ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले ते सात प्रसंग आणि त्यामागचं राजकारण काय होतं.  

आव्वाज कुणाचा.. ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरचा… पण आवाज गंडलाय वो.. सचिन खेडेकरचा आवाज सुट होत नाही.. कुठे बाळासाहेबांचा आवाज आणि काय हे.., 

काल ठाकरे सिनेमाचा ट्रेलर आला आणि समाजमाध्यमांवर आवाजाची चर्चा सुरू झाली. वास्तविक हे आशादायी चित्र आहे कारण एका आवाजावर मुंबई बंद करु शकणारा आवाज देखील तितकाच दमदार होता. हाच आवाज सिनेमात देखील ऐकायला मिळेल अस लोकांना वाटणं साहजिक आहे. काहीनी तर डोळे बंद करुन फक्त आवाजासाठी सिनेमा ऐकायची तयारी देखील केली असेल पण झालं अस की आवाजच गंडला.

असाच प्रसंग पुर्वी बहुजनांचा हिरो समजल्या जाणाऱ्या आकाश ठोसरच्या वाट्याला आला होता. चॉकलेट बॉय उमेश कामत याचा आवाज FU सिनेमासाठी आकाश ठोसर याला दत्तक देण्यात आला होता. अवघ्या एका शब्दात लोकांना बहुजन अभिजन दरी समजली. पुन्हा समाजमाध्यमांवर राडा झाला आणि आकाश ठोसर पुन्हा बहुजन झाला.

पण इथे संपादक संजय राऊत आहेत. कोणत्याही प्रसंगात माघार न घेण्याची वृत्ती. लोकसत्ता सारख्या दैनिकाने देखील आपले अग्रलेख मागे घेतले पण सामनाने कधी आपली व्यंगचित्र देखील मागे घेतली नाहीत हा इतिहास आहे. साहजिक समाजमाध्यमातून चर्चा झाली म्हणून आवाज बदललाच जाईल याची शक्यता कमी.

आत्ता आवाज गेला तरी बाळासाहेब हे बाळासाहेब होते. त्यांनी जगलेला, लोकांना जगायला लावलेला प्रत्येक क्षण तितकाच धारदार असणार हे नक्की. आवाज सोडून चर्चा करावीच लागली तर हाती राहतात प्रसंग.

ट्रेलरमध्ये ठसठशीत सात प्रसंग दिसतात. हे सात प्रसंग कोणते आणि त्यामागच राजकारण हे पाहूया. पुढ काय आहे ते २५ तारखेला समजेलच.

१) शिवसेनेची स्थापना. 

पन्नासच्या दशकात बाळासाहेब फ्री प्रेस जर्नल साठी व्यंगचित्र रेखाटायचे. आपल्या कार्टून्समधून अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी दिलेले ब्रशचे फटकारे देशभर प्रसिद्ध होते. पण त्यांच्या ऑफिसमधलं वातावरण अमराठी होते.

बाळासाहेबांना काही वेळा आपले व्यंगचित्र मागे घ्यायला लावण्यात आले. फ्री प्रेसचे संपादक सदानंद यांच्याशी झालेल्या वादामुळे अखेर बाळासाहेबांनी नोकरीला लाथ मारली. दररोज आपल्या डोळ्यासमोर घडणारा मराठी माणसावरचा अन्याय त्यांना शांत बसवत नव्हता.

वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रोत्साहनामुळे अखेर त्यांनी १९ जून १९६६ला “मराठी माणसाच हित हाच आमचा धंदा” अशी सरळ घोषणा करत राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून पक्षाचं नाव शिवसेना असं नाव प्रबोधनकारानी सुचवलं.

२) एअर इंडिया नोकर भरती नंदा यांना मारहाण. 

मराठी मुलांवर सरकारी कंपन्यामध्ये नोकरभरतीसाठी होणारा अन्याय याच्याविरुद्ध शिवसेना आक्रमक झाली होती. १९७२सालच्या नोव्हेंबर महिन्यात खुद्द बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा मोर्चा एअर इंडियाच्या मुंबई ऑफिस वर काढण्यात आला. या वेळी एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री. नंदा यांना सेनेचे शिष्टमंडळ जाऊन भेटले. या भेटीवेळी शिवसैनिकांची त्यांच्याशी बाचाबाची झाली आणि तिथेच कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या समोर नंदा यांना लाथाबुक्क्यांनी बडवून काढले.

३) मोरारजी देसाई यांची गाडी अडवली.

७ फेब्रुवारी १९६९, भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबई दौर्यावर येणार होते. मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून मराठी माणसाच्या मध्ये बदनाम होते. बेळगाव सीमाप्रश्न तेव्हा पेटला होता. शिवसेनेन मोरारजीनां मुंबईमध्ये पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

मोरारजी  तरीही आले. त्यांच्या मोटारीचा ताफा माहीम कॉजवेवर अडवण्यात आला. गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी उपपंतप्रधानाना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या नादात ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला यात काही शिवसैनिक गाडीखाली येऊन जखमी झाले.

आणि ठिणगी पेटली. चवताळलेल्या शिवसैनिकांनी दादर भागात दगडफेक केली. यावेळी झालेल्या दंगलीत जवळपास वीस लोकांचे बळी गेले होते. बाळासाहेबांना अटक झाली होती.

४) वानखेडे खेळपट्टी उकरली आणि मियादाद भेट .

१९९१सालच्या ऑक्टोबर महिन्यात सामनामध्ये भारतपाकिस्तान क्रिकेटसामन्याविरुद्ध अग्रलेख लिहून आला. तेव्हा शिशिर शिंदे आणि काही शिवसैनिकांनी सामना रद्द व्हावा म्हणून वानखेडे स्टेडियमची खेळपट्टीच उखडून टाकली.

पुढे खूप वर्षांनी वाजपेयींच्या पुढाकाराने भारत पाकिस्तान सामने परत सुरु झाले मात्र मुंबईमध्ये कधीही भारत पाकिस्तान सामने होऊ शकले नाहीत २००४साली जावेद मियादाद बाळासाहेबाना यासंदर्भात सदिच्छा भेट घेण्यासाठी आला होता. पण बाळासाहेबांनी मला तुझा खेळ आवडतो पण देशापेक्षा खेळ मोठा नाही हे त्याला सुनावले.

५) आणिबाणी इंदिरा गांधी भेट. 

एकेकाळी इंदिराजींच्या विजयाला बाईचा विजय नसून शाईचा विजय आहे अशी संभावना करणारे बाळासाहेब त्यांच्या आणीबाणीला समर्थन करत होते तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातील जनता आवाक होती.

१९७४साली मुंबईदौऱ्यावर आल्याअसता श्रीमती गांधीनी बाळासाहेबांची भेट घेतली होती. लोक म्हणाले इंदिरा गांधी वाघ कसा दिसतो हे पाहायला शिवसेनाप्रमुखांना भेटत आहेत. इंदिराजींनी या भेटीत त्यांच पूर्ण म्हणण ऐकून घेतलं आणि त्या प्रश्नाबद्दल सकारात्मक वाटल्या. म्हणून बाळासाहेबांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला.

६) बाबरी भूमिका. 

अयोध्या जन्मभूमीच्या आंदोलनाच्या सुरवातीपासूनच शिवसेनेने बाबरी पाडली पाहिजे यावर ठाम भूमिका घेतली होती. ६ डिसेंबर १९९२रोजी बाबरी मशीद पडली. यासाठी अनेक शिवसैनिक अयोध्येला गेले होते. ज्यावेळी इतर सर्व पक्ष आणि त्यांचे नेते बाबरी पडल्यावर कातडी बचाऊ भूमिका घेत होते

तेव्हा बाळासाहेबांनी स्पष्टोदगार काढले

” माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली आणि मला त्यांचा अभिमान आहे “

यानंतर मुंबईमध्ये जातीय दंगली सुरु झाल्या.

७)बाळासाहेबांना अटक.

जुलै २०००साली आठवर्षापूर्वी बाबरी मशीद पाडली आणि त्यानंतरच्या मुंबईत उसळेल्या दंगली याबद्दल सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल बाळासाहेबांना इंडियन पिनल कोडच्या १५३(A)अंतर्गत अटक करण्यात आली. या अटकेमागे होते त्यांचे एकेकाळचे शिष्य आणि त्यावेळचे गृहमंत्री छगन भुजबळ. त्यांना जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्यापुढे उभे करण्यात आले. पूर्ण मुंबईमध्ये तणावाचे वातावरण होते मात्र बाळासाहेबांना त्याच दिवशी जामीन मिळाला.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.