराठी भूमीपुत्रांचा मुद्दा लावून धरला होता. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देताना, सेनेकडून मराठीचा मुद्दा मागे पडला आणि राज यांनी आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी याच मुद्द्यावर भर दिला. मनसेच्या सुरुवातीच्या यशात भूमिपुत्रांसाठी केलेलं आंदोलन, उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेली प्रखर भूमिका, मराठी भाषेसाठी केलेलं खळ्ळ खट्याक यांचा मोठा वाटा आहे, हे नाकारताच येणार नाही.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. मनसेनंही यात उडी घेतली आहेच. २०२० मध्ये मनसेनं आपल्या झेंड्यांचा रंग बदलत भगवा केला. राज ठाकरेंना मराठीहृदयसम्राट ऐवजी हिंदूजननायक अशी उपाधी कार्यकर्त्यांनी दिली. त्यांच्या भाषणाची सुरुवातही, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी होऊ लागली. त्यांचा सत्कार करताना भगवी शाल, श्रीरामाची मूर्ती अशा गोष्टी आल्या तर भाषणात मशिदीवरचे भोंगे, हनुमान चालीसा असे मुद्दे आले.

थोडक्यात हिंदुत्वाचा मुद्दा व्यापत राज यांनी पुन्हा एकदा अचूक टायमिंग साधलं आहे. एवढंच नाही, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळीही राज यांनी घेतलेली भूमिका गाजली आहे.

कारण क्रमांक सहा – मतपेटीचं चित्र बदलणारा ‘मनसे फॅक्टर’

मनसेनं आपल्या पहिल्याच निवडणुकांमध्ये सेना-भाजपच्या मतांमधला मोठा वाटा घेत, दोन्ही काँग्रेसचं गणित सोपं केलं होतं. एवढंच नाही, तर मनसेमुळं झालेल्या मतविभागणीचा फटका सेनेला दादरमधली जागा गमवून भोगावा लागला होता. मुंबई महानगर पालिकेमध्येही अनेक वॉर्डात शिवसेनेचं मताधिक्य कमी करण्यात आणि भाजपचं बळ वाढवण्यात मनसे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.

सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना आहे. त्यामुळं जर मनसे स्वबळावर निवडणूक लढली, तर सेनेच्या मतांचं विभाजन होणं साहजिकच आहे. जर मनसे भाजपसोबत गेली तरीही, महाविकास आघाडीला कडवं आव्हान देऊन शकते. मनसे जिंकली नाहीच, तरी आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी होते, हे आतापर्यंतचं चित्र आहे.

कारण क्रमांक सात – ‘कार्यकर्ते’

मनसेची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे मनसैनिक. शिवसेनेकडे ज्याप्रकारे कडवे आणि ‘साहेबांच्या’ आदेशावर काहीही करायला तयार असणारे शिवसैनिक आहेत, तसंच बळ मनसेकडे आहे. त्यांच्यासाठी राज साहेबांचा शब्द अंतिम आहे. आतापर्यंत राज्यात एकदाही सत्तेत न येऊनही मनसेनं आपली कार्यकर्त्यांची फौज कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे.

कुठलंही आंदोलन असेल, सभा असेल राज यांची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक भूमिका सार्थ ठरवण्याचं बळ त्यांना कार्यकर्त्यांकडूनच मिळतंय.

या सात कारणांमुळे एक आमदार असला, तरी राज ठाकरे आणि मनसेचं नाव कुणीच पुसू शकत नाहीत आणि राज्याच्या राजकारणात गेमचेंजर ठरण्याचे त्यांची संधी वाढते, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.